Health Special आपल्या बाळासाठी जे योग्य आहे, ते करण्याचा प्रत्येक मातेचा आग्रह असतो. नवमातेने ‘अमुक अमुक’ नक्की खायलाच हवं, हा इतरांचा अनुभवी आग्रहदेखील असतो. खाण्या -पिण्याचे सल्ले देऊ करणाऱ्यांकडे अनेकदा ब्रेस्टफीडिंग म्हणजे स्तनपान याबाबत पुरेशी माहिती नसते, किंबहुना ‘ते आपोआप उमजतं’ असा एक सर्वमान्य समज आहे . स्तनपान करताना खाण्याचं पथ्य , नवमातेला येणार थकवा , बाळाच्या वेळेनुसार बदलणार वेळेचं गणित याचा कुटुंबाच्या मानसिक स्वास्थ्यवर देखील परिणाम होत असतो. आजचा लेख याच नवमातांसाठी विशेष !
ब्रेस्टफीडिंगच टेन्शन
“ मला ब्रेस्टफीडिंगच टेन्शन आलंय”
प्रिया सांगत होती. ३ आठवड्यात प्रियाचं बाळ या जगात येणार होतं आणि त्याबद्दल अर्थात तिचं गुगल सर्चिंग सुरु होतं .
“ब्रेस्टफीडिंग मुळे वाढलेले वजन आणखी वाढेल का?”
“प्रिया बाळ झालं की, हे वजन कमी होईलच पण ब्रेस्टफीडिंग मुळे वजन वाढणार नाही. उलट तू जास्त हेल्दी होशील.”
“ म्हणजे जास्त कॅलरीज खाऊन अजून लठ्ठ ?” प्रियाने कसनुसं तोंड करत विचारलं.
हेही वाचा : रोज एक चमचा एरंडेल तेलाच्या सेवनाने तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डाॅक्टरांकडून जाणून घ्या…
वजनाची चिंता
“तसं नाही गं. पहिल्यांदा तू वजनाची चिंता करू नको. तुझं वजन आताही उत्तम आहे. ब्रेस्टफीडिंग करताना जास्त कॅलरीज खाऊन वजन नाही वाढणार, उलट तुझी रोगप्रतिकारशक्ती वाढेल आणि हळूहळू शरीर पूर्वपदावर येईल. हॉर्मोन्स फॅक्शनिंगची सिम्फनी तयार होईल” यावर प्रिया म्हणाली “म्हणजे पोस्ट प्रेगन्सी विस्डम आणि हेल्थ बोनस म्हणायचं” यावर आम्ही सगळेच हसलो . गर्भारपणात स्त्रियांचे वजन वाढते. ताईच प्रसूतीनंतर ते कमीदेखील होते. बाळाच्या सकस आहारासाठी आणि नवमातेच्या स्वास्थ्यासाठीदेखील ब्रेस्टफीडिंग म्हणजेच स्तनपान अत्यंत महत्वाचे आहे.
स्तनपानासाठी लागतात अधिक कॅलरीज
स्तनपान जितके बाळासाठी आवश्यक आहे तितकेच नवमातांच्या आरोग्यासाठी देखील आवश्यक आहे. स्तनपान करणाऱ्या मातेचे अनेक रोगांपासून रक्षण होते. विविध प्रकारच्या कर्करोगापासून मातेचे संरक्षण करणे, हृदयरोगापासून रक्षण करणे, मधुमेह आणि उच्चरक्तदाब कमी करणे यासारखे उत्तम परिणाम त्यामुळे मिळतात. त्यामुळे बाळ झाल्यानंतर स्तनपान किमान ६-८ महिने जरूर करावं आणि या दरम्यान संतुलित आहार घ्यावा. याच दरम्यान अनेक स्त्रिया मात्र वाढलेल्या वजनाची चिंता बाळगत राहतात. परिणामी अचानक जेवण कमी करणे, फॅट्स न खाणे असे अघोरी नियम अमलात आणतात. यामुळे त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडतेच शिवाय बाळाच्या पोषणावरदेखील परिणाम होतो. कोणत्याही प्रकारचे कमी-कॅलरीचे आहार नियमन करण्यापूर्वी नवमातेला स्तनपान करताना ३००-५०० कॅलरीज इतक्या जास्तीच्या ऊर्जेची आवश्यकता असते, हे लक्षात घेणे महत्वाचे ठरते. कारण स्तनपानासाठी देखील मातेच्या कॅलरीज खर्च होतात.
हेही वाचा : रोज एक-दोन लवंग चघळल्या तर शरीरावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उत्तर…
संप्रेरकांचे महत्त्व
एखाद्या स्त्रीचा गर्भधारणेआधीचा आहार समजा १५००-१६०० कॅलरीज इतका असेल , गर्भवती असतानाच आहार २०००-२५०० कॅलरीज इतका असेल तर प्रसूती नंतर तो किमान १८००-२२०० कॅलरीज इतका असू शकतो.
प्रसूतीनंतर शरीरात काही संप्रेरके परिणामकारकरीत्या काम करतात. या संप्रेरकांमुळे नवमातेचं शरीर (स्तनांचा आकार, पोटाचा आकार, शरीरावरील सूज कमी होणे इत्यादी), बाळाचं पोषण यावर परिणाम होत असतो. प्रसूतीनंतर शरीरातील संप्रेरकांचे संतुलन पूर्ववत व्हायला काही स्त्रियांमध्ये ८-१० आठवडे तर काही स्त्रियांमध्ये ६-८ महिने इतका वेळ लागू शकतो. याच संप्रेरकांची तोंडओळख करून घेऊ.
