सँडविच खायला कोणाला आवडत नाही. क्वचितच असा कोणी असेल, ज्याला सँडविच खायला आवडत नाही. सँडविच हा आजकाल प्रत्येकाच्या आहारातील भाग आहे. पण, सँडविच खाणे आरोग्यासाठी चांगले आहे का? मधुमेही व्यक्ती सँडविच खाऊ शकतो का? असा प्रश्न अनेकांना पडतो. अनेकांना सँडविच खायला आवडते, पण वजन वाढेल म्हणून सँडविच खाणे टाळतात. अनेकदा लहान मुलांना डब्यात सँडविच देतात, पण मुलांसाठी कोणत्या प्रकारचे सँडविच खाणे चांगले आहे हे जाणून घेतले पाहिजे; म्हणून तुमच्या या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आम्ही आहारतज्ज्ञांशी संवाद साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सँडविच खाणे आरोग्यदायी आहे का?

क्रीडा पोषणतज्ज्ञ व डायबिटीज एज्युकेटर पल्लवी पटवर्धन यांनी ‘लोकसत्ता’ला माहिती देताना स्पष्ट केले की, “सँडविच खाणे आरोग्यासाठी चांगले आहे, पण तेव्हाच, जेव्हा त्यात भाज्यांचे प्रमाण किंवा चिकन, अंडी जे मिश्रण आहे ते जास्त असते तेव्हा. नुसते चटणी सँडविच किंवा जॅम सँडविच न खाता जितकं शक्य होईल तितका भाज्यांनी युक्त सँडविच खाल्ले तर चांगले असते. कारण नुसता ब्रेड खाल्ला तर त्यातून मैदा आणि ऊर्जा एवढेच मिळते. जेव्हा एखाद्या पदार्थातून ऊर्जा मिळते, तेव्हा त्यात पोषकतत्व किती आहेत याचा विचार आपण करतो. तसेच सँडविचबद्दल सांगायचं झालं, तर जेवढ्या प्रमाणात ब्रेड वापरता तेवढ्याच प्रमाणात तुम्ही भाज्या वापरता का? किंवा अंडी, चिकन वापरतात की नाही हा मुद्दादेखील अत्यंत महत्त्वाचा आहे. सँडविचमध्ये वापरल्या जाणाऱ्या भाज्या ताज्या असणं आवश्यक आहे. त्यामुळे घरी सँडविच करताना किंवा सँडविच खाताना हे लक्षात घ्यावं.

सँडविचसाठी कोणता ब्रेड वापरणे आरोग्यदायी ठरते?

मल्टीग्रीन ब्रेड आणि व्हाईट ब्रेड टोस्ट किंवा ग्रील्ड करून सँडविच तयार केले तर ते हेल्दी असते का असा प्रश्न अनेकांना पडतो. याबाबत आहारतज्ज्ञ पटवर्धन सांगतात की, “मल्टीग्रेन ब्रेडमध्ये असणाऱ्या तंतुमय पदार्थांमुळे सँडविचसाठी मल्टीग्रेन ब्रेड वापरणे कधीही उत्तम. जेव्हा मल्टीग्रेड ब्रेड टोस्ट करता, तेव्हा त्यातील पोषक तत्व राखली जातात; व्हाईट ब्रेडबाबतीत तसे होत नाही. त्यामुळे गव्हाचा किंवा धान्याचा ब्रेड खातात, हा खूप चांगला बदल आहे. सँडविच टोस्ट किंवा ग्रील केल्यामुळे ते पचायला हलकं होतं.”

सँडविच खाताना या गोष्टी टाळा

सँडविचमध्ये भाज्यांचा वापर जास्त केला पाहिजे. सँडविच खाणे हे तोपर्यंत आरोग्यासाठी चांगले आहे, जोपर्यंत त्यात भाज्या आणि हिरवी चटणी आहे. पण, जेव्हा तुम्ही त्यावर जास्तीचे बटर आणि जास्तीचे चीज वापरता तेव्हा ते आरोग्यासाठी चांगले नसते. सोशल मीडियावर आपण अत्यंत विचित्र प्रकारचे सँडविच तयार करताना पाहतो, एवढ्या विचित्र सँडविचची गरज नाहीये. बटाट्याच्या भाजीवर, पनीरची भाजी आणि त्यावर मेओनिज आणि मस्टर्ड सॉस लावून सँडविच खाल्ले जातात, तर असे करण्याची गरज नाही. अनेकजण चॉकलेट सँडविच म्हणजेच ब्रेडवर चॉकलेट सिरप टाकून खातात, पण हे आरोग्यासाठी चांगले नाही.

