वैभवी वाळिंबे
आपल्यापैकी बहुतेकजण वजन उचलण्याची क्रिया दैनंदिन आयुष्यात गरजेनुसार करत असतात. कंबरदुखीच्या रुग्णांना सर्रासपणे वजन उचलणं बंद करा असंही सांगितलं जातं. वेगवेगळ्या वजनाच्या आणि आकाराच्या वस्तू उचलताना कंबरेवर येणारा ताण बदलतो. हा ताण जसा वस्तूचं वजन आणि आकार याने बदलतो तसंच तो वजन उचलण्याच्या पद्धतीने हे बदलतो. या पद्धतींकडे सहसा कुणी लक्ष देत नाही. हे दैनंदिन आयुष्यातल्या वजन उचलण्याबद्दल झालं. जिमला जाणाऱ्या वर्गाची वेगळीच तऱ्हा. यात काही लोक (विशेषतः मुलं) फक्त आणि फक्त वजन उचलण्याचाच व्यायाम करतात, हे करत असताना वजन उचलण्याची योग्य पद्धत, वजनाचं प्रमाण, त्याचे रिपिटेशन्स आणि सगळ्यात महत्वाचं वजन उचलण्याचा हेतू हे काहीच समजून न घेता जास्तीत जास्त वजन उचलून मसल हायपरट्रॉफी मिळवणे इतकाच उद्देश यात असतो.
वजन उचलणं सरसकट बंद करणं हा पर्याय बहुतेकवेळा फार टोकाचा असतो. या पर्यायामुळे जगण्याची गुणवत्ता कमी होते. सगळ्याच कंबरदुखीच्या रुग्णांना वजन उचलणं पूर्ण निषिद्ध असेलच असं नाही. अशावेळी डॉक्टर आणि रुग्ण यांनी एकमेकांशी स्पष्ट संवाद साधणं हा उत्तम पर्याय असतो. किती वजन उचलणं त्रासदायक ठरणार नाही हे समजून घेणं आवश्यक आहे. दैनंदिन आयुष्यातील वजन उचलणं बंद करण्याची खरंच गरज आहे का? असेल तर किती कालावधीसाठी? वजन उचलण्याची पद्धत बदलली तर चालेल का? दिवसातून किंवा आठवड्यातून कितीदा आणि किती वजन उचललं तर ते चालण्यासारखं आहे? अशा प्रश्नांवर डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात चर्चा होणं आवश्यक आहे.
दैनंदिन आयुष्यातील वजन उचलणं सोपं होण्यासाठी आपल्याला, व्यायाम म्हणून वजन उचलण्याची सवय करणं गरजेचं आहे. वजन उचलण्याचे काही प्रमुख फायदे असे आहेत.
मजबूत हाडे : योग्य पद्धतीने वजन उचलल्याने हाडांवर आवश्यक असलेला भर येतो, त्यामुळे हाडांची घनता वाढते, ज्यामुळे फ्रॅक्चर आणि ऑस्टियोपोरोसिस सारख्या शक्यता कमी होतात.
वजन कमी होणं किंवा वजन नियंत्रणात राहणे: योग्य पद्धतीने आणि नियमितपणे वजन उचलल्याने चयापचयाचा वेग वाढतो.
आयुष्याच्या गुणवत्तेतील फरक: योग्य पद्धतीने वजन उचलणं, तुमच्या जीवनाची गुणवत्ता वाढवू शकते आणि दैनंदिन क्रिया करण्याची तुमची क्षमता सुधारू शकते. स्ट्रेंथ ट्रेनिंग सांध्यांना दुखापतीपासून वाचवू शकते. वयानुसार वाटणाऱ्या पडण्याच्या भीतीवर आणि तोल सांभाळण्याच्या क्षमतेवर वजन उचलण्याने सकारात्मक परिणाम होतो.
व्यायाम म्हणून वजन उचलण्याआधी आपल्या फिजिओथेरपिस्टला भेटा आणि या गोष्टींवर चर्चा करा. आपल्याला वजन उचलण्याचा व्यायाम का करायचा आहे, हे समजून घ्या.
आपलं वय, शारीरिक क्षमता, आधी असलेले आजार , कामाचं स्वरूप याबद्दल पूर्ण माहिती द्या (वजन उचलण्याचा व्यायाम हा फक्त मुलं आणि पुरुष यांनी करण्याचा व्यायाम नाही, स्त्रिया आणि मुलींसाठीदेखील तो तितकाच महत्वाचा आहे)
कंबरदुखी, मानदुखी, गुडघेदुखी असल्यास त्याची माहिती द्या, तुमच्याकडे असलेले एक्सरे किंवा एमआरआय रिपोर्टस फिजिओथेरपिस्टना दाखवा.
वजन उचलण्याच्या योग्य किंवा सुधारित पद्धती शिकून त्या आत्मसात करण्याचा प्रयत्न करा.
वजन किती उचलतो हे महत्वाच नसून ते कसं उचलतो हे महत्वाच आहे, हे समजून घ्या.
वजन उचलल्याने शरीराला येणारा सुडौलपणा हे एक बायप्रॉडक्ट आहे, वजन उचलण्याचा मूळ उद्देश हा आपल्या आयुष्याची गुणवत्ता सुधारण आणि हाडे आणि स्नायूंचं आरोग्य सुधारणं हा आहे हे लक्षात ठेवा.