ऑक्सिटोसिन
स्तनपान करताना ऑक्सिटोसिन हे संप्रेरक स्तनातून दूध बाहेर पडण्यासाठी मदत करते. ६ ते ८ महिने बाळाला स्तनपान करणाऱ्या मातांमध्ये गर्भाशय लवकर पूर्ववत होऊ शकते. स्तनपान गर्भाशय आकुंचित करण्यासाठी मदत करते (ऑक्सिटोसिन हे या क्रियेतील महत्वाचे संप्रेरक आहे )
प्रोलॅक्टिन
प्रोलॅक्टिन नवमातांमध्ये दूध तयार करणे आणि दुधात आवश्यक स्निग्धांशाचा मेळ राखण्यासाठीदेखील मदत करते.
नवमातांमध्ये स्तनपानासाठी आवश्यक असणारे हे संप्रेरक वजन कमी करण्यासाठीदेखील कारणीभूत ठरते.
इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन
गर्भारपणात शरीरात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टरोन यांचे प्रमाण वाढलेले असते. गर्भाच्या योग्य वाढीसाठी ही दोन्ही संप्रेरके अत्यावश्यक आहेत. गर्भवती महिलेच्या शरीरातील फॅट्सचे प्रमाण या दोन संप्रेरकांवर बहुतांशी अवलंबून असते. प्रसूतीनंतर यांचे प्रमाण कमी होते. अनेक महिलांमध्ये या संप्रेरकांचे अचानक कमी होणारे प्रमाण मानसिक अस्वास्थ्यासाठी कारणीभूत ठरू शकते.
थायरॉईड आणि स्तनपान
थायरॉईड ग्रंथी स्तनपान उत्तम व्हावे यासाठी कार्य करत असते. ज्या नवमातांमध्ये थायरॉईडचे असंतुलन आहे त्या योग्य उपचार घेऊन त्यांच्या नवजात अर्भकासाठी स्तनपान करू शकतात.
घ्रेलिन, लेप्टीन आणि इन्सुलिन
भुकेच्या संप्रेरकांपैकी महत्वाची असणारी घ्रेलिन आणि लेप्टीन ही संप्रेरके! अनेक संशोधनाअंती प्रसूतीनंतर घ्रेलिन आणि लेप्टीनचे बदलेले प्रमाण नवमातेच्या भूकेवर परिणाम करते, हे लक्षात आले आहे. अनेक नवमातांना भूल लागत नाही किंवा थोडेसे अन्न खाल्यावर एकदम पोट भरल्यासारखे वाटते. आहारातील सातत्याने असणारे साखरयुक्त पदार्थ (लाडू , खीर , मिठाई , पेढे इ.) शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढवतात ज्यामुळे शरीराची चरबी साठवण्याची क्षमता देखील वाढते .
हेही वाचा : Health Special: डॉक्टर गुगलचे फायदे अधिक की, तोटे? काय कराल? काय टाळाल?
कॉर्टिसॉल
नवमातेला जर अतिमानसिक किंवा शारीरिक ताण असेल तर शरीरातील कॉर्टिसॉल या संप्रेरकांचे प्रमाण वाढते. ज्यामुळे कंबरेभोवतालची चरबी वाढते किंवा तशीच राहते. अपुरी झोप, अवेळी खाणे, सातत्याने तणावग्रस्त राहणे यामुळे नवमातांमध्ये कॉर्टिसॉल या संप्रेरकाचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून येते.
बाळ झाल्यानंतर अपुरी झोप/ जागरण हे सगळ्याच नव्याने पालक झालेल्या दाम्पत्यांनी स्वीकारलेलं असतं. अशावेळी जीवनशैलीत योग्य बदल करून त्याप्रमाणे खाण्याचं पथ्य आणि दैनंदिन कामाचं स्वरूप बदलणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ : रात्रीच्या वेळचं खाणं आणि पाणी पिणं यांचं वेळापत्रक बाळाच्या झोपेच्या वेळेप्रमाणे बदलणं. रात्रीच्या वेळी काहीही खाताना त्यात मैदा, साखर यांचं प्रमाण शून्य आहे याची काळजी घेणं. बाळ झाल्यानंतर कुटुंब म्हणून जीवनशैलीत एकत्रित केलेले बदल नवमातांचा मानसिक ताण आणि पोटावरील चरबीचे अनावश्यक प्रमाण कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावतात, असे अनेक प्रसूतीतज्ज्ञांचे आणि स्त्रीरोग तज्ज्ञांचे मत आहे.
हेही वाचा : Health Special: अंथरूण ओले का होते? उपाय काय?
बाळ झोपल्यावर झोपण्याचा प्रयत्न करा हा सल्ला कितीही हास्यास्पद वाटला तरी त्याचं पालन केल्यास अनेक नवमातांना शारीरिक ऊर्जा आणि विश्रांती यांच्या प्रमाणात विशेष फरक पडलेले दिसून येतात. ज्या स्त्रिया गर्भधारणा होण्याआधीपासून व्यायाम करतात त्यांना गर्भारपणादरम्यान आणि प्रसूतीनंतरदेखील उत्तम शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभते .
ताजा कलम: बाळाच्या जन्मांनंतर झोप तर नसतेच हे सामान्यपणे सगळ्याच नवमातांकडून ऐकिवात येते. अलीकडे नवजात अर्भकाच्या झोपेचं गणित सोपं करण्यासाठी गर्भारपणापासूनच त्यांच्यावर वेळेत झोपण्याचे संस्कार केले जाऊ शकतात हे सिद्ध झाले आहे. यामुळे अनेक नवमातांचे झोपेचे वेळापत्रक सुखकर होऊ शकते.