समीर स्किझोफ्रेनियाचा रुग्ण झाला तेव्हा १६ वर्षांचा होता. १० वीची परीक्षा त्याने पूर्ण केली तीसुद्धा मानसिक विकाराचा सामना करता करता. औषधोपचाराने त्याची लक्षणे खूप नियंत्रणाखाली आली. तो पर्यंत तो १९ वर्षांचा झाला. त्याच्या आईवडिलांना सारखी काळजी वाटायची, “समीर पुढे शिकू शकेल का? स्वतःच्या पायावर उभा राहील का?”
बऱ्याच वेळा स्किझोफ्रेनियाच्या आजारात लक्ष देण्याची क्षमता, स्मरणशक्ती, विशेषतः काम करताना वापरत येणारी, (working memory), (उदा. मनातल्या मनात आकडेमोड करणे, वर्गात शिक्षक बोलत असताना टिपणे काढणे इ.), योजनापूर्वक, क्रमाने एखादे काम पूर्ण करणे (executive functioning) अशा आकलन क्षमतांवर परिणाम होतो. दुसऱ्याच्या भावना ओळखता येणे, आपल्या भावना व्यक्त करता येणे, संवाद साधता येणे, एखाद्या समारंभामध्ये लोकांमध्ये मिसळणे अशा काही गोष्टींमध्ये त्रुटी निर्माण होतात.
आणखी वाचा: Mental Health Special: स्किझोफ्रेनियावर काय उपचार असतात?
समीरला ट्रीटमेंट देणारे डॉक्टर, हॉस्पिटलमधील समाजसेवक(social worker) आणि मानसोपचारतज्ज्ञ (psychologist) यांच्या टीमने त्याच्या प्रगतीचा उहापोह केला. काही मानसिक चाचण्या करून त्याची लक्षणे किती कमी झाली आहेत याचे मोजमाप करता आले. त्याच बरोबर त्याच्या आकलनक्षमतांची (cognitive abilities)तपासणी केली गेली. त्याच्याशी चर्चा करून त्याच्या पुढच्या शिक्षणाची दिशा ठरवायला त्याला मदत केली गेली. त्याने कॉलेजला प्रवेश घेतला. तो पुढे शिकू लागला.
प्रत्येक रुग्ण आणि त्याच्या घरचे यांची स्वाभाविक इच्छा ही आपले जीवन पुनः सुरळीत व्हावे अशी असते. ही एखाद्या रुग्णाची समाजात सामावून जाण्याची, त्याचे आयुष्य रुळावर येण्याची, त्याच्या आजारासकट अर्थपूर्ण आयुष्य जगण्याची प्रदीर्घ प्रक्रिया म्हणजे त्या त्या रुग्णाचे स्कीझोफ्रेनियापासून ‘रोगमुक्त’ होणे होय. अतिशय महत्त्वाची अशी ही संकल्पना. स्किझोफ्रेनिया हा गंभीर, दीर्घकाळ चालणारा मानसिक विकार आहे असे एकीकडे मांडताना, एकेका रुग्णाच्या आयुष्याचा विचार करून त्याच्यासाठी उत्तम अशी दिशा त्याच्या आयुष्याला मिळणे हे प्रत्येकाचे म्हणजे, उपचार करणाऱ्यांचे, उपचार घेणाऱ्याचे, त्याच्या कुटुंबियांचे, आजूबाजूच्या हितचिंतकांचे आणि समाजाचे उद्दिष्ट बनणे अपेक्षित आहे.
आणखी वाचा: स्किझोफ्रेनिया अनुवांशिक आहे? तरुण वयातही होऊ शकतो?
आमच्या परिचयाच्या एक मध्यमवयीन बाई, मंगलाताई. वयाच्या ५२ व्या वर्षी अर्धांगवायूचा झटका येऊन आजारी पडल्या. एक हात आणि एक पाय लुळा पडला.व्यायाम करून हळूहळू ७०% सुधारणा झाली, पण तरी पूर्णपणे हातापायात ताकद परत नाही आली. जवळजवळ दोन वर्षांनी त्यांच्या घरी जाण्याचा योग आला. मला आश्चर्याचा धक्का बसला. रोज त्या सगळा स्वयंपाक करू लागल्या होत्या, अगदी पुरणपोळ्यासुद्धा! चालताना काठी लागत होती. केस लहानसे केले होते, कारण वेणी घालायला थोडा त्रासच व्हायचा.
