.तुमच्यापैकी अनेक जण केसगळतीवर विविध प्रकारचे उपाय करून पाहतात; पण काहीच फरक पडत नाही. अशा वेळी केसांना गूळ लावल्यास या सर्व समस्यांपासून आराम मिळू शकतो आणि केस निरोगी, मजबूत व अधिक लवचिक होण्यासही मदत होते, असे मानले जाते. याबाबत आहारतज्ज्ञ अदीबा इकराम सय्यद यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे; ज्यात गूळ रात्रभर पाण्यात भिजवत ठेवा आणि सकाळी ते पाणी गाळून घेऊन, केसांवर स्प्रे करा, असा सल्ला दिला आहे. पण, त्यामुळे खरंच केस वाढण्यासह नैसर्गिकरीत्या मजबूत होतात का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याच प्रश्नावर हैदराबादमधील हायटेक सिटी केअर हॉस्पिटल्समधील आहारतज्ज्ञ सादिया यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.
आहारतज्ञ सादिया म्हणाल्या की, गूळ हा एक पारंपरिक साखरेचा प्रकार आहे; जो लोह, मॅग्नेशियम व पोटॅशियम यांसारख्या पोषक खनिजांनी समृद्ध आहे. हे पोषक घटक केसांच्या आरोग्यासह संपूर्ण आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जातात. त्यामुळे रक्ताभिसरण क्षमता सुधारते आणि केसांच्या मुळांमध्ये ऑक्सिजन चांगल्या प्रकारे वितरित होतो. एकंदरीत संतुलित पोषण हे केस मजबूत आणि अधिक लवचिक बनण्यास हातभार लावू शकते.
गुळामध्ये असलेले पोषक घटक
डॉ. सादिया यांनी गुळाच्या पाण्यात कोणते पोषक घटक असतात याविषयी माहिती दिली आहे.
१) लोह : योग्य रक्ताभिसरणासाठी आवश्यक असते. त्यामुळे केसांच्या मुळांमध्ये ऑक्सिजन पोहोचवण्यास मदत होते. त्याशिवाय केसांची वाढ होते आणि केस मजबूत होतात.
२) मॅग्नेशियम : प्रोटीन आणि ऊर्जा उत्पादनात मदत होते; जे केसांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.
३) अँटीऑक्सिडंट्स : गुळात अँटिऑक्सिडंट्सचे गुणधर्म असतात; जे ऑक्सिडेटिव्ह तणावाचा सामना करण्यास मदत करतात. ऑक्सिडेटिव्ह तणावामुळे केसांचे नुकसान होते आणि केस गळू लागतात.
इतर नैसर्गिक उपायांशी तुलना
फ्लॉलेस कॉस्मेटिक क्लिनिक व ILACAD संस्थेच्या संचालक, सेलिब्रिटी कॉस्मेटोलॉजिस्ट डॉ. मोनिका कपूर यांनी स्पष्ट केले की, केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी इतर नैसर्गिक उपाय किंवा उपचारांच्या तुलनेत गूळ केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे आणि तो आवश्यक पोषक घटकांची कमतरता दूर करतो. काही नैसर्गिक उपाय केसांच्या विशिष्ट पैलूंवर लक्ष केंद्रित करू शकतात; जसे की टाळूचे आरोग्य किंवा केसांचे कंडिशनिंग. पण, गूळ संपूर्ण केसांच्या आरोग्यासाठी अनेक पोषक घटक प्रदान करतो. त्यामध्ये पोषण, हायड्रेशन व नुकसान होण्यापासून संरक्षण अशा गोष्टींचा समावेश आहे.
गुळाचे पाणी हा एक सर्वांगीण उपाय आहे; जो अंतर्गत पोषण प्रदान करतो. पण, केसांवर गुळाचे पाणी फवारण्यापेक्षा गुळाचे सेवन करणे चांगले आहे. कारण- गुळ्याच्या पाण्याने केस चिकट होऊ शकतात.
आहारतज्ज्ञ सादिया पुढे म्हणाल्या की, खोबरेल तेल किंवा कोरफड यांसारख्या इतर उपचारांच्या तुलनेत, गुळ केस आणि टाळूपर्यंत थेट पोषण घटक पोहोचवते. पण गूळ संपूर्ण आरोग्य सुधारुन शरीराच्या आतून आणि बाहेरुनही कार्य करू शकतो. काही उपायांमुळे तत्काळ फायदे मिळू शकतात; पण गूळ शारीरिक कार्ये आणि पोषक पुरवठा वाढवून, केसांच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी योगदान देतो.
सादिया यांनी नमूद केले की, काही व्यक्तींना गुळाची अॅलर्जी असू शकते. गुळाचे पाणी वापरणे केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते; परंतु ते प्रमाणात वापरणे गरजेचे आहे.