Coconut Milk Benefits : भारतीय खाद्यसंस्कृतीत नारळ हा महत्त्वाचा भाग आहे. अनेक पदार्थांमध्ये आपण नारळाच्या खोबऱ्याचे वापर करतो. विशेषत: कोकण आणि दक्षिण भारतातील पदार्थांमध्ये नारळाचा अधिक वापर दिसून येतो. कारण नारळात आरोग्यासाठी फायदेशीर अनेक पोषक घटक असतात. यातही नारळाचे दूध आरोग्यासाठी भरपूर फायदेशीर मानले जाते. नारळाचे दूध केवळ स्वादिष्टच नाही तर ते पोषक तत्वांनीदेखील परिपूर्ण असते

पण, बाहेरून नारळाचे दूध खरेदी करून आणण्यापेक्षा तुम्ही घरी नारळ किसून त्यापासून सहज दूध काढू शकता. यात थो़डे पाणी आणि चवीसाठी तु्म्ही चिमूटभर मीठ किंवा साखर मिसळू शकता. तुम्हाला मलाईदार नारळाचे दूध प्यायचे असल्यास हे मिश्रण काहीवेळ चांगले ढवळत राहा.

लॅक्टोज इनटॉलेरेंस असलेल्या किंवा ज्यांना बाहेरचे डेअरी प्रोडक्ट्स आवडत नाही अश्यांसाठी घरी बनवलेले नारळाचे दूध उत्तम पर्याय आहे. कारण नारळाचे दूध हे शक्तीवर्धक मानले जाते. ह्रदयाचे आरोग्य राखण्यासाठीदेखील हे उपयुक्त असते. यामुळे ह्रदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो.

याचविषयावर आहारतज्ज्ञ पूजा पालरीवाला यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली ती आपण जाणून घेऊ..

नारळाच्या दुधाने हृदयविकाराचा धोका होतो कमी?

आहारतज्ज्ञ पालरीवाला यांच्या मते, घरी बनवलेल्या नारळाच्या दुधाचे कमी प्रमाणात सेवन केल्यास हृदयाचे आरोग्य राखता येऊ शकते. कारण त्यामध्ये फॅट्स असतात, जे चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करतात आणि खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करतात, ज्यामुळे तुमच्या हृदयाला फायदा होतो. त्यात सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाणही जास्त असल्याने तुम्ही हृदयासाठी अनुकूल असणाऱ्या फळे आणि भाज्यांबरोबर त्याचे सेवन करणे गरजेचे आहे. यामुळे आरोग्याचे संतुलन राखण्यास मदत होईल.

बंगळुरूमधील ॲस्टर व्हाईटफिल्ड हॉस्पिटलमधील ज्येष्ठ आहारतज्ज्ञ अर्चना एस यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हटले की, नारळाचे दूध खरोखर हृदयविकाराचा धोका कमी करू शकते की नाही हे सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे त्यावर पुरेसा असा अभ्यास किंवा संशोधन झालेले नाही. परंतु, आहारात नारळाच्या दुधाचा समावेश करणे हृदयाच्या आरोग्यासाठी नक्कीच एक चांगला पर्याय आहे. त्यामध्ये मीडियम-चेन ट्रायग्लिसराइड्स (एमसीटी) असतात, जे हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहन देतात आणि शरीरातील चांगल्या एचडीएल कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढवून लिपिड प्रोफाइल सुधारतात.

हेही वाचा – तुमची त्वचा तेलकट होण्यामागे मीठ, साखरसह ‘हे’ पदार्थ ठरतायत कारणीभूत; उपायांसाठी डॉक्टरांचा सल्ला वाचाच

नारळाच्या दुधात पोटॅशियम असते, जे रक्तदाब नियंत्रित करण्यासदेखील मदत करते, त्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगांचा धोका कमी होतो.

पालरीवाला यांनी घरी तयार केलेल्या नारळाच्या दुधाचे फायदे सांगितले आहेत. त्यांच्या मते, घरी बनवलेल्या नारळाच्या दुधाचा पहिला फायदा म्हणजे त्यात कोणत्याही प्रकारची भेसळ, केमिकल नसते; त्यामुळे ह्रदयाच्या आरोग्यासाठी त्या सेवनाने कोणताही धोका नसतो. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यात मीठ किंवा साखर मिसळू शकता, तसेच त्यातील पोषक घटक टिकवून ठेवू शकता.
इतकेच नाही तर तुमचे पैसे वाचतात आणि कोणतेही पॅकेजिंग किंवा काही नसल्याने पर्यावरणाचेही रक्षण होते.

घरी बनवलेल्या नारळाच्या दुधापासून आरोग्यास कोणते धोके आहेत का?

हृदयविकार, हाय कोलेस्ट्रॉल किंवा मधुमेह अशा आजारांचा सामना करणाऱ्या लोकांनी नारळाचे दूध माफक प्रमाणात प्यावे. कारण नारळाच्या दुधात असलेले हाय सॅच्युरेटेड फॅटमुळे हृदयरोग आणि इतर आरोग्य समस्यांचा धोका वाढू शकतो. अशावेळी जोखीम कमी करण्यासाठी तुम्ही त्यात नट आणि एवोकॅडो अशा गोष्टी मिक्स करून खाणे फायदेशीर ठरू शकते. तसेच भरपूर फळे आणि भाज्या खाणे, असा सल्ला आहारतज्ज्ञ पालरीवाला यांनी दिला.