Avoid these foods : तुम्हाला माहीत आहे का की, आपल्या त्वचा आणि केसांवरुन आपलं आरोग्य कळतं. आपण जे खातो, ते आपल्या त्वचेवर आणि केसांवर दिसते. आपण अनेकदा आपल्या शरीराची देखभाल करण्यासाठी खूप प्रयत्न करतो – त्वचेची काळजी घेण्याच्या दिनचर्यांचे पालन करतो आणि केसांवर विविध उपचारांचा प्रयत्न करतो. परंतु आपण एका प्रमुख घटकाकडे दुर्लक्ष करतो, तो म्हणजे आपला आहार. आपण नियमितपणे जे पदार्थ खातो, ते आपल्या त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी प्रमुख धोक्याचे संकेत असू शकतात. आपल्या आहारातील प्रक्रिया केलेल्या मीठयुक्त जंक फूडपासून ते अल्कोहोलपर्यंतच्या पदार्थांच्या निवडींमुळे केस गळणे, जळजळ होणे, अकाली वृद्धत्व आणि केस पातळ होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
AAYNA क्लिनिकमधील मुख्य वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीयदृष्ट्या प्रशिक्षित त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनिंदिता सरकार यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. डॉक्टरांनी आपल्या आहारात वापरल्या जाणाऱ्या अशा अन्नपदार्थांची यादी शेअर केली, जे कदाचित तुमची त्वचेला आणि केस यांना नुकसान पोहोचवू शकतात.
साखर : डॉ. सरकार यांनी, “साखर जळजळ वाढवते, त्वचेचे वय वाढवते आणि सेबम उत्पादन व इन्सुलिनची पातळी वाढवून, त्वचेवर पुरळ वाढवू शकते”, असे सांगितले आहे.
मसालेदार पदार्थ : त्वचारोगतज्ज्ञांच्या मते, मसालेदार पदार्थ केशिका पसरवू शकतात आणि चेहऱ्यावर लालसरपणा निर्माण करू शकतात.
कॅफिन : ती स्पष्ट करते, “कॅफिनमुळे त्वचेचे निर्जलीकरण होऊ शकते, ज्यामुळे ती कोरडी आणि निस्तेज दिसते. तथापि, त्याचे काही दाहकविरोधी प्रभावदेखील आहेत.”
चॉकलेट (विशेषतः साखर आणि चरबीसह) : त्वचारोगतज्ज्ञ म्हणतात की, चॉकलेटमध्ये साखर आणि संतृप्त चरबी जास्त प्रमाणात असते, ज्यामुळे जळजळ वाढू शकते आणि मुरमे होऊ शकतात.
मद्य : त्वचारोगतज्ज्ञ स्पष्ट करतात, “अल्कोहोल मूत्रवर्धक म्हणून काम करते, ज्यामुळे निर्जलीकरण व निस्तेज त्वचा होते. ते मुक्त रॅडिकल्सच्या निर्मितीलादेखील प्रोत्साहन देते, जे वृद्धत्वाला गती देतात.”
प्रक्रिया केलेले अन्न : प्रक्रिया केलेले अन्न सहसा रासायनिक घटक, अॅडिटीव्ह आणि प्रिझर्व्हेटिव्ह्जने भरलेले असते, जे त्वचेला त्रास देऊ शकतात किंवा हार्मोन्सचे संतुलन बिघडू शकतात आणि त्यात महत्त्वाच्या पोषक घटकांची कमतरता असते.
फॅटी आणि फास्ट फूड्स (हायड्रोजनेटेड तेलांसह) : त्यात अनेकदा जीवनसत्त्वे आणि खनिजे नसतात, ट्रान्स फॅट्स आणि प्रिझर्व्हेटिव्ह्ज जास्त असतात, असे डॉ. सरकार म्हणतात.
केस गळणे कमी करण्यासाठी आहारात काही पदार्थ टाळणे आवश्यक आहे. विशेषत: कच्च्या अंड्याचा पांढरा भाग, प्रक्रिया केलेले पदार्थ व अतिरिक्त साखर यांसारख्या पदार्थांमुळे केस गळण्याची समस्या वाढू शकते. त्यामुळे या पदार्थांचा आहारात समावेश कमी करावा.