Tiffin Healthy Food: लंच ब्रेकमुळे कामाचा ताण, डेडलाइन आणि जबाबदाऱ्यांपासून काही क्षण का होईना आराम मिळतो. तसेच लंच ब्रेकमध्ये खाल्ले जाणारे पदार्थ आरोग्यासाठी पौष्टिक असणेदेखील गरजेचे असतात. नुकत्याच नोएडामधील एका शाळेने पालकांना अन्न सुरक्षेच्या कारणास्तव मुलांच्या टिफिनमध्ये फक्त शाकाहारी अन्न पदार्थ पाठवण्याचे आवाहन केले आहे, त्यामुळे आता मांसाहारी पदार्थ खराब होण्याआधी टिफिनध्ये किती काळ सुरक्षितपणे साठवले जाऊ शकतात, असा प्रश्न निर्माण होत आहे. या संदर्भात “इंडियन एक्स्प्रेस”ने आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला घेतला आहे.
“दुपारच्या डब्यामध्ये मांसाहारी पदार्थ पॅक करताना सर्वात महत्त्वाच्या घटकांपैकी एक गोष्ट म्हणजे, “डेंजर झोन” तापमान हे आहे. ५ अंश सेल्सिअस (४१°F) आणि ६० अंश सेल्सिअस (१४०°F) यांच्यातील तापमानामुळे अन्नजन्य आजारांना कारणीभूत असलेले जीवाणू वेगाने वाढू शकतात, फक्त २० मिनिटांत त्यांची संख्या दुप्पट होऊ शकते,” असे डीटी. उमंग मल्होत्रा, क्लिनिकल आहारतज्ज्ञ, फिटेरो यांनी सांगितले.
मल्होत्रा यांनी सांगितले की, “मांसाहारी पदार्थ, मटण, चिकन आणि सीफूडमध्ये पोषक आणि आर्द्रता असते, जी जीवाणूंच्या वाढीसाठी आवश्यक आहे. ज्यामुळे साल्मोनेला, ई. कोलाय, कॅम्पिलोबॅक्टर आणि लिस्टेरिया मोनोसाइटोजेन्सची वाढ सहज होते.”
त्यांनी पुढे सांगितले की, “जेव्हा मांसाहारी पदार्थ टिफीनमध्ये पॅक केले जातात आणि बरेच तास ते तुमच्या बॅगेमध्ये नॉर्मल टेंपरेचरवर असतात. हे विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घातक ठरू शकतात. कारण या काळात खोलीचे तापमान सहजपणे २० अंश सेल्सिअस (६८°F) पेक्षा जास्त असू शकते. अशा परिस्थितीत सॅल्मोनेला आणि स्टॅफिलोकोकस ऑरियससारखे जीवाणू शिजवलेल्या चिकन किंवा इतर मांसाहारी पदार्थांमध्ये वेगाने वाढू शकतात, ज्यामुळे अन्न विषबाधा होण्याचा धोका जास्त असतो.
टिफिनमध्ये हे पदार्थ घेऊन गेल्यास काय होईल?
तज्ज्ञांच्या मते मांसाहारी पदार्थ टिफिनमध्ये घेऊन जाणं शक्यतो टाळायला हवं.
कच्चे किंवा कमी शिजलेले मांस
कच्च्या किंवा कमी शिजलेल्या मांसाहारी पदार्थांमध्ये बॅक्टेरिया (कॅम्पायलोबॅक्टर, साल्मोनेला, स्टॅफिलोकोकस ऑरियस) असू शकतात, जे योग्यरीत्या साठवले नसल्यास यातील धोका त्वरीत वाढू शकतो.
सीफूड्स
मासे, कोळंबी, झिंगा आणि इतर सीफूड्स खोलीच्या तापमानावर लवकर खराब होतात.
डेअरीआधारित सॉस
क्रीम किंवा डेअरीआधारित सॉसमध्ये शिजवलेले मांस किंवा पोल्ट्री (जसे की बटर चिकन) डेअरीच्या नाशवंत स्वरूपामुळे जलद खराब होतात.
किसलेले मांस
ग्राउंड किंवा minced meats च्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ जास्त असते, ज्यामुळे जीवाणू दूषित होण्याचा धोका वाढतो.
हेही वाचा: कमी प्रमाणात मद्यपान केल्यानेही वाढू शकतो कर्करोग होण्याचा धोका? वाचा तज्ज्ञ काय सांगतात
हे पदार्थ टिफीनसाठी योग्य
दुसरीकडे, चिकन सॉसेजेस आणि चिकन सलामी यांसारख्या पदार्थांमध्ये ओलावा कमी असतो आणि त्यावर अनेकदा संरक्षकांनी उपचार केलेले असतात, ज्यामुळे त्यांच्यात बॅक्टेरियाच्या वाढीचे प्रमाण कमी होते. कच्च्या किंवा कमी शिजलेल्या अंड्यांच्या तुलनेत कडक उकडलेली अंडी खराब होण्याची शक्यता कमी असते.
“ग्रील्ड किंवा बेक केलेले चिकन जे पूर्णपणे शिजवून कोरडे ठेवले जाते ते तळलेले किंवा मसालेदार चिकनच्या तुलनेत जास्त काळ टिकते,” असे त्यांनी सांगितले.
या गोष्टींची घ्या काळजी
“मांसाहारी अन्न पॅक केल्याच्या दोन तासांच्या आत किंवा वातावरणातील तापमान ३० अंश सेल्सिअस (८६° F) पेक्षा जास्त असल्यास एका तासाच्या आत खावे,” असा सल्ला तज्ज्ञांनी दिला.
त्यांच्या मते, लंच बॅगमध्ये बर्फ किंवा हॉट पॅक टाकल्यास डेली मीट किंवा सॅलेडसारखे थंड पदार्थ ५°C च्या खाली किंवा आवश्यक तापमानानुसार ठेवता येतात. जर शाळा, कॉलेज किंवा ऑफिसमध्ये अन्न पदार्थ पुन्हा गरम करण्याची सुविधा असेल, तर तुम्ही जेवणापूर्वी ६० अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमानात जेवण पुन्हा गरम करू शकता.
© IE Online Media Services (P) Ltd