आधुनिक आहारतज्ज्ञ म्हणतात त्याप्रमाणे ऋतुकाळ कोणताही असो, “बारा महिने भरपूर पाणी प्यावे” हा सल्ला मला तरी व्यक्तीश: अयोग्य वाटतो. शरद-ग्रीष्म हे उष्ण ऋतू, हेमंत-शिशिर हे शीत ऋतू, वसंतासारखा शीत व उष्ण ऋतू आणि प्रावृट्‌-वर्षा हा पावसाचा ऋतू हे आपल्या देशामधील विविध प्रदेशांमध्ये अनुभवास येणार्‍या भिन्न-भिन्न ऋतूंमध्ये सभोवतालचे वातावरण सर्वस्वी वेगळे असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भिन्न- भिन्न वातावरणाचा शरीरावर होणारा परिणाम वेगवेगळा असतो तसाच शरीराच्या चयापचयावर होणारा परिणामसुद्धा वेगळा असतो. शरीरामध्ये तयार होणारी व वापरली जाणारी उर्जाआणि त्या अनुषंगानेच शरीरातल्या जलांशामध्ये (ओलाव्यामध्ये) घट वा वाढ होत असताना शरीराची पाण्याची गरज हीदेखील ऋतुनुसार बदलणे स्वाभाविक आहे.

पावसाळ्यामध्ये सभोवतालचे ओलसर वातावरण, पाण्याच्या तुषारांनी युक्त हवा, हवेतला गारवा आणि या सर्वाचा मानवी शरीरावर होणारा परिणाम याचा विचार करुन आयुर्वेदशास्त्राने पावसाळ्यात कमी पाणी प्यावे असा सल्ला दिलेला आहे.

पहिल्या पावसाचे पाणी पिण्यासाठी निषिद्ध

आचार्य सुश्रुतांनी पहिल्या पावसाचे पाणी पिण्यास निषिद्ध मानले आहे. त्यांच्या मते पहिल्या पावसाचे अर्थात प्रावृट्‌ ऋतुमधले पाणी पिण्यायोग्य नसते. पहिल्या पावसामध्ये आकाशातून बरसणारे पाणी हे आकाशात जमलेली अशुद्धी सोबत घेऊन खाली येण्याचा धोका असल्यानेच आयुर्वेदाने प्रावृट्‌ ऋतुमध्ये ते निषिद्ध मानले आचार्य सुश्रुत तर त्या पाण्याला विषसमान समजावे अशी स्पष्ट ताकीद देतात. याबाबत आचार्य वाग्भटांनी लिहिलेल्या सूत्रावर हेमाद्रिने लिहिलेल्या ‘आयुर्वेद रसायन’ या भाष्यामध्ये सुद्धा सांगितले आहे की, पावसाळ्यात आकाशातून पडणारे जल पिऊ नये.

हेही वाचा… Health Special: सायबरबुलिंग म्हणजे काय?

संपूर्ण वर्षभरामध्ये पावसाळा हा असा ऋतू आहे जेव्हा पाणी सर्वाधिक दूषित असते. पावसाळ्यातल्या दूषित पाण्याचे चित्र प्राचीन काळामध्ये रचलेल्या सुश्रुतसंहितेमध्ये उभे केले आहे, ते जाणून घेणे वाचकांना उद्बोधक होईल म्हणून त्याबद्दल थोडेसे…

