Garlic Peels For Health: लसूण ही पोषक घटकांचे पॉवरहाऊस आहे, जी आरोग्यदायी फायद्यांसाठी ओळखली जाते. बेंगळुरू येथील एस्टर व्हाईटफील्ड हॉस्पिटलचे सल्लागार व डर्मेटोलॉजिस्ट डॉ. प्रियंका कुरी यांच्या मते, लसूण केवळ एक उत्कृष्ट प्रतिकारशक्ती वाढवणारेच नाही, तर त्वचा स्वच्छ राखण्यासही मदत करते. परंतु, लसणाचे दररोज जास्त प्रमाणात सेवन केल्याने छातीत जळजळ, अॅसिडिटी व श्वासाची सतत दुर्गंधी यांसारखे दुष्परिणाम उदभवू शकतात.
तसेच इंडियन एक्स्प्रेस डॉटकॉमने लसणाच्या सालीचे काय करावे? याबाबतही तज्ज्ञांना सल्ला विचारला.
लसणाची साल खावी का?
सर्वांगीण आहारतज्ज्ञ वृत्ती श्रीवास्तव यांनी अनेक कारणांमुळे लसणाच्या सालीचे सेवन न करण्याचा सल्ला दिला आहे. “लसणाची कळी स्वतःच आरोग्यदायी फायद्यांनी युक्त असते. विशेषत: मुख्यत: त्यातील शक्तिशाली अँटिऑक्सिडंट ॲलिसिनमुळे. हे संयुग लसूण सेवन केल्यावर खूप फायदेशीर बनवते. परंतु, लसणाची साल कागदासारखी, तंतुमय व पचण्यास कठीण असते.”
श्रीवास्तव यांनी सालींमध्ये कीटकनाशकांचे अवशेष असल्याबद्दलची माहिती दिली. “कांद्याच्या सालींप्रमाणेच लसणाच्या सालीचे सेवन केल्यावर पौष्टिक हेतू साध्य होत नाही. त्यामुळे त्या टाकून देणे चांगले,” असे त्या म्हणाल्या.
परंतु, त्यांनी लसणाच्या सालींचा पर्यायी वापर सुचवला. “त्यांना फेकून देण्याऐवजी तुम्ही त्यांना रात्रभर पाण्यात उकळू शकता किंवा भिजवू शकता आणि मग ते पाणी बागेसाठी वापरू शकता. त्यातील प्रतिजैविक गुणधर्म वनस्पतींचे कीटक आणि जीवाणूंपासून संरक्षण करण्यास मदत करतात. लसणाच्या सालींमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे व फायटोन्यूट्रिएंट्सदेखील असतात; ज्यामुळे वनस्पतींच्या वाढीला फायदा होतो,” असे त्या म्हणाल्या.
लसणाचे फायदे कसे वाढवायचे?
आरोग्यदायी फायद्यांसाठी श्रीवास्तव यांनी लसणाच्या पाकळ्या ठेचून चघळण्याची शिफारस केली आहे. “लसणामध्ये ॲलिसिन असते. त्यामधील शक्तिशाली अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-इम्फ्लेमेटरी गुणधर्मामुळे रक्तवाहिन्या विस्तारित होण्यास मदत मिळते आणि ऑक्सिजनचे सेवन सुधारते. विशेषत: प्रदूषित शहरांमध्ये राहणारे लोक, मॅरेथॉन धावपटू, ट्रेकर्स व पर्वतारोहकांसाठी ते फायदेशीर ठरते.
त्यांनी सांगितले की, लसूण कोलेस्ट़्रॉलची पातळी नियंत्रित करण्यात मदत करण्यासाठीही ओळखली जाते. त्यामुळे तो संतुलित आहाराचा एक मौल्यवान भाग आहे. लसणाची साल नेहमीच्या आहारामध्ये वापरासाठी योग्य नसली तरी त्याचा कीटकनाशक म्हणून वापर करता येऊ शकतो.