Herbal Pan Masala: भारतातील अनेक लोक पान मसाला आणि गुटखा यांसारख्या तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात. या तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांत प्रचलित आहे, ज्यामुळे मौखिक आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या उद्भवतात. या समस्यांमुळे बऱ्याचदा घातक रोगांचा धोका वाढतो. हे धोके, समस्या माहीत असूनही लोक या पदार्थांच्या व्यसनाधीन झाले आहेत, त्यामुळे हे व्यसन सोडवणे खूप कठीण झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (२०१६) च्या संशोधन अभ्यासानुसार, ल्युकोप्लाकिया, सबम्यूकस फायब्रोसिस, एरिथ्रोप्लाकिया आणि लाइकेन प्लॅनस यांसारख्या मौखिक कर्करोगाच्या स्थितीचे प्रमाण तंबाखूचे सेवन न करणाऱ्यांमध्ये ३.१७ टक्के आणि तंबाखू सेवन करणाऱ्यांमध्ये १२.२२ टक्के होते.

इंडियन जर्नल ऑफ कॅन्सर (२०१५) च्या दुसऱ्या अभ्यासात पान मसाल्याच्या जीनोटॉक्सिक प्रभावांवर प्रकाश टाकण्यात आला आणि हेपॅटोटॉक्सिसिटीची नोंद करण्यात आली, ज्यामध्ये वाढलेली एंजाइमची पातळी आणि बाधित कार्बोहायड्रेट तसेच लिपिड चयापचयची विशेषतः आहे. तसेच नेफ्रोटॉक्सिसिटी जे क्रिएटिनिनच्या स्तरात वाढ आणि शुक्राणूंच्या विकृतीद्वारे दर्शविली जाते.

डॉ. रवी कुमार झा, फोर्टिस एस्कॉर्ट्स हॉस्पिटल, फरिदाबाद येथील पल्मोनोलॉजिस्ट म्हणाले की, “पान मसाल्यातील निकोटीन आणि इतर सायकोएक्टिव्ह पदार्थ मज्जासंस्थेला उत्तेजित करतात, ज्यामुळे काही क्षण शरीरात सतर्कता आणि उत्साही असल्यासारखे वाटते. ज्यामुळे नंतर व्यसन, चिडचिडेपणा आणि चिंता यांसारखी लक्षणे दिसून येतात. ते पुढे म्हणाले की, “पान मसाल्याचा दीर्घकाळ वापर केल्याने रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होऊ शकते, ज्यामुळे शरीराला संक्रमण आणि गंभीर रोग होण्याची शक्यता वाढते.”

पारंपरिक पान मसाल्यामध्ये कात, सुपारी, चुना, बडीशेप, वेलची, गोड पदार्थ, पुदिन्याची पाने, मेन्थॉल आणि तंबाखूसह किंवा त्याशिवाय विविध चव वाढवणाऱ्या पदार्थांचा समावेश असतो. डॉ. सुषमा सुमित, आयुर्वेद चिकित्सक आणि पुण्यातील इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेंटर (ICTRC) मधील वरिष्ठ रिसर्च फेलो यांनीदेखील सांगितले की, “तंबाखूसह खजूर, गुलाबाच्या पाकळ्या, गुलकंद यांसारख्या गोड पदार्थांचा वापर केला जातो. यात पचनासंबंधित गुण तसेच एक उत्तम गंध असतो. परंतु, हे नियमित सेवन करू नये; विशेषतः तंबाखूसह याचे सेवन योग्य मानले जात नाही.”

या पार्श्वभूमीवर आयुर्वेदिक पान मसाला आणि गुटखा यांसारख्या आयुर्वेदिक घटकांनी बनवलेले पर्यायी हर्बल पदार्थ आणण्यात आले आहेत, जे तुमच्या सतत चघळण्याच्या सवयींमध्ये बदल घडवू शकतात.

पण, यांचा वापर करणं योग्य आहे का? हे योग्य काम करतात का?

हर्बल पान मसाल्यांमध्ये काँच बीजा (मुकुना प्रुरिएन्स बियाणे), चिंच, आवळा, हळद, वेलची, केशर, अश्वगंधा, ग्लायसिरिझा ग्लेब्रा, मेन्थॉल आणि इतर फायदेशीर औषधी वनस्पती असतात. “हे तंबाखूपासून मुक्त आणि याचे व्यसन लागत नाही,” असे सुमित यांनी सांगितले.

आयुर्वेदिक अभ्यासक डॉ. दीक्षा भावसार सावलिया यांनी सांगितले की, “हे मिश्रण तुम्हाला ताजेतवाने ठेवतात, यामुळे दुर्गंधी टाळता येते आणि हे पचनास मदत करतात, तंबाखूचे सेवन करणाऱ्यांसाठी संभाव्य बदल म्हणून हे योग्य काम करते आणि त्यांना व्यसन सोडण्यापासून दूर करण्यास मदत करते.”

