IPL 2025 Fitness Secrets : सध्या देशभरात आयपीएलचा माहोल पाहायला मिळत आहे. या सीझनमध्ये अनेक टीमकडून नवीन आणि तितकेच दमदार खेळाडू मैदानावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वत्र सध्या आयपीएलमधील एकेका मॅचेससह खेळाडूंविषयीही चर्चा रंगतेय. खेळाडूंचा फिटनेस, डाएट प्लॅन यांबाबत चर्चा रंगताना दिसतायत. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या रमणदीप सिंगने अलीकडेच एका पॉडकास्टदरम्यान आयपीएलदरम्यानच्या त्यांच्या डाएट प्लॅनविषयी वक्तव्य केलं आहे.
आयपीएल सीझनमध्ये खेळाडूंचा रोजच्या आहाराविषयी माहिती देताना रमणदीप सिंगने सांगितले की, त्याच्या रोजच्या जेवणात सॅल्मन, चिकन व तूप या गोष्टींचा समावेश असतो. ज्यामुळे शरीर लवकर तंदुरुस्त होण्यास आणि चांगल्या प्रकारे खेळण्यासाठी शरीरास आवश्यक पोषक घटक मिळतात.
सकाळच्या नाश्त्यामध्ये कोणते पदार्थ असतात?

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

रमणदीप सिंगने पुढे सांगितले की, सध्या सीझन सुरू आहे. त्यामुळे तो गरम पाण्यात देशी तूप आणि थोडे आले घालून उकळतो. रोज सकाळी हे पेय तो प्रथम पितो. काही वेळ व्यायाम केल्यानंतर नाश्ता करतो, नाश्त्यामध्ये उकडलेल्या चार अंड्यांचा पांढरा भाग आणि एक संपूर्ण अंडे असते. मी एक कडधान्य किंवा मल्टीग्रेन टोस्ट आणि कोणतेही एक फळदेखील खातो; मग ते २०० ग्रॅम अननस असो किंवा पपई यांसह २५० ग्रॅम ग्रीक दही किंवा कधी कधी साधे दही आणि त्यात एक चमचा शुद्ध साखरदेखील घालतो. त्यामुळे शरीरास खूप ताकद मिळते.

या संदर्भात चेन्नईतील श्री बालाजी मेडिकल सेंटरमधील अधिकृत आहारतज्ज्ञ दीपलक्ष्मी म्हणाल्या की, अंडी आणि ग्रीक दही हे प्रथिनांचे एक पॉवरहाऊस आहेत; तर फळांमुळे फायबर वाढवता येते. ब्रेड कार्बोहायड्रेट्सचा पुरेसा स्रोत म्हणून काम करते. दह्यात साखर घातल्याने जलद ऊर्जा मिळते.

दुपारी आणि रात्रीचे जेवण कसे असते?

दुपारच्या जेवणात २५० ग्रॅम वाफवलेला भात, १५० ग्रॅम चिकन ब्रेस्ट, पिवळी डाळ व एक वाटी सॅलड असते. रमणदीप सांगतो की, मी संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये रताळ्यासह प्रोटीन स्कूप किंवा चिकन सँडविच खातो. रात्रीच्या जेवणात सॅलडसह सॅल्मन खातो. तसेच, कोणती भाजी बनवली असेल, तर ती खातो. या आहारात देशी तूप लावलेल्या गव्हाच्या पिठाच्या दोन पोळ्या, मिक्स भाजी- जी चवीला बेस्ट लागते ती खातो.

दीपलक्ष्मी यांच्या मते, चिकन ब्रेस्ट, डाळ व सॅल्मन हे प्रथिनांचे उत्कृष्ट स्रोत आहेत, जे स्नायूंच्या तंदुरुस्ती आणि मजबुतीसाठी आवश्यक आहेत. सॅलडमध्ये आवश्यक फायबर मिळते. दुसरीकडे देशी तूप हे दाहकविरोधी गुणधर्मांनी समृद्ध असते, जे विविध आजारांशी लढण्यास आणि एकूण रोगप्रतिकार शक्ती सुधारण्यास मदत करते. सिंग याचा हा साधा आणि संतुलित डाएट प्लॅन शरीरास आवश्यक पोषक घटक तर देईलच; त्याशिवाय तुमच्या फिटनेसचे ध्येयदेखील साध्य करण्यास मदत करील.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2025 players diet plan kkr player ramandeep singh shares diet plan during peak indian premier league season sjr