Cameroon Green Kidney Disease Diet Plans: “‘हा’ १२ वर्षांपेक्षा जास्त जगू शकत नाही”, हा डॉक्टरांचा अंदाज खोटा सिद्ध केलेला स्टार खेळाडू कॅमरून ग्रीन याचा प्रवास कदाचित तुमच्यासाठीही अत्यंत प्रेरणादायी ठरू शकतो. कॅमरूनला जन्मापासून क्रोनिक किडनीचा विकार होता व जन्मानंतर काही वर्षांतच हा विकार दुसऱ्या टप्यापर्यंत पोहोचला होता. यामुळे सतत क्रॅम्प येणे, आजारी पडणे हे त्रास त्याच्यासाठी नेहमीचेच झाले होते. पण आजार कितीही मोठा असला तरी शिस्त ही त्यावर मात करण्याची गुरुकिल्ली ठरते असं म्हणतात; त्यानुसारच, आरसीबीचा क्रिकेटर कॅमरूनने सुद्धा कठोर शिस्तीचे डाएट व व्यायामाचे रुटीन पाळून त्याने आज जगात आपल्या नावाची कीर्ती पोहोचवली आहे.
वाणी कृष्णा, बंगळुरूच्या मणिपाल हॉस्पिटलचे स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट सांगतात की, “ग्रीनची आई किडनीच्या आरोग्यासाठी अनुकूल जेवण तयार करायची त्याला आवडत नसले तरीही खायला लावायची. मूत्रपिंडावर ताण न देणारा आहार अशा आजारांमध्ये वाढ होण्याचा वेग नियंत्रणात ठेवू शकतो. ६० टक्केच कार्यरत असणाऱ्या किडनीच्या बळावर ग्रीन आज आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत आहे. तुम्ही शिस्त बाळगल्यास अनेक वर्षे असं आयुष्य जगू शकता. मात्र या सगळ्या नियमांकडे पाठ फिरवल्यास तुम्हाला काही वर्षांत डायलिसिसची आवश्यकता भासू शकते.” या क्रोनिक किडनी आजाराविषयी व त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या पद्धतीविषयी आज आपण तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत.
क्रॉनिक किडनी आजार म्हणजे काय?
डॉ दीपक कुमार चित्राल्ली, वरिष्ठ सल्लागार, नेफ्रोलॉजिस्ट आणि ट्रान्सप्लांट फिजिशियन, मणिपाल हॉस्पिटल सांगतात की, “या आजार किडनीची कार्यक्षमता हळूहळू कमी होऊ लागते. ज्यामुळे शरीरातून बाहेर टाकायचे घटक फिल्टर करताना अडचणी येऊ लागतात. हा आजार पूणर्पणे बरा होत नसला तरी औषधे, आहार, व्यायाम व तज्ज्ञांच्या सल्ल्याने यावर नियंत्रण नक्कीच मिळवता येऊ शकते. ग्रीनला हा आजार जन्मापासूनच असला तरी काहींच्या बाबत हायपर टेन्स्डहं व मधुमेह हे सुद्धा जोखीम ठरू शकतात.”
किडनीसाठी अनुकूल आहार म्हणजे काय?
किडनीसाठी अनुकूल आहार म्हणजे काय तर, ज्याच्या पचनानंतर शरीरातून बाहेर टाकायच्या घटकांचे प्रमाण अधिक नसेल. अशा स्थितीत प्रथिने, चरबी, सोडियम, पोटॅशियम आणि अगदी द्रवपदार्थ सुद्धा शरीरात अधिक प्रमाणात जमा होऊ देऊ नये. सुरुवातीच्या टप्प्यात, मीठ आणि पोटॅशियम-समृद्ध अन्न कमी करणे सुद्धा पुरेसे ठरू शकते. हळूहळू प्रत्येक टप्यात सेवन अधिकाधिक कमी करावे. यामुळे होतं असं की, आहारातील बदल क्रिएटिनिन पातळी कमी करू शकतात, ज्यामुळे किडनीच्या आजारांची वाढ आपल्या नियंत्रणात राहू शकते.
किडनीच्या सुदृढतेसाठी, आहाराचे कोणते नियम पाळावेत?
