Harsh Goenka’s Honey-Lemon Water Experiment for Weight Loss : सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात आपण अनेकदा आरोग्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे वजनवाढीसारख्या समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. वजन कमी करण्यासाठी अनेक जण विविध उपाय करतात. त्यातलाच एक लोकप्रिय उपाय म्हणजे कोमट पाण्यात मध आणि लिंबाचा रस टाकून पिणे. हे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असल्याचे मानले जाते. अनेकांच्या मते, या पेयाने दिवसाची सुरुवात केल्याने चयापचय क्षमता वाढते, फॅट्स कमी होते आणि शरीर सुदृढ होते.
उद्योगपती व आरपीजी समूहाचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांनी मात्र या लोकप्रिय पेयाविषयी आपला अनुभव सांगितला आहे. त्यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करीत लिहिलेय, “मला सांगितले होते की, जर दोन महिने मधाबरोबर लिंबू पाणी दररोज सकाळी प्यायलो, तर तुमचे वजन दोन किलो कमी होईल. दोन महिन्यांनंतर मी दोन किलो लिंबू आणि तीन किलो मध वाया घालावले.
त्यांची ही एक्स पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “लिंबू आणि मध ही मार्केटिंग ट्रिक आहे.” तर एका युजरने लिहिलेय, “मला वाटते की, वजन कमी करण्यासाठी लिंबू नाही, तर फक्त मध कोमट पाण्यात टाकून, त्याचे सेवन करावे.”
पण खरंच हे पेय वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे का?
याविषयी दी इंडियन एक्स्प्रेसने आहारतज्ज्ञ कनिक्का मल्होत्रा यांच्या हवाल्याने सविस्तर माहिती जाणून घेतली. त्या सांगतात, ““सकाळी उपाशीपोटी मध-लिंबूचा रस टाकून कोमट पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास, तसेच पचनास मदत होते आणि शरीराला पुरेसे पाणी मिळते; ज्यामुळे शरीरातला पाण्याची कमतरता जाणवत नाही. अति कॅलरीयुक्त पेये टाळून मध-लिंबाचे कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील एकूण कॅलरीजचे प्रमाण कमी होऊ शकते, तसेच चयापचय क्षमता वाढते आणि भूक कमी लागते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.”
लिंबामध्ये क जीवनसत्त्व आणि मधामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे चांगल्या आरोग्यासाठी हे पेय फायदेशीर आहे, असे स्पष्ट करून मल्होत्रा पुढे सांगतात, “लिंबाचा रस पचनसंस्थेच्या कार्याला गती देतो आणि मध प्री-बायोटिक म्हणून काम करतो, जी बाब आतड्यांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. त्याशिवाय हे पेय शरीराला पाणी पुरवते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासही मदत करते.”
दिवसाची सुरुवात उपाशीपोटी चहाने करण्याऐवजी मधासह लिंबू पाणी सेवन करण्याने करा. तुमच्यासाठी हा एक आरोग्यदायी पर्याय ठरू शकतो. उपाशीपोटी चहा प्यायल्याने काही वेळा पचनक्रिया बिघडू शकते. मात्र, मध-लिंबाचे पाणी पचनास फायदेशीर असते आणि त्यामुळे पोटाचे आरोग्य चांगले राहते. या पेयाच्या सेवनाने शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते आणि त्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारून, उर्जेची पातळी वाढते.
मल्होत्रा सांगतात, “मधासह लिंबू पाणी हा वजन कमी करण्यासाठी चमत्कारिक उपाय नसला तरी संतुलित आहार आणि दिनचर्येतील तो एक महत्त्वाचा भाग ठरू शकतो. शरीरात साखरेचे सेवन टाळण्यासाठी मधाचे कमी प्रमाणात सेवन करणे गरजेचे आहे.”
मध आणि लिंबू एकत्र सेवन केल्याने चयापचयाचे फायदे मिळतात का? किंवा संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैलीमुळे वजन कमी होते का?
मल्होत्रा सांगतात की, मध आणि लिंबाचे एकत्र सेवन केल्याने चयापचयाचे फायदे मिळू शकतात; पण वजन कमी होणे हे खरे तर एकूण आहार आणि जीवनशैलीवर अवलंबून आहे. “मध तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी करूनॉ शकतो आणि जास्त वजन वाढणे रोखतो. लिंबू पचनास मदत करून, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतो. उपवासादरम्यान लिंबू-मधाचा रस प्यायल्याने वजन आणि बीएमआय (Body Mass Index) कमी होऊ शकतो. लिंबामध्ये असलेले फ्लेव्होनॉइड्स अँटिऑक्सिडंट्समुळे कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइडचे उत्पादन कमी होते”
मल्होत्रा पुढे सांगतात. मधासह लिंबू पाणी प्यायल्याने चयापचय क्षमता वाढू शकते आणि त्यामुळे तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटू शकते, जे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकतात. या पेयावर अवलंबून राहण्याऐवजी शाश्वत पर्याय निवडा आणि त्यावर लक्ष केंद्रित करा. फळे, भाज्या आणि धान्ये आहारात समाविष्ट करा. भरपूर पाणी प्या.