Coffee Benefits Liver: सकाळी कॉफी प्यायल्याने फक्त फ्रेशच वाटत नाही, तर तो तुमच्या यकृताचे रक्षण करण्याचा सर्वांत सोपा मार्ग असू शकतो. डॉ. सीरियाक अॅबी फिलिप्स त्यांच्या मते, कॉफीमध्ये काही शक्तिशाली गुणधर्म आहेत, जे यकृताचे आरोग्य राखण्यास मदत करतात.
X (ट्विटर) वर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांनी कॉफी पिण्याचे अनेक फायदे सविस्तरपणे सांगितले. “कॉफी यकृतातील चरबीचे प्रमाण कमी करते, यकृतातील चरबीमुळे होणारी जळजळ व डाग कमी करते, फॅटी लिव्हर रोगाचे सिरोसिसमध्ये रूपांतर होण्यास प्रतिबंध करते आणि सिरोसिसच्या रुग्णांमध्ये यकृताच्या कर्करोगाचा विकास होण्यास प्रतिबंध करते किंवा कमी करते. हे कॉफीतील घटकांच्या अँटी-फायब्रोटिक, अँटी-इम्फ्लेमेटरी, अँटी कोलेस्ट्रॉल व अँटीऑक्सिडंट्स प्रभावामुळे घडते, जे बहुतेकदा क्लोरोजेनिक अॅसिड आणि कॅफिनमुळे होते.”
त्यांनी पुढे सांगितले, “युरोपियन असोसिएशन ऑफ स्टडी ऑफ लिव्हर प्रॅक्टिस मार्गदर्शनानुसार, यकृताच्या कर्करोगाचा धोका असलेल्यांनी किंवा दीर्घकालीन यकृताचा आजार असलेल्या रुग्णांनी ते सेवन करावे. त्यांनी दिवसातून किमान तीन कप कॉफी पिण्याची शिफारस केली आहे.”
डॉ. फिलिप्स पुढे म्हणतात की, झोपण्यापूर्वी किमान चार तास आधी कॉफीचा शेवटचा कप घ्यावा. त्याशिवाय, ते म्हणतात की, कॉफीचा रक्तदाब किंवा हृदय गतीवर परिणाम होत नाही आणि रिफ्लक्स, गॅस्ट्र्रेटिस किंवा पोटात अल्सर होण्याचा त्रास होत नाही. यकृताच्या कर्करोगाचा धोका असलेल्या व्यक्तींनी, दररोज किमान तीन कप काळी, गोड न केलेली कॉफी प्यावी. हे फायदे मुख्यत्वे क्लोरोजेनिक अॅसिड आणि कॅफिन यांसारख्या संयुगांपासून मिळतात, जे फॅटी लिव्हर रोग सिरोसिससारख्या गंभीर स्थितीत जाऊ नये यासाठी किंवा थांबवण्यासाठी एकत्र काम करतात.
https://twitter.com/theliverdr/status/1889533107596066834
पण यकृताच्या आरोग्यासाठी कॉफी खरेच फायदेशीर आहे का?
कोशिस हॉस्पिटलमधील इंटरनल मेडिसिनच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. पलेती शिवा कार्तिक रेड्डी यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले, “कॉफीचे सेवन यकृताच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, या दाव्याला अनेक अभ्यासांनी समर्थन दिले आहे. जर्नल ऑफ क्लिनिकल अॅण्ड एक्स्पेरिमेंटल हेपॅटोलॉजी (२०१६) मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की, दररोज किमान दोन कप कॉफीचे सेवन केल्याने त्यातील अँटिऑक्सिडंट्स आणि दाहविरोधी गुणधर्मांमुळे यकृत फायब्रोसिस आणि सिरोसिसचा धोका कमी होतो.”
यामागील यंत्रणांमध्ये हे समाविष्ट आहे :
अँटी-फायब्रोटिक प्रभाव
कॉफी यकृतातील स्टेलेट पेशी सक्रिय होण्यास आणि जास्त प्रमाणात कोलेजन जमा होण्यास प्रतिबंध करते, कोलेजन हा यकृत फायब्रोसिसमधील एक प्रमुख घटक आहे. (वर्ल्ड जर्नल ऑफ हेपॅटोलॉजी, २०१७).
अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म
कॉफीमधील क्लोरोजेनिक आम्ल ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करते, जे यकृताची जळजळ होण्यासह नुकसानीस कारणीभूत ठरतो (क्लिनिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि हेपॅटोलॉजी, २०२०).
लिपिड चयापचय नियमन
कॉफीचे घटक लिपिड ऑक्सिडेशन सुधारतात, यकृतातील चरबी जमा होण्यास कमी करतात, ज्यामुळे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोग (NAFLD) वाढ रोखली जाते (BMC पब्लिक हेल्थ, २०२१).
फायदेशीर डोसवर
डॉ. रेड्डी यांच्या मते, वैज्ञानिक साहित्य या कल्पनेला समर्थन देते की, मध्यम कॉफीचे सेवन यकृताच्या आरोग्याचे रक्षण करते.
“बीएमसी पब्लिक हेल्थमध्ये २०२१ मध्ये झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले की, कॅफिनयुक्त आणि कॅफिनयुक्त नसलेली या दोन्ही कॉफींमुळे दीर्घकालीन यकृत रोगाचा धोका लक्षणीयरीत्या कमी झाला. दररोज तीन ते पाच कप कॉफी पिण्यातून हे फायदे आढळले. त्याव्यतिरिक्त, क्लिनिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी व हेपॅटोलॉजी (२०२०) च्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, दररोज तीन कपपेक्षा जास्त सेवन केल्याने यकृताच्या कडकपणा कमी होतो, ” असे डॉ. रेड्डी यांनी सांगितले.
परंतु, ते सावध करतात की, जास्त कॉफीचे सेवन (सहा कपांपेक्षा जास्त) फायदेशीर ठरू शकत नाही आणि त्यामुळे अस्वस्थता किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो. अशा प्रकारे यकृताच्या फायद्यांसाठी दररोज तीन ते पाच कप काळी, गोडविरहीत कॉफी फायदेशीर ठरते.