What’s Chakrasana :योग आज कोट्यवधी लोकांचा फिटनेस फंडा ठरला आहे. योग जगभरात लोकप्रिय झाला आहे. बॉलीवूडचे सेलिब्रिटी, तसेच हॉलीवूडचेही स्टार्सही आता योगाला महत्त्व देऊ लागले आहेत. बॉलीवूडच्या अभिनेत्री कठीण योगासनेही करीत आहेत. या अभिनेत्रींनी त्यांच्या फिटनेसचे गुपित सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे सध्या त्यातील चक्रासन या योगासन प्रकाराची जास्त चर्चा होते. चला, तर चक्रासन हे योगासन सविस्तर जाणून घेऊ.
योग तज्ज्ञ कामिनी बोबडे यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना चक्रासनाचे फायदे, काय आणि काय करू नये याबद्दल मार्गदर्शन केले आहे.
चक्रासन हे एक उत्कृष्ट योगासन आहे; ज्याला इंग्रजीमध्ये व्हील योग पोझ, असेही म्हणतात. त्याला योगामध्ये उर्ध्वा धनुरासन, असेही नाव देण्यात आले आहे. चला तर, त्याचे आपल्याला काय फायदे आहेत हे जाणून घेऊ.
चक्रासनाचे फायदे
- ऊर्जा आणि शरीरातील उष्णता वाढते.
- हात, पाय, पाठीचा कणा, पोटाचे स्नायू मजबूत होतात.
- पेक्टोरल स्नायू उघडतात.
- खांदे, तसेच हिप फ्लेक्सर व कोर स्नायू ताणले जातात.
- ग्लुट्स आणि मांड्या मजबूत होतात.
- बेली फॅट म्हणजेच पोटावरची चरबी कमी करण्यासाठीही चक्रासन करणे फायदेशीर ठरते.
- मासिक पाळीदरम्यान; ज्यांना पोटदुखी, रक्तस्त्राव यांचा खूप त्रास होतो, त्यांच्यासाठीही हे आसन फायदेशीर आहे.
चक्रासन कसे करावे?
- चक्रासन हे सर्वांत कठीण योगासनांपैकी एक आहे; जे बहुतेक लोक करण्यात अपयशी ठरतात. त्यासाठी तुम्हाला आधी तयारी करावी लागेल.
- चक्रासन करण्यासाठी सर्वांत आधी जमिनीवर सतरंजी, योगा मॅट टाका आणि पाठीवर झोपा.
- त्यानंतर डोक्याच्या बाजूला दोन्ही हातांचे तळवे टेकवा.
- पाय गुडघ्यात दुमडा आणि तळपाय नितंबाच्या जवळ घ्या.
- आता तळहात आणि तळपायावर भर देऊन पाठ, कंबर, मान, डोके उचला. सुरुवातीला एकदम हे आसन जमणार नाही.
- त्यामुळे जेवढे जमेल तेवढेच करा. आसनातील स्थिती ३० ते ४० सेकंद टिकविण्याचा प्रयत्न करा.
हेही वाचा >> सतत Screen वापरून डोळ्यांवर येतोय ताण? मग करून पाहा ‘२०-२०-२०’ नियमाचा वापर…
चक्रासन करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी तुम्ही तुमचे हात, पाठीचा कणा, स्नायू व पाय मजबूत करण्यासाठी काही आसने केली पाहिजेत. सेतुस्ना, कंधारस्ना, भुजंगासन यांसारख्या आसनांचा तुम्ही सराव केला पाहिजे.