Health Special बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी असणारे खाद्यपदार्थ आणि त्यात वापरली जाणारी रसायने यावर पूर्वापार संशोधन होत आहे. यात भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील पदार्थांचादेखील समावेश आहे. अगदी गव्हाच्या पिठापासून ते तेलबियांच्या उत्पादनापर्यंत अनेकविध उत्पादनामध्ये वापरले जाणारे रंग, मैदा, पदार्थांचा टिकाऊपणा वाढवणारे पदार्थ यांचं एक ठराविक प्रमाण असतं. या रसायनांची अन्नपदार्थांमध्ये होणारी भेसळ, त्यांचे आवश्यक प्रमाण आणि तब्येतीवर होणारे दुष्परिणाम याबद्दल ग्राहकांना वारंवार जागरूक केलं जातं, त्याबद्दल आजच्या लेखात…

समाजमाध्यमांवर गेले काही दिवस “तुम्ही नाश्त्याला इडली किंवा डोसा सांबार खात आहे का? तुम्ही ते खाऊ नका कारण त्यामुळे तुम्हाला कर्करोग होऊ शकतो” अशी सुरुवात असणारा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ अनेक बाबतीत चुकीची माहिती पसरवत आहे. अलीकडे प्रसिद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय संशोधनानुसार भारतीय मसाले तयार करताना त्यात वापरल्या जाणाऱ्या इथिलिन ऑक्साईड या रसायनामुळे कर्करोग होऊ शकतो, असं संशोधन पुढे आलं आणि भारतीय मसाल्यांवर त्यांच्या गुणवत्तेवर आणि वापरावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं.

हेही वाचा…शिळे अन् अस्वच्छ अन्नपदार्थ खाल्ल्याने तुमच्या शरीरावर काय परिणाम होतील? डाॅक्टरांकडून जाणून घ्या…

संशोधन नक्की कशाबद्दल आहे?

हे संशोधन मसाल्यांत असणाऱ्या घटकद्रव्यांवर आहे का ?- हो

हे संशोधन मसाल्यांतील पोषणमूल्यांवर आहे का? -नाही

बाजारपेठेत उपलब्ध असणाऱ्या पदार्थांमध्ये जास्तीचे (साठवणीचे) वापरले गेलेले पदार्थ किती मात्रेत आहेत आणि त्याचा मानवी शरीरावर परिणाम होऊ शकतो का, याबद्दलच हे संशोधन आहे .
यामुळे अचानक सरसकट सगळे मसाले कर्करोगजन्य ठरत नाहीत . यातला महत्वाचा मुद्दा हा की, मसाल्याचे पदार्थ साठवून ठेवले जाताना किंवा वेष्टनात ठेवले जाताना त्याचा टिकाऊपणा वाढविण्यासाठी केला गेलेला रसायनांचा अवाजवी वापर!

हेही वाचा…तुमच्या शरीराला ‘इतकी’ ग्रॅम साखर आवश्यक! यापेक्षा जास्त खाल्ल्यावर ही साखर शरीरात कुठे जाते, काय बदलते? पाहा

म्हणजे नक्की कोणतं रसायन ?

तर ते आहे – इथिलिन ऑक्साईड .

इथिलिन ऑक्साईड हा खरं तर पदार्थांचा टिकाऊपणा वाढण्यासाठी वापरला जाणारा पदार्थ आहे. भारतात तीळ जास्तीत जास्त काळ टिकवून ठेवता यावेत यासाठी इथिलिन ऑक्साईड वापरलं जातं. इतकंच नव्हे तर इथिलिन ऑक्साईडचा वापर आईस्क्रीम, चीझ , पेस्ट्री, धान्यांचे पदार्थ, दूध यामध्ये सर्रास केला जातो. पाश्चात्य देशांमध्ये इथिलिन ऑक्साईडवर पूर्णपणे बंदी आहे. खाद्यपदार्थांमध्ये वापरले जाणारे इथिलिन ऑक्साईडचे प्रमाण हे प्रति किलोमागे ७ मिलिग्रॅम इतपत ठीक मानले जाते. मात्र काही मसाल्याच्या पदार्थांमध्ये हेच प्रमाण १८० मिलिग्रॅम/ प्रति किलो इतके आढळले गेले आणि त्यामुळे भारतीय मसाल्यांबाबत मोठं प्रश्न चिन्ह तयार झालं. हे जाणून घेऊया की, नक्की कोणकोणत्या पदार्थात इथिलीन ऑक्साईड वापरलं जात ?

आईस्क्रीम

चॉकोलेट कंडेन्स्ड दूध

चीझ

फ्लेवर चीझ

सॉस

पॅकेज्ड मसाले

हे पदार्थ जास्त वेळ टिकून राहावे म्हणून त्यात इथिलिन ऑक्साईड वापरलं जातं.

हेही वाचा…इडली डोसा नियमित का खाऊ नये? आंबवलेले पदार्थ आठवड्यातून कितीदा खाणे चांगले? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….

या संशोधनामुळे घरगुती मसाले वापरण्यासाठी घाबरण्याची अजिबात आवश्यकता नाही. घरी तयार केल्या जाणाऱ्या कोणत्याही मसाल्यांच्या पदार्थामुळे कर्करोग होत नाही. किंबहुना सांबार किंवा तत्सम पदार्थ तयार करताना घरगुती मसाल्यांचा वापर केल्यास शरीराला उत्तम फायदे होतात. पोटाचे आरोग्य उत्तम राखणे , रोगप्रतिकारशक्ती वाढविणे, कडधान्यांतील पोषणतत्त्वे उत्तम स्वरूपात उपलब्ध करून देणे, एखाद्या पदार्थाचे पाचकमूल्य आणि चव दोन्ही वाढविण्याचे काम मसाल्यांमुळे होते. त्यामुळे मसाले अजिबात आहारातून वर्ज्य करू नका.

मसाले हा भारतीय आहारातील महत्वाचा भाग आहे आणि तो योग्य स्वरूपात वापरणे तितकेच महत्वाचे आहे.