हेही वाचा – दीर्घकाळ बसून राहण्यामुळे होऊ शकतो अकाली मृत्यू? कसा कमी करू शकता धोका? जाणून घ्या

सँडविच खाण्यामुळे वजन वाढते का?

अनेक लोकांना सँडविच खाऊन वजन वाढेल याची चिंता असते, पण जेव्हा तुमचं वजन वाढताना एखादा पदार्थ किती प्रमाणात खाता हे लक्षात घेणे हा मुद्दाही महत्त्वाचा आहे. जर तुम्ही चीज सँडविच खाल्ले तर तुमचे वजन वाढणार आहे आणि व्हेजिटेबल सँडविच खाल्ले तर वजन कमी होणार आहे. तुम्ही अंड्याचे किंवा एवोकॅडो सँडविच खाल्ले तर तुमचे वजन नियंत्रणात राहणार आहे. पण महत्त्वाचा मुद्दा असा की, कोणताही पदार्थ खाल्ल्यामुळे तुमचे वजन वाढत नाही, जोपर्यंत तुम्ही तो अतिरेकी प्रमाणात खात नाही. त्यामुळे सँडविच हा खरंतर आहारशास्त्रज्ञांचा आवडता पदार्थ आहे, कारण तो झटपट तयार होतो. भाज्या चिरून ठेवल्या तर त्या ब्रेडमध्ये टाकून तुम्ही पटकन खाऊ शकता.

जेव्हा तुम्ही सँडविच साखरेचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ जसे की पीनट बटर सँडविच, बनाना पीनट बटर सँडविच किंवा चीज ग्रील सँडविच खाता आणि त्यात भाज्या नसतील किंवा फक्त बटाट्याची भाजी आणि चीज असेल तर अर्थात अशा सँडविचमुळे तुमचे वजन वाढू शकते. कारण त्यात फक्त कार्बोहायड्रेट आहेत, त्यात आवश्यक प्रथिने, पोषकमूल्य नसतात.

दोन ब्रेडच्या स्लाईसमधून तुम्हाला १०० ग्रॅम कॅलरीज मिळतात. सँडविचसाठी जेव्हा तुम्ही दोन ब्रेड स्लाईस आणि भाज्या वापरता, तेव्हा भाज्यांमधून मिळणाऱ्या कॅलरीज जर ३००-४०० पेक्षा जास्त असेल, तर अर्थातच तुमचे वजन वाढू शकते. त्यामुळे तुम्ही ब्रेडसह किती प्रमाणात भाज्या खाता हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

दही सँडविच खाणे हेल्दी आहे का?

दह्यामध्ये चांगले जीवाणू असतात, त्यामुळे तुम्ही ते डांबिळासह खात असाल, खिचडी किंवा ताज्या पदार्थांबरोबर खात असाल तर दही आरोग्यासाठी उत्तम असते; पण जर तुम्ही क्रिया केलेल्या पदार्थांसह दही खात असाल तर पचन नीट होत नाही, त्यामुळे दही सँडविच खाऊ नये.

शाकाहारी सँडविच खावे की मांसाहारी सँडविच खावे?

शाकाहारी आणि मांसाहारी सँडविच दोन्ही आरोग्यासाठी उत्तम आहेत, पण त्यातील भाज्या किंवा अंडी आणि चिकनचे प्रमाण महत्त्वाचे आहे. तुम्ही जर दोन ब्रेड स्लाईससह १५० ते २०० ग्रॅमपर्यंत भाज्या किंवा चिकन खाणार असाल तर ते आरोग्यासाठी चांगले आहे. मांसाहारी अन्न पचायला जड असते, कारण त्यात प्रथिने जास्त असतात, त्यामुळे मांसाहारी पदार्थांसह ब्रेडचे प्रमाण आहारात कमी असावे.

हेही वाचा –मधुमेही व्यक्तीने धावू नये का? धावण्यामुळे गुडघ्यांचे नुकसान होते का? काय मिथक आणि काय तथ्य, तज्ज्ञांकडून जाणून …. 

डाएट करणाऱ्यांनी कोणत्या प्रकारचे सँडविच खावे?

