Brain Health : वर्क फ्रॉम होममुळे एका जागी बसून काम करण्याची अनेकांना सवय आहे. काही लोक दीर्घकाळ एकाच जागी बसून राहतात. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का, शरीराची ठेवण योग्य नसल्यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो का? याविषयी द इंडियन एक्सप्रेसच्या एका वृत्तात एसआरव्ही हॉस्पिटलच्या फिजियोथेरेपिस्ट डॉ. ऐश्वर्या अहलीवाले सांगतात, “शरीराची ठेवण योग्य नसल्यामुळे तुमच्या स्नायूंवर ताण वाढू शकतो, ज्यामुळे मेंदूपर्यंत रक्त पोहचण्यास अडचण निर्माण होऊ शकते.”
केअर हॉस्पिटलचे न्यूरोसर्जन डॉ. के. व्ही. शिवानंद रेड्डी याविषयी सांगतात, “शरीराची ठेवण योग्य नसल्यामुळे तुमच्या देहबोलीवर किंवा आत्मविश्वासावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे समोरची व्यक्ती तुम्हाला कसे समजून घेतो, याचासुद्धा अप्रत्यक्षरित्या तुमच्या मानसिक आरोग्यावर किंवा मेंदूवर परिणाम दिसून येतो.”
डॉ. के. व्ही. शिवानंद रेड्डी पुढे सांगतात, “जर शरीराची ठेवण योग्य असेल तर ऑक्सजिन घेण्यास मदत होते आणि तुमच्या मानेचा आणि पाठीचा ताण कमी होऊ शकतो, ज्याचा थेट सकारात्मक परिणाम तुमच्या मेंदूच्या आरोग्यावर दिसून येईल.”
डॉ. ऐश्वर्या अहलीवाले पुढे सांगतात, “नियमित व्यायाम करून तुम्ही मेंदूचे आरोग्य सुदृढ ठेवू शकता. “डॉ. अहलीवाले यांच्या मते, शरीराची ठेवण जर चुकीची असेल आणि त्यामुळे मेंदूवर नकारात्मक परिणाम झाला असेल तर अशा परिस्थितीत त्यावर उपचार करणे ही समस्या किती प्रमाणात आहे आणि समस्या केव्हापासून आहे, यावर अवलंबून असते.
डॉ. रेड्डी यांनी स्नायूंना मजबूत करण्यासाठी आणि शरीराची ठेवण सुधारण्यासाठी फिजिओथेरेपी करण्याचा सल्ला दिला आहे. माइंडफुलनेस, वर्कस्टेशन्स आणि होम सेटअप्समुळे पाठीचा कणा आणि मानेवरील ताण कमी होण्यास मदत होऊ शकते.
अनेकदा काही प्रकरणे गंभीर असतात. अशा वेळी वैद्यकीय उपचार आणि शस्त्रक्रिया करण्याची गरज भासू शकते. पण, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की उपचारामुळे तुम्ही तात्पुरता त्रास कमी करू शकता; पण दीर्घकालीन त्रास कमी करणे कठीण आहे. त्यासाठी डॉ. ऐश्वर्या अहलीवाले सांगतात, “शरीराची ठेवण सुधारणे, हाच एक चांगला मार्ग आहे.”
हेही वाचा : Multigrain Rotis : मिश्र धान्यांची पोळी खाणे आरोग्यासाठी चांगले आहे का? वाचा, आहारतज्ज्ञ काय सांगतात…
शरीराची ठेवण कशी सुधारायची?
- तुमच्या संगणकाची किंवा लॅपटॉपची स्क्रीन तुमच्या डोळ्याच्या सरळ रेषेत असावी.
- जर तुम्ही डेस्कवर काम करत आहात तर मध्ये मध्ये ब्रेक घ्यावा.
- काम करताना मध्ये मध्ये उभे रहावे आणि थोडे फिरून यावे.
- दररोज मान, खांदे आणि पाठ स्ट्रेच करावी.
- स्नायूंना मजबूत करण्यासाठी नियमित व्यायाम करावा, ज्यामुळे शरीराची ठेवण सुधारते.
- योगा हासुद्धा एक चांगला पर्याय आहे.
- कोणतीही वस्तू उचलताना गुडघ्यातून वाकावे, पाठीतून वाकू नये.