आयुष वेलनेस, गुडका, उत्तर प्रदेशचे हर्बी च्यू आणि सरकारचे सीएसआईआर-सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक प्लांट्स (सीआयएमएपी) यांसारखे ब्रँड अशा हर्बल माउथ फ्रेशनर्स बनवतात. यांची किंमत पाच पॅकेटसाठी २९५ रुपयांपासून ते ५० पॅकेटसाठी ३९५ रुपयांपर्यंत आहे. महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) मान्यता दिली आहे, ते उत्पादन अधिक चघळण्यायोग्य आणि आनंददायक बनवण्यासाठी आयुर्वेदिक औषधी वनस्पती आणि बियांचा वापर करतात. “हे उत्पादन तंबाखूजन्य पदार्थांच्या सवयीनुसार खाण्यावर काम करते, ज्यामुळे व्यसनी लोकांना तंबाखूचे व्यसन सोडण्यास मदत होईल,” असे गुडका – अनंतवेद रिसर्च लॅब, पुणे येथील डॉ. राजस नित्सुरे यांनी ‘द इंजियन एक्स्प्रेस’ला सांगितले.

या गोष्टी ठेवा लक्षात

मुंबईतील ज्येष्ठ चिकित्सक आणि क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट डॉ. रूही पीरजादा यांनी सांगितले की, हर्बलचा पर्याय कॅन्सरसारखे आजार देणाऱ्या गुटखा आणि पान मसालापेक्षा सुरक्षित आहेत, परंतु त्यांनी सावधगिरीने सांगितले की, “कोणताही पान मसाला सुरक्षित नाही, जरी तो तंबाखूसह किंवा त्याशिवाय असला तरीही.”

हर्बल पान मसाल्यांमध्ये तंबाखू किंवा निकोटीन नसले तरीही त्यात जास्त प्रमाणात चुना, सुपारी आणि इतर हानिकारक घटक असतात, ज्यामुळे हिरड्यांचे आजार, दात किडणे आणि संभाव्य तोंडाचा कर्करोग यांसारख्या मौखिक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात,” असे कार्यात्मक औषधतज्ज्ञ शिवानी बाजवा यांनी सांगितले.

त्यांनी असेही सांगितले की, काही हर्बल घटकांचे दुष्परिणाम ते जास्त प्रमाणात घेतल्यास होऊ शकतात, याच्या दीर्घकालीन वापरामुळे लोक त्यावर अवलंबून राहू शकतात. गुटखा आणि तंबाखूचे व्यसनाधीन स्वरूप केवळ निकोटीनमुळे नाही तर लोकांच्या मनोवैज्ञानिक कारणांवरसुद्धा आधारित आहे. तसेच हर्बल पान मसाल्यांची निवड केल्याने अंतर्निहित व्यसन आणि वर्तणुकीच्या पैलूंवर लक्ष केंद्रित केले जाऊ शकत नाही.”

डिक्सा म्हणाले की, “ज्यांना पान मसाल्याचे व्यसन आहे”, त्यांनाच हर्बल पर्याय वापरण्याचा सल्ला देतात. पण, याच्या अतिसेवनाचा सल्ला दिला जात नाही.

हेही वाचा: पावसाळ्यात सांधेदुखीचा जास्त त्रास का होतो? तज्ज्ञांनी सांगितले ‘हे’ आयुर्वेदिक उपाय

इतर पर्यायदेखील फायदेशीर

तुमच्या आरोग्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे तुम्ही तंबाखू, गुटखा खाणं पूर्णपणे सोडणे, असे बाजवा यांनी सांगितले.

सुरक्षित पर्याय

तुम्ही तंबाखू आणि गुटख्याला सुरक्षित पर्याय शोधत असाल, तर खालील पर्याय निवडा

बियाणे आणि काजू

तुम्हाला सतत तंबाखू, गुटखा चघळण्याची सवय असेल तर तुम्ही सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया किंवा अगदी भाजलेले चणेदेखील खाऊ शकता.

फ्लेव्हर्ड च्युइंगम

विविध फ्लेवर्समध्ये साखर विरहित च्युइंगम तुम्हाला फ्रेश ठेवतील.

ताजी फळे आणि भाज्या

गाजर, काकडी किंवा सफरचंद यांसारखी फळे आणि भाज्या चघळण्याची इच्छा पूर्ण करण्याचा एक आरोग्यदायी ऑप्शन आहे.

हार्ड कँडी

शुगर-फ्री हार्ड कँडीज तुम्हाला ताजेतवाने करण्यात आणि तात्पुरती गोड चव प्रदान करण्यात मदत करू शकतात.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is herbal paan masala safe to quit tobacco gutkha addiction what the experts say sap