आपल्याला झालेला आजार त्यांनी स्वीकारला, घरच्यांनी आधार दिला, प्रोत्साहन दिले, सुरुवातीला वेड्या वाकड्या झालेल्या पोळ्यांचे कौतुक केले आणि मंगलाताई पुन्हा कामाला लागल्या. आत्मविश्वासाने आणि आत्मसन्मानाने!
अशीच काहीशी प्रक्रिया आपण स्कीझोफ्रेनियासाठी कशी असू शकते त्याचा विचार करू. रुग्णाची लक्षणे कमी झाली की बऱ्याच वेळा त्याला आपल्या आजाराची जाणीव करून देता येते. रुग्ण आणि त्याची काळजी घेणारे यांना आजाराविषयी माहिती देणे, लक्षणे लवकरात लवकर कशी ओळखायची याचे प्रशिक्षण देणे, उपचारातील सातत्याचे महत्त्व समजावत राहणे, याचा रुग्णाला खूप फायदा होतो. कधी कधी होणाऱ्या भासांकडे दुर्लक्ष करायला रुग्णाला शिकवता येते. त्याच्याशी मानसोपचारतज्ज्ञ एक नाते निर्माण करू शकला की त्याच्या मनातले विचार, अवाजवी विश्वास, वास्तवाचे भान, समाजात वावरताना त्याला येणाऱ्या अडचणी, अशा अनेक गोष्टींवर काम करता येते. एकट्याने प्रवास करण्यापासून, आपले शरीर स्वच्छ, नीटनेटके ठेवण्यापासून, एखाद्या समारंभात सहभागी होण्यापर्यंत मानसोपचाराच्या सहाय्याने मदत करता येते.
आयुष्यातले शिक्षण, नोकरी, काम असे निर्णय करण्याची क्षमता निर्माण करताना आपल्या आजारामुळे ज्या काही मर्यादा निर्माण झाल्या आहेत, उदा. रात्रपाळी शक्यतो न करणे, जर औषधांचा डोस जास्त असेल तर कोणतेही यंत्र न चालवणे, त्या स्वीकारून आपल्या वैयक्तिक आयुष्यातले निर्णय करण्याइतके सक्षमीकरण उपायांनी करता येते. काही वेळेस शिक्षणाचा एखादा अतिशय कठीण कोर्स करता येत नाही, थोडी तडजोड करावी लागते. एखाद्या वेळेस दूर गावी बदली झाली तर एकट्याने राहणे जमेल की नाही अशी शंका वाटते.
आकलन क्षमतांमधील त्रुटी कमी व्हाव्यात म्हणूनही आपल्या बौद्धिक क्षमतांचा वापर करण्याचे प्रशिक्षण देता येते. त्याचा दैनंदिन जीवनात, शैक्षणिक, व्यावसायिक आणि समाजिक जीवनात खूप उपयोग होतो. कामाची गती सुधारते. लोकांशी मिळून मिसळून राहण्याचा आत्मविश्वास वाढतो. प्रत्येकाच्या दृष्टीने स्किझोफ्रेनिया सारख्या मनोविकारातून ‘रोगमुक्त’(recovery) होण्याची व्याख्या आणि प्रक्रिया वेगळी असते, ती व्यक्तिकेंद्रित (person centred ) असते. आजार असताना आयुष्यात अर्थ निर्माण करणे, मनात आशा जागृत ठेवणे, आपण सक्षम आहोत हा विश्वास बाळगणे आणि आत्मसन्मान वाढवणे म्हणजे ‘रोगमुक्त’ होणे!
स्किझोफ्रेनियाच्या प्रत्येक रुग्णाला ‘रोगमुक्त’ होता यावे आणि समाजाशी एकरूप (integrated into society) होता यावे हीच सदिच्छा मनी बाळगूया.