सुश्रुतसंहितेमधील वर्णन

शल्यचिकित्सक असलेल्या सुश्रुतांनी इसवी सनपूर्व दीडहजार वर्षे इतक्या प्राचीन काळामध्ये लिहिलेले दूषित पाण्याचे चित्र आजच्या २१व्या शतकातील दूषित पाण्यालाही लागू होणारे असे आहे. आचार्य सुश्रुत लिहितात- “पहिल्या पावसाळ्यातील अर्थात प्रावृट्‌ ऋतूमधील पाणी हे सविष असते आणि त्यामध्ये प्राण्यांची विष्ठा, मूत्र, लाळ वा थुंकी-कफ मिसळलेला असल्याने, ते दूषित होते” आचार्य सुश्रुतांनी असे पाणी आरोग्यासाठी योग्य नाही हे ओळखून त्याज्य समजावे, असा सल्ला दिलेला आहे. कारण असे खराब पाणी प्यायल्यास मनुष्य रोगी होण्याची शक्यता असते. पावसाळ्यात पाण्यामध्ये मिसळल्या जाणार्‍या विविध अशुद्धींचा विचार करुनच आयुर्वेदाने पावसाळ्यात नदीचे पाणी पिणे निषिद्ध मानले आहे.

या आरोग्य-धोक्याचा विचार करुन शास्त्राने या पावसाळ्यात पाणी कढवूनच प्यावे असा सल्ला दिलेला आहे,जो प्रत्यक्षसिद्ध आहेच. मात्र पावसाळ्यात पाणी नेमके किती उकळवावे? … याचेही मार्गदर्शन आयुर्वेदाने केले आहे.

पावसाळ्यात पाणी नेमके किती उकळवावे?

पावसाळ्यात पाणी नेमके किती उकळवावे, याबाबत दोन प्रकारे मार्गदर्शन करता येईल.ज्या प्रदेशामधील पाणी हे विविध अशुद्धींनी दूषित झालेले असते, त्या प्रदेशामध्ये पाणी जितके उकळवू तितके आरोग्यास हितकारक असल्याने एक अष्टमांश बाकी राहीपर्यंत उकळवावे. त्यादृष्टीने प्रावृट्‌ ऋतु मध्ये (म्हणजे पावसाळ्याचे आरंभीचे काही आठवडे) पाणी एक अष्टमांश होईपर्यंत आटवणे अधिक योग्य, जो सल्ला १६व्या शतकात लिहिल्या गेलेल्या भावप्रकाश या आयुर्वेदीय ग्रंथामध्येही दिलेला आहे.

हेही वाचा… Health Special: ‘हे’ शैवाल ठरते आहे नवीन नैसर्गिक संतुलित आहार!

अन्यथा पाऊस सुरु होऊन काही आठवडे झाल्यानंतर जेव्हा नद्यांचे पाणी वेगाने वाहू लागते आणि अशुद्धी सुद्धा वाहून जातात तेव्हा पाणी निम्मे होईपर्यंत आटवावे. आयुर्वेदानुसार उकळवून आटवलेले असे कोमट पाणी प्यायल्यास ते पाऊण तासात पचते. अर्धे पाणी बाकी राहीपर्यंत आटवलेल्या पाण्याचा विशेष गुण म्हणजे ते वातनाशक असते. वर्षा ऋतुमधील वातप्रकोपाचा व वातविकृतींचा विचार करता अशाप्रकारे निम्मे आटवलेले पाणी वापरल्यास ते या दिवसांमध्ये संभवणार्‍या वातविकारावर नियंत्रण ठेवण्यास हितकारक होईल.

आचार्य वाग्भट यांच्या मतानुसार पावसाळ्यात पाणी पिताना ते उकळवून प्यावे आणि प्रत्यक्षात उकळवता होत नसेल तर निदान कोमट तरी प्यावे.वर्षा ऋतूमध्ये होणारे वेगवेगळे वातविकार, सर्दी, ताप, कफ, खोकला, दमा शिवाय श्वसनविकार, अग्निमांद्यजन्य विविध पचनाच्या तक्रारी यांचा विचार करता पाणी पिताना सोसेल इतपत कोमट करुन पिणे या सर्व रोगांना प्रतिबंधक असेल आणि हे आजार झालेले असल्यास उपचारास साहाय्यक म्हणूनदेखील त्याचा निश्चित उपयोग होईल.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In monsoon how much what and how to drink the water hldc dvr
Show comments