Hair Loss Belly Fat Co Relation: वजन कमी करायचं म्हणून लाइफस्टाइलमध्ये बदल करून झाले, जेवणाच्या वेळा बदलून झाल्या, व्यायाम करून झाले पण काही केल्या वजन कमी होत नाहीच! तुमची पण समस्यां अशीच काहीशी आहे का? तर तुमच्या वाढत्या वजनामागचं खरं कारण जाणून घेणं आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही रागावता, घाबरता, कंटाळता, तणावात असता किंवा तुम्हाला एकटेपणा जाणवत असतो तेव्हा आपल्या मेंदूतून कॉर्टिसॉल शरीरात सोडले जाते जेणेकरून तुम्हाला या भावनांमध्ये मनाचे संतुलन राखता येईल. तुम्ही नीट विचार केलात तर तुमच्या लक्षात येईल की जेव्हा यापैकी एखादी भावना मनात बळावते तेव्हा तुम्ही अधिक खाता, यालाच स्ट्रेस इटिंग म्हणजेच तणावात असताना अधिक खाण्याची सवय असणे असं म्हणतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंडियन एक्सस्प्रेसने डॉ हिमिका चावला, वरिष्ठ सल्लागार, एंडोक्राइनोलॉजी आणि डायबेटोलॉजी, पीएसआरआय हॉस्पिटल यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, कॉर्टिसॉल हा ताणतणावात वाढणारा हार्मोन आहे. तुमचा मेंदू मुख्यतः भय, राग, तणाव, कंटाळवाणेपणा आणि एकाकीपणा यासारख्या भावनांना दडपण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी कॉर्टिसॉल शरीरात सोडतो. यामुळे तुम्हाला अवेळी भूक लागणे, वारंवार खाण्याची इच्छा होणे याचं प्रमाण वाढतं. विनाकारण अनेकदा खाल्ल्याने शरीराला लागणाऱ्या व मिळणाऱ्या पोषणाचे प्रमाण कमी- जास्त होते. केसगळतीच्या अनेक कारणांमध्ये कॉर्टिसॉलची वाढ हे ही महत्त्वाचे कारण आहे. हे कॉर्टिसॉल का व कधी वाढते, त्यावर नियंत्रण कसे ठेवायचे हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया..

कॉर्टिसॉल म्हणजे काय व ते वाढल्यास पोट सुटतं का?

कॉर्टिसॉल हे एक स्टिरॉइड हार्मोन आहे. किडनीच्या वरील बाजूस असणाऱ्या ऍडरनल ग्रंथींमध्ये कोर्टिसोल तयार होतो. जेव्हा तुम्ही तणावात असता तेव्हा तुमच्या रक्तप्रवाहात अतिरिक्त कॉर्टिसॉल सोडले जाते. जेव्हा कॉर्टिसोलची पातळी वाढते, तेव्हा तुमच्या शरीराची अधिक कार्बयुक्त पदार्थ खाण्याची इच्छा वाढते, कारण यामुळे शरीरात इन्सुलिन सोडले जाते कोर्टिसोल नियंत्रित होईल असे अपेक्षित असते.

जेव्हा तुमच्या रक्तप्रवाहात जास्तीचे इन्सुलिन आणि कोर्टिसोल एकत्र येतात, तेव्हा त्यातून लिपोप्रोटीन लिपेस (LPL) तयार होते हे सुद्धा एक चरबी साठवणारे एन्झाइम आहे. या एन्झाईमची पातळी जितकी जास्त असेल तितका व्हिसरल फॅट जमा होण्याचा धोका जास्त असतो. कॉर्टिसोल पेशींना देखील नुकसान करते, ज्यामुळे त्यांची इन्सुलिन संवेदनशीलता कमी होते.

कॉर्टिसोलचा अधिक खाण्याशी काय संबंध आहे?

नमूद केल्याप्रमाणे, कॉर्टिसोल तुम्हाला मिठाई आणि खारट स्नॅक्स सारख्या पदार्थांची लालसा निर्माण करते, ज्यामुळे काही प्रमाणात तुमची चिंता तात्पुरती कमी होते. अशावेळी आधीच सतर्क होऊन तुम्ही खाण्याची निवड योग्य पद्धतीने करायला हवी. अगदी चिप्स किंवा चॉकलेट खाण्यापेक्षा फळे किंवा सुकामेवा यांसारख्या आरोग्यदायी स्नॅक पर्यायांची निवड करा.

आपल्या शरीराला कोर्टिसोलची गरज का आहे?

कॉर्टिसॉल हा एक तणाव नियंत्रण करणारा हार्मोन आहे. या हार्मोनमुळे आपल्या शरीराला आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यास मदत करतो. कॉर्टिसॉलचे उत्पादन तात्पुरते किंवा कमी तीव्रतेचे धोके कमी करू शकते पण दीर्घ कालावधीसाठी जास्त प्रमाणात कॉर्टिसॉल तयार होत असल्यास शरीराचे नुकसान होऊ शकते. कॉर्टिसॉल अति वाढल्यास, वजन वाढणे, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, निद्रानाश, मूड स्विंग आणि कमी ऊर्जा यासह विविध आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

तुम्ही तणावग्रस्त असल्यास, कोर्टिसोलची पातळी कमी करण्यासाठी काय करावे?

तणावग्रस्त असताना, दीर्घ श्वास घ्या, ध्यान किंवा सौम्य व्यायाम करा. तुमचे मन आणि शरीर शांत करणार्‍या गोष्टी करा, जसे की वाचन, गाणी ऐकणे किंवा निसर्गात फेरफटका मारून येणे. स्वत: ची काळजी घेण्यास प्राधान्य द्या, नियमित झोपेचे वेळापत्रक ठेवा आणि कॅफिन सारखे उत्तेजक पदार्थ टाळा. तुम्ही ताण नियंत्रित केल्यास कॉर्टिसॉलचे उत्सर्जन कमी प्रमाणात होते.

कोर्टिसोलचा केस गळतीवर कसा परिणाम होतो?

जेव्हा आपले शरीर उच्च कॉर्टिसोल पातळीसह दीर्घकाळ तणावाखाली असते, तेव्हा ग्रंथी अतिरिक्त कॉर्टिसोल तयार करण्यात व्यस्त असतात ज्यामुळे केसांच्या निरोगी वाढीस समर्थन देणारे हार्मोन्स कमी होतात.

हे ही वाचा<< २४ तासात कधीही ३० मिनिटं मांडी घालून बसण्याचे फायदे; पाठदुखीचा त्रास असेल तर वाचा योग्य पद्धत 

अधिक कॉर्टिसॉल कमी करण्यासाठी कोणत्या वस्तूंचा आहारात समावेश असावा?

संतुलित आहारात कार्बोहायड्रेट्स, विविध फळे आणि भाज्या, ओमेगा-3-युक्त फॅटी ऍसिडस् आणि पालेभाज्या, शेंगदाणे आणि बिया यांसारख्या मॅग्नेशियम-युक्त अन्न स्रोतांचा समावेश करावा. शरीराला किमान काही वेळ व्यायाम व हालचालींची सवय लावावी. तुमच्या झोपेला प्राधान्य देणे आणि दररोज किमान सहा ते आठ तास झोपेची खात्री करणे आवश्यकआहे. जास्त साखर आणि प्रक्रिया केलेले जेवण वर्ज्य करताना कॅफीन आणि अल्कोहोलचे सेवन मर्यादित करा.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is your belly fat not reducing after workout diet plan cortisol stress hormone to be blamed for hair loss and fats how to control svs
Show comments