सध्या भारतात नऊ महिन्यांआधीच म्हणजे वेळेआधीच जन्माला येणाऱ्या बालकांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. ही बालकं सातव्या किंवा आठव्याच महिन्यात जन्माला येत असल्याचे दिसतेय. अशाप्रकारे वेळेआधीच जन्माला आलेल्या बालकांना प्री-मॅच्युअर बेबी असे म्हटले जाते. बऱ्याचदा या बालकांची वाढ पूर्ण होत नाही. ज्यामुळे अन्य बालकांच्या तुलनेत त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असते. अशाप्रकारे भारतात २०२० मध्ये नऊ महिन्याआधी जन्माला आलेल्या बालकांची संख्या (३.०२ दशलक्ष) जगभरातील सर्व नऊ महिन्याआधी जन्मलेल्या बालकांच्या तुलनेत २० टक्क्यांहून अधिक होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यानंतर पाकिस्तान, नायजेरिया, चीन, इथिओपिया, बांगलादेश, काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक आणि यूएसए यांचा क्रमांक लागतो. दरम्यान द लॅन्सेटने आपल्या एका विशेष अंकात नऊ महिन्याआधी जन्मलेल्या बालकांवर केलेल्या अभ्यासासंदर्भात नवा अहवाल प्रकाशित केला आहे.

वेळेआधीच बाळ जन्माला येणे म्हणजे गर्भधारणेच्या ३७ आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत बाळाचा जन्म होणे. यात काही कारणामुळे अनेकदा बाळाचा मृत्यू होण्याचा धोका वाढतो. २०१० मध्ये भारतात नऊ महिन्यांआधीच ३.४९ दशलक्ष बालकांचा जन्म झाला. मात्र मागील दहा वर्षात या संख्येत घट होऊ ३.०२ दशलक्ष झाली. मात्र हा बदल अद्यापही मोजता येण्याजोगा नाही.

जागतिक स्तरावरही २०१० मध्ये नऊ महिन्यांआधीच ( जन्माला आलेल्या बालकांचे प्रमाण ९.८ टक्के) आणि २०२० (९.९टक्के) इतके होते, त्यामुळे दोन्ही वर्षात कोणतेही बदल दिसून आले नाहीत. यात २०१० आणि २०२० मध्ये नऊ महिन्यांआधी जन्माला आलेली अंदाजे १५ टक्के बालकं ही ३२ आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत जन्माला आली. यावरुन प्रसतीपूर्व आणि नवजात बालकाच्या जन्मानंतर काळजी घेण्याची गरज असल्याचे अधोरेखित होत आहे.

यावर पुण्यातील केईएम आणि अंकुरा हॉस्पिटलचे मुख्य निओनॅटोलॉजिस्ट डॉ. उमेश वैद्य म्हणाले की, “वेळेआधीच जन्माला येणाऱ्या बालकांचे प्रमाण रोखता येऊ शकत नाही. कारण विशिष्ट केसेसच्या आधारे त्यामागील कारणेही वेगवेगळी असतात. यात सामान्य कारणांचा विचार केल्यास, आईला गंभीर किंवा दीर्घकाळ आजारपण, जुळी किंवा तिहेरी गर्भधारणा आणि गर्भाशयाच्या ग्रीवेच्या समस्या यांचा समावेश आहे”.

याच विषयावर पुण्यातील बी.जे गर्व्हमेंट मेडिकल कॉलेजचे बालरोग विभागाचे प्रमुख आणि प्रोफेसर डॉ. आरती किणीकर म्हणाल्या की, “याबाबत डेटा संकलन आणि विश्लेषणात सुधारणा करण्याची गरज आहे. जेणेकरुन वेळेआधीच जन्माला येणाऱ्या बालकांची संख्या कमी करता येऊ शकते”.

अनेकदा वेळेआधीच जन्मलेल्या बालकांना आयुष्यभर अपंगत्वाचा सामना करावा लागतो. यात अशा बालकांना शिकण्यात अडचणी येतात, वर्तणुकीशी संबंधित आजार होतात, डोळे आणि श्रवणदोष होण्याचा धोका असतो.

विशेषत: कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये (LMICs) योग्य डेटा उपलब्ध नसल्याने वेळेआधीच जन्माला येणाऱ्या बालकांच्या जन्मामागची मुख्य कारणे समोर येत नाही. अहवालानुसार, ही परिस्थिती अपुऱ्या नोंदी, गर्भावस्थेच्या कालावधीचे चुकीच्या पद्धतीने मोजमाप करणे, तसेच नऊ महिन्याआधीच जन्मलेल्या बाळांची माहिती नियमितपणे संकलित करण्यासाठी आणि अहवाल देण्यासाठी काही देशांमध्ये योग्य सिस्टम नसल्याने उद्धवली आहे.

नॅशनल रुटीन डेटाच्या आधारे, दक्षिण आशिया आणि उप- सहारा आफ्रिकेतील प्रदेशांमध्ये नऊ महिन्यांआधीच जन्माला येणाऱ्या बालकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामुळे नऊ महिन्याआधी जन्माला येणाऱ्या बालकांचे प्रमाण रोखण्यासाठी आणि अशाप्रकारे जन्माला आलेल्या बालकांची योग्य काळजी कशी घ्यावी यासाठी सर्व देशांनी ठोस योजना तयार करणे आवश्यक आहे.

योग्य डेटा तयार झाला तर नऊ महिन्यात आधी जन्मलेल्या किंवा जन्म घेणाऱ्या बालकांच्या आरोग्याबाबत काय उपाययोजना करता येतील हे ठरवू शकतो.

यातील दिलासाजनक बाब म्हणजे काही देशांमध्ये हे प्रमाण घटत असल्याचे चित्र आहे. १३ देशांमध्ये नऊ महिन्याआधी जन्माला येणाऱ्या बालकांच्या संख्येत ०.५ टक्के किंवा त्याहून अधिक घट झाली आहे. यात ऑस्ट्रिया, ब्राझील, ब्रुनेई, झेकिया, डेन्मार्क, जर्मनी, हंगेरी, लॅटव्हिया, नेदरलँड्स, सिंगापूर, स्पेन, स्वीडन आणि स्वित्झर्लंड सारख्या देशांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India accounted for 20 per cent of global pre term births says lancet study premature baby rate increase in india sjr
Show comments