मुक्ता चैतन्य

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुलांचा वाढणारा स्क्रीन टाइम हा सगळ्यांसाठीच काळजीचा विषय आहे. मुलांचा नुसता स्क्रीन टाइम जास्त नाहीये तर त्याचा मुलांवर विविध स्तरांवर परिणाम होतो आहे. मुलांमध्ये नैराश्याचं प्रमाण वाढतंय, त्यामागे सोशल मीडिया असू शकतो असं सांगणारी संशोधनं पुढे येऊ लागली आहेत. मोबाईल वरुन घराघरात मुलं आणि पालकांमध्ये भांडणं होतात आणि काही वेळा मुलं आणि पालक सगळेच प्रचंड हिंसक बनून एकमेकांना मारहाणही करतात. इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियावर लहान वयात येणाऱ्या मुलांमध्ये स्वप्रतिमेचे प्रश्न तयार होताना दिसतात. गुगलमुळे प्रचंड डिपेन्डन्सी तयार झालेली आहे. एक ना अनेक.. पण हे सगळे मनोसामाजिक परिणाम झाले. शारीरिक परिणामांमध्ये पाठीचे, डोळ्यांचे बोटांचे आजार वाढले आहेत. पण स्क्रीन टाईमचा आपल्या मुलांच्या मेंदूवर आणि मेंदूच्या वाढीवर काही परिणाम होतो का? तर, या विषयीही आता अभ्यास सुरु आहेत.

अमेरिकेतल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या वतीने पौगंडावस्थेतल्या मुलामुलींना घेऊन एक प्रचंड मोठं संशोधन २०१५ मध्ये सुरु झालं आहे. या संशोधनात ९ ते १० वर्ष वयोगटातली ११७५० मुलं मुली सहभागी झाले आहेत. ज्यात २१०० जुळे आणि तिळे सुद्धा आहेत. या मुलांच्या मेंदूच्या वाढीचा अभ्यास सलग १० वर्ष सुरु आहे. या संशोधनाचे नाव आहे ABCD म्हणजे ऍडोलसन्ट ब्रेन कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट स्टडी. यात आजूबाजूच्या वातावरण, त्यांच्या सवयी, झोपेचा पॅटर्न, ड्रग्स, आर्टपासून ते स्क्रीन टाईम पर्यंत विविध गोष्टींचा मुलांच्या मेंदूच्या आकलन विकासावर काय आणि कसा परिणाम होतो याचा अभ्यास केला जातोय. वर्षातून एकदा किंवा दोनदा या सगळ्या मुलांच्या ब्लड प्रेशरपासून एमआरआय पर्यंत अनेक चाचण्या केल्या जातात. त्यांच्या प्रदीर्ध मुलाखती घेतल्या जातात. त्यांच्या वर्तणुकीची निरीक्षणं नोंदवली जात आहेत. येत्या दोन वर्षात हा अभ्यास संपेल. पण आजवर झालेल्या अभ्यासातले काही महत्वाचे तपशील या प्रकाशित करण्यात आले होते.

आणखी वाचा-Mental Health Special : दिवाळीत बिंज वॉच करणार आहात? मग हे वाचाच!

२०१९ मध्ये या अभ्यासाची काही निरीक्षणे शास्त्रज्ञ आणि संशोधकांनी प्रसिद्ध केली त्यानुसार, ज्या मुलांचा स्क्रीन टाइम खूप जास्त आहे त्यांच्या मेंदूतल्या कॉर्टेक्सचा स्तर पातळ होतोय. कॉट्रेक्स म्हणजे मेंदूचं बाहेरचं आवरण. ज्याचा संबंध थेट आपल्या आकलनाशी असतो. कॉग्निटिव्ह विकासाशी असतो. हे आवरण पातळ होत जाणं ही काही चांगली गोष्ट नाहीये. पहिल्या निरीक्षणानुसार ज्या मुलांचा स्क्रीनटाईम दोन तासांपेक्षा जास्त आहे त्या मुलांना थिंकिंग अँड लँग्वेज टेस्ट म्हणजे विचार आणि भाषा यांच्याशी निगडित चाचण्यांमध्ये अतिशय कमी मार्क मिळाले. ऑनलाईन जगातला अतिवावर अनेकदा आपल्याला स्वतंत्र विचार करु देत नाही. ऑनलाईन जगातले अल्गोरिदम्स आपण काय विचार करावा, आपण काय बघावं, काय ऐकावं, काय वाचावं हे ठरवतात आणि त्यानुसारच गोष्टी आपल्या पुढे येतात. मुलांच्या बाबतीत जेव्हा हे होतं तेव्हा ते त्यांच्याही नकळत कोंडीत अडकल्यासारखे होतात. उदा. द्यायचं झालं तर सतत युट्युब चॅनल्स बघणारी मुलं त्या युट्युबर्सच्या भाषेत आणि स्वरातच बोलायला सुरुवात करतात. त्यांच्या भवतालात असलेल्या गोष्टी, आवाज, माणसं, त्यांच्या बोलण्याच्या पद्धती या सगळ्यापासून ते तुटत जातात. वाचन कमी झाल्यामुळे शब्दसंपदा कमी असते. त्यात वाढ होत नाही. भाषा विविध पद्धतीने वापरता येऊ शकते हा अनुभव घ्यायचाच राहून जातो आणि ऑनलाईन जगात भाषा जशी वापरली जातेय तशीच वापरण्याकडे कल जातो. या कुठल्याच गोष्टी मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी पोषण नाहीयेत.

ABCD मधील दहा वर्षांचे निकाल, निरीक्षणे येत्या दोन वर्षात आपल्या हातात येतीलच आणि अति स्क्रीन टाइममुळे वाढीच्या मेंदूवर नेमका काय परिणाम होतो हेही समजेल. पण तोवर स्क्रीनटाईम मर्यादित कसा ठेवता येईल याचा विचार करायला हवा. मोबाईल, त्यावरची गाणी, युट्युब चॅनल्स आणि या सगळ्यामुळे पालक वर्गाला मिळणारा कॅव्हिनिअन्स आपल्या मुलांच्या वाढीपेक्षा महत्वाचा नाही. तेव्हा पुढच्यावेळी आपल्याला वेळ नाही म्हणून मुलांच्या हातात मोबाईल देताना चार वेळा विचार करा. आपण आपल्याच हातांनी त्यांची वाढ तर खुंटवत नाहीयोत ना?

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is mobile affecting childrens brains hldc mrj
Show comments