Bigg Boss 18 Winner Karan Veer Mehra Opened Up About Having Dyslexia : सध्या अनेक पॉ़डकास्ट आणि मुलाखतींमधून अभिनेता आणि अभिनेत्रींचे न ऐकलेले किस्से ऐकायला मिळतात. त्यामध्ये ते त्यांची सक्सेस स्टोरी असो किंवा वैयक्तिक समस्यांबद्दल उघडपणे सांगतात. आता मध्यंतरीच फराह खानच्या यूट्यूबवरील कुकिंग शोमध्ये बिग बॉस १८ चा विजेता करण वीर मेहरा (Karan Veer Mehra) गेला होता. त्या दोघांच्या संवादादरम्यान अभिनेत्याने त्याला ‘डिस्लेक्सिया’ आहे, असे सांगितले.
तर, सुरुवातीला डिस्लेक्सिया म्हणजे काय हे समजून घेऊ… डिस्लेक्सिया ही एक वाचनाशी संबंधित समस्या आहे. ज्या मुलांना वाचनात अडथळे आहेत, अशा अनेक मुलांचा अभ्यास केला तेव्हा त्यातले पॅटर्न्स लक्षात आले आणि डिस्लेक्सिया या समस्येचा शोध लागला. तर करण वीर मेहरा या अभिनेत्याने डिस्लेक्सिया असल्यामुळे सर्व शालेय जीवन अगदी जेमतेम पार केले. कारण- करणच्या लहानपणी त्याच्या आई-वडिलांना याबद्दल काहीच कल्पना नव्हती. याच कारणासाठी बिग बॉस १८ या रिॲलिटी शोमधील टास्क वाचण्याचे टाळले, असे त्याने (Karan Veer Mehra) कबूल केले आणि तो म्हणाला, “मी पुस्तके कधीच वाचत नाही…” अभिनेत्याने त्याच्या या समस्येबद्दलची अधिक माहिती दिली नसली तरीही याबद्दल चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आम्ही तज्ज्ञांशी संपर्क साधला.
मानस्थली वेलनेसच्या संस्थापक व संचालक डॉक्टर ज्योती कपूर म्हणाल्या की, डिस्लेक्सिया हा एक ‘लर्निंग डिसऑर्डर’चा आजार आहे, जो वाचन, लेखन व शब्दलेखन प्रभावित करतो. ‘डिस्लेक्सिया’ असलेल्या लोकांना सामान्यत: शब्द ओळखण्यात आणि डीकोडिंग करण्यात अडचण येते, ज्यामुळे वाचन करणे त्यांच्या दृष्टीने आव्हानात्मक ठरू शकते.
मुंबई सेंट्रलच्या, वोक्हार्ट हॉस्पिटल येथील सल्लागार न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शीतल गोयल यांनी सांगितले की, डिस्लेक्सियाच्या इतर अडचणींमध्ये हळू वाचन, पुअर फ्लुएन्सी ( poor fluency), ध्वनीविषयक जागरूकतेसह आव्हाने, सेक्युएन्सिंग डिफिकल्टीज (sequencing difficulties) म्हणजे गोष्टी कोणत्या क्रमाने घडतात हे समजण्यात समस्या, व्हिज्युअल किंवा ऐकण्याच्या प्रक्रियेत आव्हाने येणे यांचा समावेश होतो.
पण, डिस्लेक्सिया असलेल्या व्यक्ती क्रिएटिव्हिटी, समस्या सोडवणे व नावीन्यपूर्ण विचारांमध्ये उत्कृष्ट असतात. या समस्येचे निदान करण्यासाठी वाचन प्रवाह, आकलन, स्मरणशक्ती व ध्वनीत्मक कौशल्ये यांच्या मूल्यांकनामध्ये मानसशास्त्रज्ञ किंवा शैक्षणिक थेरपिस्ट यांचे मूल्यांकन समाविष्ट असते, असे डॉक्टर गोयल म्हणाले आहेत.
तुम्ही काय लक्षात ठेवले पाहिजे?
डिस्लेक्सिया ही समस्या बुद्धिमत्तेशी संबंधित नाही. त्याऐवजी, मेंदू लिखित आणि बोलली जाणारी भाषा कशी प्रकट करतो यांतील फरकांमुळे ही समस्या लक्षात येते.
डिस्लेक्सियाच्या लक्षणांमध्ये अक्षरांमध्ये गोंधळ उडणे (जसे की ‘b’ आणि ‘d’ गोंधळात टाकणे), वाचन व आकलनात अडचण येणे, शब्दलेखनात अडचण येणे, असे डॉक्टर कपूर यांनी नमूद केले.
डिस्लेक्सिया बरा होऊ शकत नसला तरी, मोठ्याने वाचन किंवा मजकूर-टू-स्पीच सॉफ्टवेअर, आणि एक्सटेंड टेस्ट टाइम, ऑडिओबुक यासारख्या बहुसंवेदी शिक्षण पद्धतींचा तुमच्या जीवनात समावेश करा; असे डॉक्टर गोयल म्हणाले आहेत. अनेक व्यक्ती सामना करण्याच्या धोरणांचा विकास करतात. डिस्लेक्सिया असलेले बरेच लोक अजूनही शैक्षणिक आणि जीवनाच्या इतर क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करू शकतात ; असे डॉक्टर कपूर म्हणाले.