नवी दिल्ली : दिल्लीतील ५८ टक्के तरुण सांधेदुखीमुळे त्रस्त आहेत, असे ‘एम्स’ने केलेल्या संशोधनात स्पष्ट झाले आहे. सहा तासांपेक्षा अधिक वेळ मोबाइलचा वापर करणाऱ्या ५१० स्वयंसेवकांच्या आरोग्यविषयी माहितीचे विश्लेषण या संशोधनासाठी करण्यात आले.
१८ वर्षांवरील व्यक्तीच्या डोक्याचे वजन चार-पाच किलो असते; परंतु मोबाइलमध्ये पाहताना संबंधित व्यक्ती मान १५ अंशांच्या कोनात वाकते, तेव्हा मानेवरील ताण तीनपट अधिक वाढते. अधिक वेळ मोबाइलचा वापर होतो, तेव्हा मान ६० अंशांच्या कोनात वाकते. त्यामुळे मान आणि पाठीच्या कण्यावरील ताणही वाढतो, असे संशोधकांनी सांगितले.
हेही वाचा >>> Multigrain Rotis : मिश्र धान्यांची पोळी खाणे आरोग्यासाठी चांगले आहे का? वाचा, आहारतज्ज्ञ काय सांगतात…
सर्वसाधारणपणे सांधेदुखी हा आजार आनुवंशिक असल्याचे समजण्यात येते; परंतु ‘एम्स’नुसार ६० टक्के लोकांमध्ये मोबाइल आणि बदललेली जीवनशैली या आजाराला कारण ठरते. हा आजार पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो.
सांधेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी योगासनांचा उपयोग होतो का, हे तपासण्यासाठी ‘एम्स’च्या संशोधकांनी एक प्रयोग केला होता. यामध्ये ६४ स्वयंसेवक सहभागी झाले होते. या वेळी योगासनांचा या आजारावर मात करण्यासाठी चांगला उपयोग होतो, असे स्पष्ट झाले.