शरीरात लोहाची कमतरता ही सर्रास आढळून येणारी पोषणविषयक समस्या आहे. त्यावर वेळीच उपचार केले न गेल्यास, थकवा जाणवणे आणि अॅनिमियासारख्या विविध समस्या जाणवू लागतात. लोहाच्या कमतरतेमुळे व्यक्तीच्या शरीरावर हळूहळू; पण अतिशय हानिकारक परिणाम होऊ लागतात. म्हणूनच याला ‘सायलेंट किलर’, असे म्हटले जाते.

शरीरात लोहाची कमतरता असणे ही खूप सामान्य समस्या आहे. विशेषत: ज्या महिला गर्भवती आहेत किंवा ज्यांना मासिक पाळी येत आहे किंवा ज्या महिला रजोनिवृत्तीमध्ये प्रवेश करणार आहेत, त्या महिलांना ही समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते. बाजारात अशी अनेक पूरक उत्पादने आहेत; जी लोहाची कमतरता भरून काढू शकतात. पण, तुम्हाला काही खाद्यपदार्थ निवडायचे असतील. तर या खाद्यपदार्थांचा आपल्या आहारात समावेश करून रक्ताची कमतरता भरून काढता येऊ शकते.

निरोगी आरोग्यासाठी अनेक जण पोषक आहार घेण्याचा प्रयत्न करतात. असे असूनही काही लोकांच्या शरीरात लोहाची कमतरता असते. त्याच वेळी लोहाची पातळी कमी झाल्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाणदेखील कमी होऊ लागते. अशा परिस्थितीत लोहयुक्त काही घटकांचा आहारात समावेश करून, तुम्ही शरीरातील रक्ताची कमतरता सहजतेने भरून काढू शकता. मुंबई येथील वोक्हार्ट हॉस्पिटलच्या सेंट्रल येथील प्रसूती व बालसंगोपन विभागाच्या प्रमुख समन्वयक डॉ. देवरुखकर यांनी रक्ताची कमतरता भरून काढणारे व लोह भरपूर प्रमाणात असलेल्या या पाच पदार्थांची माहिती दिल्याचे वृत्त दी इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. ते पाच पदार्थ कोणते ते आपण सविस्तर जाणून घेऊ…

लोह भरपूर असलेले पाच पदार्थ

मासिक पाळीमुळे स्त्रियांना लोहाच्या कमतरतेचा त्रास होतो. प्रत्येक मासिक पाळीत सुमारे ८०-१०० मिली रक्त कमी होते; ज्यामुळे लोहयुक्त आहाराची आवश्यकता अधोरेखित होते. त्यामुळे खालील पदार्थांचा आहारात समावेश करा, असे डाॅक्टर सांगतात.

१. पालक व इतर पालेभाज्या

पालकात भरपूर लोह असते. हिमोग्लोबिनची कमतरता असल्यास पालकाचा आहारात समावेश करावा. पालकामध्ये कॅल्शियम, सोडियम, क्लोरिन, फॉस्फरस व प्रथिने यांसारखे घटक असतात. पण तुम्ही फक्त पालकच नव्हे, तर इतर हिरव्या भाज्यांचाही आहारात समावेश करु शकता. जसे की, मेथीच्या पानांचा आहारात समावेश करू शकता.

(हे ही वाचा : किडनी स्टोन होऊ नये म्हणून चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ; धोका वेळीच ओळखा, डाॅक्टरांनी सांगितलेली यादी एकदा वाचाच!)

२. गूळ

गूळदेखील लोहाचा चांगला स्रोत आहे. गुळामध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम व क जीवनसत्त्व क मुबलक प्रमाणात आढळते.

३. खजूर

लोह, मॅग्नेशियम, तांबे, जीवनसत्त्व हे पोषक घटक यामध्ये भरपूर प्रमाणात असतात. तुम्ही दोन-तीन खजूर सकाळी उठल्यानंतर खाल्ल्याने ऊर्जा वाढते आणि लोहाची पातळी वाढते.

४. लाल मांस

लाल रक्तपेशींना ऑक्सिजनचे वहन करण्यात मदत करण्यासाठी लोह आवश्यक आहे. लाल मांस लहान मुले, वृद्ध व गर्भवती महिलांमध्ये लोहाची कमतरता पूर्ण करू शकते.

५. बीन्स आणि मसूर

बीन्स आणि मसूरमध्ये केवळ फायबरचे प्रमाणच जास्त नाही, तर ते लोहाचा चांगला डोसदेखील देतात.

या विविध लोहसमृद्ध पर्यायांचा समावेश करून लोहाच्या कमतरतेशी लढा देणारी आहार योजना तुम्ही तयार करू शकता. लक्षात ठेवा, वैयक्तिक मार्गदर्शनासाठी, विशेषत: जर तुम्हाला ॲनिमियाची लक्षणे जाणवत असतील, तर तुम्ही आरोग्य सेवा व्यावसायिकांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, असेही डॉ. देवरुखकर सांगतात.