Perfume Skin Reactions: बाजारात विविध ब्रॅण्डचे परफ्युम्स उपलब्ध आहेत. लोक दररोज कामाला जाताना, कॉलेजमध्ये जाताना मोठ्या प्रमाणात परफ्युम वापरतात. परफ्युममुळे शरीराला आलेल्या घामाची दुर्गंधी स्वत:ला वा इतरांना जाणवत नाही. परंतु, कोणताही परफ्युम वापरण्यापूर्वी दक्षता बाळगणे खूप गरजेचे आहे. तज्ज्ञांच्या मते, मानेवर परफ्युम मारल्याने तुमची तेथील त्वचा काळी पडू शकते. तसेच मानेला जळजळ होणे, खाज येणे आदी त्रास होऊ शकतात. त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि परफ्युमचा वापर करणे टाळा.
इंडियन एक्स्प्रेस.कॉमने या संबंधित माहिती देणाऱ्या एका तज्ज्ञाचा सल्ला घेतला आहे.
परफ्युममुळे खरंच मान काळी पडते?
डर्माझील क्लिनिक, बंगळुरू येथील त्वचाविज्ञान सल्लागार डॉ. अँड्रिया रेचेल यांनी स्पष्ट केले, “मानेवर परफ्युम मारल्याने नेहमीच पिगमेंटरी बदल होत नाहीत. बर्गामोट तेल, लिंबू तेल व द्राक्षांचे तेल यांसारख्या परफ्युम्सच्या काही घटकांमध्ये बर्गप्टेन व फ्युरोकोमरिन असतात; जे फोटो सेन्सिटायझर असतात. काही व्यक्तींना असे परफ्युम त्वचेवर लावल्यास आणि सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यास, ते फायटोफोटोडर्माटायटिसची शिकार बनू शकतात,”
त्यांनी सांगितले की, यामुळे त्वचेला त्रास होतो आणि ठीक होत असल्यास त्वचेचा रंग गडद होऊ शकतो; ज्याला पोस्ट-इन्फ्लेमेटरी हाइपर पिग्मेंटेशन, असेही म्हटले जाते.
त्यांच्या मते, दालचिनी आणि सुगंधी मिश्रण यांसारख्या परफ्युममधील काही घटकांच्या वारंवार संपर्कात येण्यामुळे व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती कमी होऊ शकते; ज्यामुळे त्वचेवर अॅलर्जी, लालसरपणा, पुरळ व खाज सुटते.
त्यांनी पुढे सांगितले की, पिग्मेंटरी कॉन्टॅक्ट डर्मेटायटिस जसे की ‘रिएल्स मेलेनोसिस’ त्वचेवर तपकिरी ते काळे डाग दिसू लागतात; जो त्रास सामान्यतः सौंदर्यप्रसाधने आणि परफ्युममुळे होतो.
परफ्युममध्ये वापरले जाणारे काही घटक जसे की, अल्कोहोल आणि सिंथेटिक सुगंध यांच्यामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो किंवा यामुळे त्वचेमध्ये अॅलर्जी निर्माण होऊ शकते.
डॉ. चिंजिथा टी डेव्हिस, सल्लागार त्वचाविज्ञानी, मणिपाल हॉस्पिटल गोवा यांनी सांगितले की, “काही परफ्युम्स लायकेन प्लॅनस पिगमेंटोसस यांसारख्या ऑटोइम्युन त्वचारोगांनाही चालना देऊ शकतात.”
कसे थांबवावे?
डॉ. रेचेल यांनी परफ्युम्स वा डिडोरंट्स उघड्या त्वचेवर मारण्याऐवजी ते कपड्यांवर मारण्याचा सल्ला दिला. त्यांनी सनस्क्रीन लावण्याबरोबरच सूर्यप्रकाश टाळण्यास प्रोत्साहन दिले; जे त्वचेला हानिकारक किरणांपासून वाचवू शकतात. त्यांनी ‘हायपोअलर्जेनिक’ व ‘सुगंधमुक्त’ उत्पादने वापरण्याचा सल्ला दिला आहे.
“नैसर्गिक परफ्युम चिडचिड आणि प्रकाशसंवेदनशीलतेचा धोका कमी करू शकतात. कारण- त्यांच्यात अनेकदा कठोर रसायने आणि कृत्रिम सुगंध नसतात. तथापि, या नैसर्गिक अशा उत्पादनांमध्ये कोणतेही अॅलर्जी किंवा फोटोसेन्सिटायझिंग एजंट नसल्याची खात्री करून घेणे गरजेचे आहे,” डॉ. डेव्हिस म्हणाले.
दोन्ही डॉक्टरांनी असे परफ्युम्स उघड्या त्वचेवर लावण्यापूर्वी पॅच टेस्टिंगवर भर दिला.
डॉ. रेचेल यांनी त्वचारोगास कारणीभूत असलेल्या परफ्यूमचा वापर थांबवण्याचा सल्ला दिला. पोस्ट-इम्फ्लॅमेटरी हायपर पिग्मेंटेशन हलके करण्यासाठी तशी क्रीम्स लिहून दिली जातात.
उपचार
डॉ. रेचेल यांनी सल्ला दिला, “एटोपिक डर्माटायटीस किंवा एक्झिमाची समस्या असणाऱ्यांनी आधीपासूनच त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. सुगंधांसह परफ्युम किंवा सुगंधी सौंदर्यप्रसाधने वापरल्यानेही त्वचारोग होऊ शकतो. पूर्णपणे सुगंधविरहित उत्पादनांचा वापर करणे हा उत्तम पर्याय आहे.”
हेही वाचा: कच्च्या अंड्यांपासून बनवले जाणारे आईस्क्रीम आरोग्यासाठी योग्य आहे का? तज्ज्ञ काय सांगतात..
डॉ. डेव्हिस यांनी, हायपर पिग्मेंटेड हलके होण्यासाठी कोजिक ॲसिड, अल्फा अर्बुटिन व नियासिनमाइड यांसारख्या क्रीम्स वापरण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी वैद्यकीय सल्ल्याशिवाय स्टिरॉइड क्रीम किंवा हायड्रोक्विनोनयुक्त क्रीम वापरण्यास मनाई केली आहे.
त्यांनी सांगितले, “माइल्ड अल्फा हायड्रॉक्सी अॅसिडस् (AHAs)सह नियमित काळजीपूर्वक एक्सफोलिएशन केल्याने काळपट पडलेली त्वचेचा पोत सुधारण्यास मदत मिळते. मात्र, त्यावर जळजळ होत असल्यास, एक्सफोलिएशन त्याला आणखी खराब करू शकते. रासायनिक उपचारांव्यतिरिक्त क्यू-स्विच केलेले लेसर किंवा फ्रॅक्शनल लेसर यांसारख्या लेझर उपचारांमुळे पिग्मेंटेशन प्रभावीपणे कमी होऊ शकते.”