वाणी कृष्णा सांगतात की, किडनीच्या आरोग्याची स्थिती पहिल्या ते तिसऱ्या टप्यात असेल तर क्रिएटिनिनची पातळी 1.4 mg/dL च्या पुढे वाढलेली नसते. अशावेळी तुमच्या प्रथिनांचे सेवन शरीराच्या वजनाच्या प्रति किलो ०.८ ग्रॅम असावे. यासाठी उंचीनुसार वजनाही सरासरी सुद्धा लक्षात असायला हवी, उदाहरणार्थ, जर तुमची उंची १६० सेमी असेल परंतु वजन ६० किलो ऐवजी ८० किलो असेल, तर प्रथिनांचे सेवन हे ६० किलोच्या ०.८ ग्रॅम टक्के असावे. दिवसभरात प्रथिने एकाच जेवणात खाऊ नये, उलट दिवसभरात वेगवेगळ्या वेळी घ्यायच्या आहारात हे प्रमाण वाटलेले असावे. तसेच, शरीराच्या आदर्श वजनाच्या प्रति किलो २५ ते ३० कॅलरीज आहारात असायला हव्यात. अनुक्रमे सोडियमचा वापर दररोज ३ ग्रॅमपेक्षा कमी, फॉस्फरस १००० मिलीग्राम प्रतिदिन आणि पोटॅशियम प्रतिदिन ३००० मिलीग्रामपेक्षा कमी असावा.
तसेच मांस विशेषतः प्रक्रिया केलेले मांस किंवा सॉसेज, अगदी वनस्पती आधारित प्रथिने सुद्धा मर्यादित प्रमाणात आहारात समाविष्ट करायला हवी. “तुम्हाला सोडियम, पोटॅशियम आणि फॉस्फरसचे सेवन मर्यादित करायचे असल्याने, तुम्ही बटाटे, केळी, क्लस्टर बीन्स, फ्रेंच बीन्स, एवोकॅडो, ड्रमस्टिक (शेंगा), पालक, पालेभाज्या, नाचणी, ज्वारी आणि बाजरी यांचा वापर मर्यादित केला पाहिजे. फायबर समृद्ध दुधी, झुकिनी, काकडी आणि भोपळा हे भाज्यांचे सुरक्षित पर्याय ठरतील. फळे सुद्धा नॉन सिट्रिक (लिंबू वर्गीय नसलेली) असावीत. संपूर्ण धान्यासारखे जटील कार्ब्सचे सेवन करावे.
कमी मिठाचा आहार रुचकर करण्यासाठी, लसूण, कांदा, लिंबाचा रस, तमालपत्र, चिंचेचा कोळ, व्हिनेगर, दालचिनी, लवंग, जायफळ, काळी मिरी आणि जिरे यासारखे मसाले वापरा. परंतु मीठाचे पर्याय टाळा कारण त्यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. लक्षात घ्या की, जर एखाद्या रुग्णाला प्रगत अवस्थेत डायलिसिससाठी जावे लागले, तर प्रथिनांची आवश्यकता १.२ प्रति किलो आदर्श शरीराच्या वजनावर असते.
तुम्ही स्नायूंची शक्ती वाढवू शकता का? त्यासाठी आहार कसा असावा?
खेळाडूंसाठी मसल बिल्डिंगचे महत्त्व असतेच, अशावेळी आहाराचे नियम पाळताना तुम्ही स्नायूंवर काम करू शकता का? हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर त्यावरही तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले आहे. डॉ चित्राल्ली सांगतात, ग्रीनने कमीत कमी मीठ आणि प्रथिने आहारात ठेवूनही मांसपेशी बळकट केल्या आहेत. आता मैदानावर खेळताना ग्रीनने मिठाचे प्रमाण किंचित वाढवले आहे. सौम्य प्रथिने जसे की अंडी, त्वचेशिवाय चिकन, टर्की यांचा सुद्धा त्याने आहारात समावेश केला आहे.
हे ही वाचा<< पाणी किंवा चहात फक्त १५ मिली ‘हे’ द्रव घातल्यास कंबरेचा घेर व वजन होईल कमी; नवीन अभ्यास काय सांगतो?
अंड्याचा पांढरा भाग, कॉटेज चीज, १०० ते १५० मिली दूध आणि दही आणि डाळी खाऊन स्नायू वाढवू शकता. डाळी शक्यतो पाण्यात भिजवून मग पाणी काढून टाकावं यातून सोडियम आणि पोटॅशियमचे प्रमाण ५० ते ६० टक्के कमी होऊ शकते. क्रोनिक किडनी आजराच्या चौथ्या-पाचव्या टप्प्यात वरील प्रमाण आणखी कमी करणे व दिवसाला फक्त दीड लिटर पाणी पिणे हे ही नियम पाळावेत. या पद्धतीच्या आहारामुळे केवळ किडनीचे आरोग्य नव्हे तर रक्तदाब व रक्तातील साखर सुद्धा नियंत्रणात राहू शकते.