डाएट करणाऱ्यांनी ग्रील्ड व्हेजिटेबल सँडविच खाल्ले तर हरकत नाही,
शक्यतो मल्टीग्रेन ब्रेड वापरत असाल तर उत्तम. सध्या कॉर्न पीनट्स सँडविच, पारंपरिक भारतीय सँडविच ज्यामध्ये कांदा, टोमॅटो, काकडी हे तीन पदार्थ असतात; हे सँडविच उत्तम आहेत.

सँडविच किती वेळा खाऊ शकतो?

सँडविच रोज खाऊ शकता, पण वेळ महत्त्वाची आहे. किती प्रमाणात खाता आणि कोणत्या प्रकारचे सँडविच खाता हे महत्त्वाचे आहे. एक व्हेजिटेबल सँडविच ज्यामध्ये हिरवी चटणी, मल्टी ग्रेन ब्रेड आणि भाज्या असतील (ढोबळी मिर्ची, काकडी, टोमॅटो, कांदा, पनीर) तर तुम्ही ते रोज खाऊ शकता. पण, तुम्ही ते योग्य वेळी खाल्ले पाहिजे. जर तुम्ही नाश्त्याला सँडविच खात असाल किंवा जेवणामध्ये सँडविच खात असाल तर त्यामध्ये किती भाज्या आहेत आणि तुम्ही ते सँडविच किती प्रमाणात खात आहात हे लक्षात घेतले पाहिजे.

सँडविचमुळे कोणत्या आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात का?

ज्यांना गॅस किंवा अपचनाचा त्रास आहे, जे पाणी कमी पितात त्यांनी सँडविच खाणे टाळावे. कारण त्यांना आंबवून तयार केलेल्या पदार्थांमुळे विशेषतः बेकरी पदार्थांमुळे त्रास होऊ शकतो. त्यांच्यासाठी ब्रेड खाणं अनावश्यक आणि अनारोग्यदायी ठरू शकते. शिवाय सँडविचमध्ये वापरल्या जाणाऱ्या भाज्या जर शिळ्या असतील तरीदेखील पचनाचे विकार होऊ शकतात. सँडविचमध्ये व्हाइट ब्रेड असतो आणि ब्रेड हा प्रक्रिया केलेला पदार्थ; त्यामुळे तुमच्या शरीरात गॅस निर्माण होऊ शकतो. अशा व्यक्तीने खूप बटर लावून किंवा खूप चीज लावून सँडविच खाऊ नये.

हेही वाचा – दुपारच्या जेवणानंतर झोपण्याची इच्छा होते का? महिलांमध्ये ही इच्छा खूप तीव्र का होते? तज्ज्ञांकडून जाणून घ्या… 

मधुमेही किंवा ह्रदयाच्या समस्या असलेल्यांनी सँडविच खाणे टाळावे का?

मधुमेहींसाठी आहारातील कर्बोदकांचे प्रमाण योग्य प्रमाणात राखणे आवश्यक असते. त्यामुळे जास्त फायबर असणारा ब्रेड वापरून, भरपूर भाज्या वापरून सँडविच खायला हरकत नाही. जर मधुमेह असेल तर तुम्ही महिन्यातून एकदा मल्टीग्रेन सँडविच खाऊ शकता. जर तुम्हाला रक्तदाबाचा त्रास असेल तर ब्रेड किंवा बेकरीमधील पदार्थ खाणे टाळले पाहिजे; कारण रक्तदाबाचा त्रास असताना आहारातील सोडियमचे प्रमाण कमी असावे लागते. बेकरी पदार्थांमध्ये सोडियम जास्त असते, त्यामुळे खूप जास्त ब्रेड खाणे टाळले पाहिजे, म्हणून सँडविच खाताना ब्रेड आणि भाज्या यांचे संतुलित प्रमाण आवश्यक आहे. तुम्ही एकच ब्रेड स्लाईस आणि भरपूर भाज्या खात असाल, तर ते आरोग्यासाठी चांगले आहे.

लहान मुलांनी सँडविच खावे का?

मुलांनाही सँडविच देतातना मल्टीग्रेन ब्रेड किंवा मिलेट ब्रेडचा वापर करावा. भाज्यांचा जास्त वापर करावा. मुलं भाज्या खात नसतील तर सँडविचमध्ये वापरले जाणारे सारण जितक्या विविध पद्धतीने तुम्ही बनवत असाल तर ते उत्तम असते. त्यात तुम्ही पनीर, ढोबळी मिर्ची, काकडी, टोमॅटो वापरणार असाल तर ते सँडविच मुलांना देऊ शकता.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is sandwich is healthy and sandwich can gain weight which sandwich is better know what experts say snk
Show comments