Morning Black Coffee : अनेक जण दिवसाची सुरुवात एक कप ब्लॅक कॉफीने करतात. स्ट्राँग चव आणि कॅफिन किकसाठी ओळखली जाणारी ब्लॅक कॉफी ऊर्जा आणि चयापचय क्षमता वाढवण्यासाठी फायदेशीर मानली जाते.
फोर्टिस हॉस्पिटल, बंगळुरू येथील वरिष्ठ सल्लागार गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. प्रणव होन्नावरा श्रीनिवासन द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगतात, “एक महिना दररोज ब्लॅक कॉफी प्यायल्याने अनेक आरोग्याचे फायदे मिळू शकतात. त्यातील अँटिऑक्सिडंट्स, कॅफिन आणि व्हिटॅमिन्स बी शरीराला आवश्यक पोषक घटक पुरवतात.”

ब्लॅक कॉफी पिण्याचे फायदे

सतर्कता आणि एकाग्रता सुधारते : ब्लॅक कॉफी पिण्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे मानसिक सतर्कतेवर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. कॉफीमधील कॅफिन सेन्ट्रल नर्व्हस सिस्टिमचा उत्तेजक म्हणून काम करते, तसेच मेंदूतील अॅडेनोसिन रिसेप्टर थांबवते, ज्यामुळे दिवसा झोप येत नाही आणि कॅफिन एड्रेनालाईन, नॉरपेनेफ्रिन आणि डोपामाइनसारखे हार्मोन्स सोडण्यास मदत करते, जे आपला उत्साह वाढवण्यास मदत करतात.

शारीरिक कार्यक्षमता वाढते : कॅफिन रक्तप्रवाहात अ‍ॅड्रेनालाईनची पातळी वाढवण्यास मदत करते, जे शारीरिक कार्यक्षमता वाढवतात.

चयापचय क्षमता वाढते आणि फॅट कमी होते : ब्लॅक कॉफी चयापचय क्षमता ३-११ टक्क्यांनी वाढवते. तसेच याच्या सेवनाने फॅट कमी होण्यास मदत होते. कॅफिनचे प्रमाण थर्मोजेनेसिसला उत्तेजित करते, ज्यामुळे शरीर ऊर्जा निर्माण करते.

शरीराला अँटिऑक्सिडंट्स पुरवतात : ब्लॅक कॉफीमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे शरीरातील फ्री रॅडिकल्सचा सामना करतात. हे अँटिऑक्सिडंट्स छातीतील जळजळ कमी करतात आणि शरीरातील पेशींचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

ब्लॅक कॉफी पिण्याचे दुष्परिणाम

डॉ. श्रीनिवासन सांगतात, “कॅफिनमुळे मूडवर सकारात्मक परिणाम दिसून येतो, कारण कॅफिन डोपामाइन हार्मोन सोडते, ज्यामुळे आपण आनंदी होतो किंवा खूश होतो. पण, अतिप्रमाणात कॅफिनच्या सेवनाने तणाव, अस्वस्थता आणि चिडचिडेपणा वाढू शकतो, कारण कॅफिन कोर्टिसोलचे प्रमाणसुद्धा वाढवते, ज्यामुळे तणाव वाढू शकतो.”

ते पुढे सांगतात की, ब्लॅक कॉफीमधील कॅफिन अॅडेनोसिन रिसेप्टर्सना ब्लॉक करतात, ज्यामुळे झोपेमध्ये व्यत्यय येऊ शकतो. अॅडेनोसिन रिसेप्टर्स झोपेचे वेळपत्रक पाळण्यास महत्त्वाची भूमिका बजावतात. जर तुम्ही महिनाभर दररोज कॉफीचे सेवन केले तर त्यामुळे झोपेचे आरोग्य बिघडू शकते, ज्याचा संपूर्ण आरोग्यावर परिणाम दिसून येईल. झोपेचे आरोग्य बिघडू नये म्हणून झोपायच्या कमीत कमी सहा तास आधी कॉफी पिणे टाळावे.

“जर तुम्ही एक महिना ब्लॅक कॉफी पित असाल तर त्याचा मूड आणि मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसून येईल, पण जर ब्लॅक कॉफीचे सेवन नियंत्रित केले नाही तर त्याचा नकारात्मक परिणाम मानसिक आरोग्यावर आणि झोपेवर दिसून येईल. ब्लॅक कॉफीचे दुष्परिणाम टाळण्यासाठी आणि याचे फायदे मिळवण्यासाठी कॉफीचे सेवन संतुलित करावे”, असे डॉ. श्रीनिवासन सांगतात.

उपाशी पोटी ब्लॅक कॉफी का पिऊ नये?

उपाशी पोटी ब्लॅक कॉफी अनेक जण पितात, पण त्याचा परिणाम पचनशक्ती आणि संपूर्ण आरोग्यावर होऊ शकतो, असे डॉ. श्रीनिवासन सांगतात. “कॉफी, विशेषतः ब्लॅक कॉफी हे पोटातील अॅसिड (हायड्रोक्लोरिक अॅसिड -HCL) उत्तेजित करू शकतात. उपाशी पोटी सेवन केल्याने पोटातील अॅसिड वाढू शकते, ज्यामुळे अस्वस्थता, गॅस्ट्रिक अॅसिडिटी किंवा छातीत जळजळ वाटू शकते.”

डॉ. श्रीनिवासन पुढे सांगतात, “उपाशी पोटी कॉफी प्यायल्याने कॅफिनचे खूप लवकर शोषण होऊ शकते, ज्यामुळे कोर्टिसोल हार्मोन जे तणाव निर्माण करतात, त्यामध्ये वाढ होऊ शकते. विशेषतः ज्या लोकांना आधीच एन्झायटी संबंधित समस्या असेल त्यांना तणाव येऊ शकतो, चिडचिड होऊ शकते आणि पॅनिक अटॅकसुद्धा येऊ शकतो.