Eating Food : अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या तीन महत्त्वाच्या गरजा आहेत. अन्नाशिवाय माणूस जगू शकत नाही. काही लोकांना खाण्याची भरपूर आवड असते. ते दर तासांनी काही ना काही खात असतात, तर काही लोक वजन वाढीच्या भीतीने अति खाणे टाळतात. पण तुम्हाला माहिती आहे का, शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि भूक नियंत्रित ठेवण्यासाठी दर दोन तासांनी खाणे आरोग्यासाठी खूप चांगले आहे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते; पण ही गोष्ट प्रत्येकाला लागू होत नाही, हे समजून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.
याविषयी पोषणतज्ज्ञ अंजली मुखर्जी या त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडीओतून सांगतात, “हा पर्याय प्रत्येकासाठी योग्य नाही. ज्यांची चयापचय शक्ती कमी आहे, ज्यांना पचनाशी संबंधित समस्या आहे, ज्यांना आतड्यांशी संबंधित आजार आहे किंवा ज्यांना प्री डायबिटीज आहे, अशाच लोकांनी फक्त दर दोन तासांनी खावे.”
दिल्लीच्या धरमशिला नारायण सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल येथील मेडिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीचे डॉ. महेश गुप्तासुद्धा सांगतात, “दर दोन तासांनी खाणे प्रत्येकासाठी चांगले नाही. हे त्या व्यक्तीच्या जीवनशैली आणि आरोग्य स्थितीवर अवलंबून असते. काही लोकांना वजन नियंत्रित ठेवणे किंवा ऊर्जा टिकवण्यासाठी दर दोन तासांनी खावसं वाटतं, तर काही लोक एकाच वेळी भरपूर खातात; पण वारंवार जेवण करत नाही.”
डॉ. महेश गुप्ता पुढे सांगतात, “ज्यांना वजन वाढवण्याची आवश्यकता आहे, अशा लोकांनी दर दोन तासांनी खाणे फायदेशीर ठरू शकते, पण पचनशक्ती कमी असणाऱ्या लोकांना वारंवार जेवण पचविणे आव्हानात्मक ठरू शकते. याशिवाय काही लोकांना खाण्याबाबत काही निर्बंध असेल किंवा अति खाण्याची सवय असेल तर अशा लोकांनी वारंवार खाताना काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे.”
डॉ. गुप्ता सांगतात, “दर दोन तासांनी खाल्ल्यामुळे शरीरात कॅलरीचे प्रमाण वाढते आणि व्यक्तीचे वजनसुद्धा वाढू शकते. याशिवाय वारंवार खाल्ल्यामुळे दातांच्या समस्या जाणवतात आणि व्यक्तीला खरी भूक ओळखणे कठीण जाते.”
प्रायमस सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ अंकिता घोषाल सांगतात, “गॅस्ट्रोइंटेस्टाइनल विकार असलेल्या लोकांना वारंवार खाल्ल्यामुळे जास्त त्रास होतो. याशिवाय जे लोक एखादा डाएट पाळत असेल, जसे की केटोजेनिक डाएट, यामध्ये जास्त चरबी आणि कमी कर्बोदके असतात. त्यामुळे दर दोन तासांनी जेवण्याची ही संकल्पना खूप वेगळी आहे.”
हेही वाचा : बेसन लाडू कडक होतात? टेन्शन घेऊ नका, असे बनवा जिभेवर ठेवताच विरघळणारे लाडू, ही सोपी रेसिपी लगेच नोट करा
अंकिता घोषाल पुढे सांगतात, “जेवण करताना संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या. जर कोणी सातत्याने जास्त कॅलरीचे अन्न खात असेल तर त्यामुळे वजन वाढणे, पोषक घटकांची कमतरता आणि आजारांचा धोका वाढू शकतो.”
जर तुम्ही दर दोन तासांनी खाण्याचा विचार करत असाल तर पोषणतज्ज्ञ यांच्यानुसार तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
- जर तुम्ही वारंवार खात असाल तरी कमी खा.
- वारंवार खाताना आहारात फळे, भाज्या, धान्य आणि प्रथिने यांचा जास्त समावेश करा.
- जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर फायदेशीर पौष्टिक घटकांनी परिपूर्ण असलेला आहार घ्या.
- शरीराची भूक समजून घ्या आणि त्यानुसारच खा.
- आहाराविषयी समस्या जाणवत असतील तर आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.