८२ वर्षाचे माझे शेजारी नाना क्लिनिक मध्ये आले आणि म्हणाले, “हे– हे चेहऱ्यावरचे डाग बघ बरं, मला ते नकोयत. नेहाच्या लग्नात (म्हणजे त्यांच्या नातीच्या) माझा चेहरा झक्क दिसायला पाहिजे.” त्यांच्या चेहऱ्याची तपासणी केल्यावर, माझ्या लक्षात आले की हे मोठमोठे काळे डाग म्हणजे मस किंवा सेबोरिक केरॅटोसिस आहेत. त्यांची संख्या भरपूर होती आणि ते आकाराने देखील मोठेच होते. काढून टाकणे हाच एक उपाय होता खरा. ” नाना, अहो हे औषधाने नाही जाणार, ते काढून टाकावे लागतील. शिवाय त्यांची संख्याही खूप आहे. तुमचे वय, तुमचे रक्त पातळ करणारे औषध…” मी चाचरत बोलत होते तोच मेधा, त्यांची 55 वर्षांची मुलगी म्हणाली,” अगं, हट्टच धरून बसलेत”. वार्धक्यात शैशवाचा बाणा जपणाऱ्या नानांचा बालहट्ट आम्ही थोडाफार पुरवला आणि मोठे मोठे मस काढून टाकले.
हे मस वयाच्या तिशीनंतर कोणालाही येऊ शकतात. आई-वडिलांपैकी कोणाला जर असतील तर लहान वयात मुलांना येण्याची शक्यता वाढते. वयाच्या साठी नंतर चामखीळांचे प्रमाण झपाट्याने वाढते. सूर्यप्रकाशात खूप काळ वावरले असल्यास हे मस येण्याचे प्रमाण अधिक असते त्याप्रमाणेच गोऱ्या त्वचेवर उन्हाचा परिणाम जास्त होत असल्याने यांची संख्या जास्त असते. स्थूलपणा हा घटक देखील मस वाढायला कारणीभूत ठरतो. संप्रेरकांची कमतरता, विशेषता मधुमेह आणि थायरॉईड यांच्यामुळे मस लवकर येतात.
हे मस टाचणीच्या आकारापासून ते दोन ते तीन सेंटीमीटर आकारापर्यंत चपटे काळसर व खरखरीत डागाप्रमाणे असतात. सूर्यप्रकाशात सतत असणाऱ्या भागांवर म्हणजेच चेहरा, गळा आणि हात यांच्यावर ते मोठ्या प्रमाणात दिसतात. अचानक आलेला काळा डाग अनेकांच्या हृदयात धडकी भरवतो. याचे कारण आपले ’गुगल डॉक्टर’. त्वचेवरील काळा डाग कॅन्सर असू शकतो असे गुगलवर कोणीतरी टाकलेले असते, आणि ते आमच्या रुग्णांची झोप उडवते. त्वचेचा कर्करोग हा हळूहळू वाढणारा, सूर्यप्रकाशात कायम असणाऱ्या त्वचेवर सहसा येतो. त्याचा रंग एक सारखा नसतो. त्याच्यावर कधी कधी व्रण असू शकतात. बहुसंख्य वेळा मस याचे निदान तपासणीद्वारे होते. जेव्हा कर्करोगाची शंका येते त्यावेळी काढलेला मस पॅथॉलॉजी तपासणीसाठी पाठविला जातो.
हे मस इलेक्ट्रिक कॉटरी, रेडियो फ्रिक्वेन्सी,किंवा लेझर ह्या किरणांचा वापर करून काढता येतात. ही एक बाह्य रुग्ण विभागात केलेली प्रोसिजर असते. काढलेल्या ठिकाणी छोटीशी जखम होते जी एक ते दोन आठवड्यात भरून येते. कधी कधी त्याचा डाग अथवा व्रण राहू शकतो. त्याला मलम लावून तो नाहीसा होतो. मध्यमवयातील चामखीळ किंवा मस हे त्वचेच्या रंगाचे आणि मऊ व लोंबते असतात. हे मस गळा, मान,व काखेत त्याचबरोबर स्त्रियांमध्ये स्तनांच्या मध्ये आणि खाली दिसून येतात. स्थूलपणा हे याचे कारण असते. या भागातली त्वचा काळी, मखमली प्रमाणे मऊ व घड्या पडलेली असते आणि त्यावर हे चामखीळ बसलेले असतात. अशावेळी मधुमेह आणि थायरॉईड त्याचबरोबर तरुण मुलींमध्ये पीसीओएसच्या तपासण्या अनिवार्य ठरतात. बरेचदा या मसांमुळे डायबेटीसचे निदान लवकर होऊ शकते.
हेही वाचा : Health Special : प्री-हॅबिलिटेशन शस्त्रक्रियेला सामोरं जाण्याची तयारी
चामखिळींशिवाय चेहऱ्यावर वयाच्या पाऊल खुणा उमटवणारी इतरही मंडळी आहेत. कोमेडोन्स – काय दचकलात ना! आपल्या आधीच्या मुरमांवरील लेखात कोमेडोन्सचा उल्लेख आहे. त्यांचा वार्धक्याशी काय संबंध? हे कोमेडोन्स सूर्यप्रकाशाच्या सातत्याने डोळ्याभोवती येतात. त्यांच्याबरोबरच तेथील त्वचा सैल पडते, ती जाडसर होते आणि पिवळट रंग येतो. हे कोमेडोन्स रेटीनॉईक ॲसिड किंवा बेंझॉइल पेरोक्सॉइड या क्रीमच्या वापराने जाऊ शकतात.
हेही वाचा : मासिक पाळीतील रक्त खरोखर अस्वच्छ, खराब असते का? वाचा डॉक्टर काय सांगतायत…
मिलीया हे त्वचेच्या रंगाचे कडक फोड चेहऱ्यावर येतात. क्वचित ते मुरमांप्रमाणे भासतात. ते सहजासहजी निघत नाहीत. त्यांना काढून टाकणे हाच एकमेव उपाय असतो. लक्षात ठेवा, मस किंवा चामखीळ हे अपायकारक नाहीत. परंतु ते सौंदर्यात बाधा आणतात. म्हणून ते काढण्याची गरज असते. परंतु ते काढल्यानंतर काही वर्षांनी शरीरात होत राहणाऱ्या बदलांमुळे पुन्हा येण्याची शक्यता असते, हे वाचकांनी लक्षात घ्यावे.