गर्भधारणेचे नियोजन करताना खूप काळजी घ्यावी लागते. या काळात काय खावे किंवा काय खाऊ नये याकडे लक्ष द्यावे लागते. एवढेच नाही तर व्यायाम करण्यापासून केस धुण्यापर्यंत अनेक गोष्टी या काळात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात, असे म्हटले जाते. होमिओपॅथ प्रियांका यादव यांच्या म्हणण्यानुसार, “गर्भधारणेच्या नियोजनाच्या शेवटच्या चार दिवसांत केस धुणे टाळले पाहिजे, कारण यामुळे शरीरात प्रोजेस्टेरॉनची पातळी कमी होते, ज्यामुळे गर्भधारणा अयशस्वी होते.” प्रोजेस्टेरॉन हा गर्भधारणेसाठी आणि गर्भाच्या वाढीसाठी आवश्यक असलेला मुख्य हार्मोन आहे.
“कमी प्रोजेस्टेरॉन पातळीमुळे एंडोमेट्रियमचे अस्तर (Endometrium Lining) उघडते, ज्यामुळे मासिक पाळी येऊ शकते आणि गर्भधारणा अयशस्वी होऊ शकते. जर तुमचे मासिक २८-३० दिवसांचे चक्र असेल, तर २४-२५ दिवसांपासून तुमचे केस धुणार नाहीत याची खात्री करा. मूत्र गर्भधारणा चाचणी (Urine PregnancyTest) करा. तुमची गर्भधारणा होईल,” असे डॉ. यादव म्हणाले.
हेही वाचा – तुम्हीही खुशी कपूरप्रमाणे सलग ७-८ तास Binge-Watch करता का? तज्ज्ञांनी सांगितले ते का आहे धोकादायक?
“औषधांमुळे ह्यूमन कोरिओनिक गोनाडोट्रोपिन (एचसीजी) पातळी संतुलित झाल्यानंतर तुम्ही केस धुवू शकता,” असेही डॉ. यादव यांनी सांगितले. याबाबत तज्ज्ञांचे काय मत आहे हे आम्ही जाणून घेतले. हा दावा खोडून काढताना मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटल्सच्या सल्लागार स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ज्ञ, लॅपरोस्कोपिक सर्जन म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. राजश्री तायशेटे भासले (Dr Rajashri Tayshete Bhasale) यांनी सांगितले की, “केस धुणे आणि गर्भधारणेचे नियोजन यात थेट संबंध नाही.”
“केस धुणे ही वैयक्तिक निवड आहे आणि योग्य स्वच्छता राखण्यासाठी ते नियमितपणे केले पाहिजे. याचा गरोदरपणावर परिणाम होत नाही, त्यामुळे कसलीही चिंता न करता तुम्ही केस धुण्याची दिनचर्या सुरू ठेवू शकता. ओव्हुलेशनदरम्यान केस न धुण्याचा परिणाम सिद्ध करण्यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे किंवा संशोधन नाही. तुम्ही ऑनलाइन वाचता किंवा पहात असलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका”, असे डॉ. भासले यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – प्रसूतीनंतर नेहा धुपियाने केले २३ किलो वजन कमी! प्रसूतीनंतर सुरक्षितपणे वजन कसे कमी करायचे?
डॉ. भासले यांच्या मतावर सहमती दर्शवताना नवी दिल्ली आणि वृंदावन येथील मदर्स लॅप IVF सेंटरच्या वैद्यकीय संचालक आणि IVF विशेषज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. शोभा गुप्ता यांनी सांगितले की, “गर्भधारणा आणि केस धुणे यांचा थेट वैज्ञानिक संबंध नाही. या विषयाभोवती काही गैरसमज आणि सांस्कृतिक विश्वास असू शकतात, परंतु त्यांना वैज्ञानिक आधार नाही. गर्भधारणेदरम्यान आपले केस धुणे सामान्यत: सुरक्षित असते.”