Gut, Stomach Infection Home Remedies: पावसाळ्याच्या दिवसांमध्ये संसर्गाचा धोका अधिक असतो. विशेषतः पाण्यातून पसरणारे आजार या महिन्यांमध्ये डोकं वर काढतात. काही वेळा आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती या आजाराच्या विषाणुंसमोर दुबळी पडते. मुख्यतः यामुळे पचनाचे आजार बळावतात. तुम्हालाही या पावसात तुमच्या आतड्यांचे, पोटाचे आरोग्य जपायचे असेल तर आपण आहारात काही गोष्टींचा आवर्जून समावेश करायला हवा. काळजी करू नका, कुठलाही वेगळा खर्च वाढवणारा उपाय आम्ही तुम्हाला करायला सांगणार नाही आहोत. उलट तुमच्या किचनमधील काही मसाले वापरून तुम्ही तुमच्या आतड्यात सूक्ष्मजंतू जाण्यापासून रोखू शकता. हे मसाले म्हणजे जिरं, कलौंजी (काळं जिरं किंवा नायगेला बी) आणि ओवा. आता आपण इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्सच्या पोषणतज्ज्ञ कनिका नारंग यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले मसाल्यांच्या सेवनाचे फायदे व योग्य पद्धत जाणून घेऊया..
पावसाळ्यात जिऱ्याच्या सेवनाचा फायदा (Benefits Of Eating Cumin)
जिऱ्यामध्ये लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि ए, सी व ई जीवनसत्व मुबलक प्रमाणात असते. खरं तर, जीवनसत्व सी चा मोठा साठा असल्याने पोटाच्या संक्रमणाला आळा घालण्यास जिऱ्याची मदत होते. काही खाल्ल्यावर आपल्याला उलट्या होणे किंवा पोटात अस्वस्थ जाणवणे असे त्रास होत असतील तर त्यावर जिरं हा सर्वोत्तम उपाय आहे. जिऱ्यामुळे स्वादुपिंडाच्या एन्झाईम्सचा स्त्राव उत्तेजित होतो.
फॅट्स, प्रथिने आणि कार्ब्सच्या पचनास मदत होते. जिऱ्यामधील थायमोक्विनोन हे नैसर्गिक संयुग यकृताचे रक्षण करते. पावसाळ्यात अपचन, पोटात गॅस होणे आणि जुलाब यांसारखे पचनाचे विकार होण्यापासून जिरं आपल्याला वाचवू शकतं. शिवाय जिऱ्यामध्ये जिरायडीहाइड सारखे अँटिऑक्सिडंट्स असतात जे जळजळ कमी करण्यास मदत करू शकतात.
सर्वोत्तम वापर: तुमच्या जेवणात एक चमचा भाजलेले जिरे किंवा जिऱ्याची पावडर घाला. गरम पाण्यात जिरे उकळून आपण याचा हेल्दी चहा सुद्धा बनवू शकता.
कलौंजी कशी खावी? (How to Use Kalonji In Food)
कलौंजीमध्ये आवश्यक फॅटी ऍसिडस्, अमीनो ऍसिडस, कॅल्शियम, लोह व पोटॅशियम यांचा साठा असतो. शिवाय या बियांमधील थायमोक्विनोन हे मुख्य अँटिऑक्सिडंट सूक्ष्मजंतूंना दूर करते. यामुळे पाचक रसाचा व एन्झाईम्सचा स्त्राव वाढतो. पोटात गोळा येणे, गॅस होणे, बद्धकोष्ठ अशा समस्यांना कलौंजीच्या बिया आळा घालू शकतात. कलौंजीमधील दाहक-विरोधी गुणधर्म अल्सरची वाढ रोखण्यासाठी आणि मद्यपानामुळे पोटाच्या अस्तरांचे झालेले नुकसान दुरुस्त करण्यासाठी प्रभावी असतात.
सर्वोत्तम वापर: कलौंजीच्या बिया सॅलेडमध्ये घालू शकता, ब्रेड आणि बेक केलेल्या पदार्थांच्या रेसिपीमध्ये जोडू शकता. अगदी भाकरी, पोळीवर सुद्धा लावू शकता, किंवा मधासह या बिया खाल्ल्या तरी चालेल.
ओव्याचे फायदे (Benefits Of Carrom Seeds)
ओव्याच्या बियांमध्ये थायमॉलसारखे आवश्यक ऑईल असते, जे त्याच्या प्रतिजैविक आणि अँटीसेप्टिक गुणधर्मांसाठी ओळखले जाते. फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील ओवा शरीराला प्रदान करतो.ओव्यामुळे जठरात पाचक रसाचा स्राव वाढून आतड्यांमधील पचन जलद होऊ शकते. यामुळे अपचन, गॅस आणि सूज दूर करण्यास मदत होते. पेप्टिक अल्सर, तसेच अन्ननलिकेत, पोटात, आतड्यांमध्ये आलेल्या फोडांवर सुद्धा ओवा उपचार करू शकतो.
हे ही वाचा<< तुळशीचे पाणी पिण्याचे अमृतासमान फायदे वाचा; सर्वाधिक फायद्यांसाठी कसे करावे सेवन? वाचा आहारतज्ज्ञांचा स्पष्ट सल्ला
सर्वोत्तम वापर: जेवणानंतर ओव्यामध्ये चिमूटभर मीठ घालून खाऊ शकता किंवा ओवा पाण्यात उकळून चहा करून पिऊ शकतो. १ ते ५ ग्रॅम ओवा उकळत्या पाण्यात घालून थोडा वेळ ओव्याच्या बिया फुलू द्या. हे कोमट पाणी शरीरात थायमॉलचे शोषण वाढवते. अधिक फायद्यांसाठी सकाळी लवकर ओव्याचे पाणी प्या. स्वयंपाकात काही पदार्थांमध्ये सुद्धा आपण ओवा वापरू शकता.