पित्तप्रकोपामध्ये दिसणारे महत्त्वाचे लक्षण म्हणजे शीतेच्छा! शीतेच्छा म्हणजे शीत इच्छा, अर्थात शीतसेवनाची (शीत आहाराची व शीत विहाराची) इच्छा. शीत आहार म्हणजे शरीरामध्ये थंडावा वाढवणार्या आहाराच्या सेवनाची इच्छा. जसे-दूध, तूप, लोणी, नारळाचे पाणी, गुलाबजल, वाळा, सब्जा, केळे, पेरु, सीताफळ, कलिंगड, वगैरे; तर शीत विहार म्हणजे थंड जमिनीवर झोपावेसे वाटणे, थंड वाऱ्याची झुळूक हवीशी वाटणे, थंड पाण्यामध्ये पाय बुडवून ठेवावेसे वाटणे, अंगावर चंदन-गुलाब-वाळा-मेंदी,वगैरेचा लेप लावावासा वाटणे, ऊबदार कपडे टाळून हलके-सुती कपडे घालावेसे वाटणे, दिवसभरातली गारव्याची वेळ (सकाळ व संध्याकाळ) आवडणे, वर्षातले हिवाळा व पावसाळा हे शीत ऋतु हवेसे वाटणे, वगैरे. अशी ही शीत आहाराची व शीत विहाराची इच्छा तुम्हाला होत असेल तर तुमच्या शरीरामध्ये पित्तप्रकोप (पित्तदोषाची वाढ) होत असल्याचे किंवा झाल्याचे निदान करता येते.
हेही वाचा : Health Special: पोषक सुपांची गोष्ट
हातापायांची, विशेषतः तळहात-तळपायांची-डोळ्यांची आग होणे, डोक्यामध्ये आग होणे किंवा सर्वांगाची आग होणे, डोळे लाल होणे, वारंवार तोंड येणे,गुदमार्गावाटे रक्त जाणे या व अशा अन्य तक्रारी सरळसरळ पित्तप्रकोप दर्शवतात व अशा व्यक्तींना होणारी शीतेच्छा स्पष्टपणे लक्षात येते. मात्र काही वेळा रुग्णामध्ये अन्य कोणताही त्रास नसतो, अर्थात ज्याला ठोसपणे पित्तप्रकोपजन्य आजार म्हणता येईल असा कोणताही त्रास तर दिसत नसतो, मात्र वर सांगितलेले ’शीतेच्छा’ हे लक्षण प्रकर्षाने दिसते.ज्यावरुन त्याच्या शरीरामधील पित्तप्रकोपाचे निदान करता येते.
हेही वाचा : Mental Health Special: कस्टमर केअर नंबरवरुन फ्रॉड्स कसे होतात? काय काळजी घ्यावी?
विशेष म्हणजे या तक्रारी आधुनिक वैद्यकशास्त्र व संबंधित डॉक्टरांच्या तुलनेने नगण्य असतात. शिवाय या तक्रारी सांगणा र्या रुग्णांमध्ये सर्व तपासण्या नॉर्मल येतात. आधुनिक वैद्यकाचे दृष्टीने रुग्णाच्या त्रासापेक्षा तपासण्यांना अधिक महत्त्व असल्याने या तक्रारीमागचे मूळ शोधण्याचा विचारही केला जात नाही. प्रत्यक्षात हे रुग्ण आभ्यन्तर पित्तप्रकोपाने त्रस्त असतात. ही लक्षणे शरद ऋतुमधल्या उन्हाळ्यामध्ये वाढलेली दिसतात.कारण हा जात्याच पित्तप्रकोपाचा अर्थात शरीरामध्ये पित्त वाढण्याचा काळ आहे. या सर्व पित्तप्रकोपजन्य विकृतींना आयुर्वेदीय पित्तशामक उपचाराने चांगला आराम मिळालेला दिसतो.