Kareena Kapoor feeling happy in 40s: करीना कपूर खानने नेहमीच वाढत्या वयात होणारे बदल मोकळ्या मनाने स्वीकारले आहेत. अमेरिकन अभिनेत्री व लेखिका गिलियन अँडरसनशी झालेल्या गप्पांमध्ये करीनाने तिच्या चेहऱ्यावरील फाईन लाइन्सबद्दल सांगितले.
“माझ्या चेहऱ्यावर इकडे-तिकडे असणाऱ्या लाइन्स मला खूप आवडतात. त्या काहीशा सेक्सी दिसतात. असं असलं तरी, मला असं वाटतं की, मी माझ्या चाळिशीमध्ये विशीपेक्षा जास्त आनंदी आहे,” असे करीना म्हणाली.
“मला जो नैसर्गिक मार्ग आहे, त्याच मार्गाने जावे, असे वाटते. मी अजूनही म्हातारी झालेली नाही. मी अजूनही रॉकिंग आहे,” असे ४४ वर्षीय करीना कपूर खान हिने द डर्टी मॅगझिन पॉडकास्टमध्ये सांगितले.
संभाषणादरम्यान करीना म्हणाली की, महिलांकडून नेहमीच ‘लाजाळू’ असण्याची अपेक्षा केली जाते; परंतु ही धारणा आता थोडी बदलत आहे.
तिने मांडलेल्या या दृष्टिकोनाबद्दल अधिक समजून घेऊया…
‘मनस्थली वेलनेस’च्या संस्थापक-संचालक व वरिष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. ज्योती कपूर यांनी सहमती दर्शवली की, बरेच लोक त्यांच्या २० व्या वर्षापेक्षा ४० व्या वर्षी अधिक आनंदी वाटतात आणि ही भावना चुकीची नाही.
“वयानुसार येणारा आत्मविश्वास, शहाणपण व स्पष्टता या बाबी सर्व फरक घडवू शकतात. विशीमध्ये जीवनप्रपंचाच्या वाटा शोधणे, जबाबदाऱ्या सांभाळणे आणि नातेसंबंध समजून घेणे यामध्ये आपण गोंधळलेलो असतो. काहीतरी साध्य करण्याचा, इतरांसोबत स्वतःची तुलना करण्याचा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा मोठा दबाव असतो. पण, जेव्हा तुम्ही वयाच्या चाळिशीत पोहोचता तेव्हा अनेकांना स्वतःमध्ये स्थिरावण्याची भावना येते,” असे डॉ. कपूर म्हणाल्या.
तेव्हा बाह्य मान्यताची गरज कमी होते आणि लक्ष खरोखर आनंद देणाऱ्या गोष्टींकडे वळते; मग ते नातेसंबंध असोत, करिअर असोत किंवा वैयक्तिक वाढ असो, असे डॉ. कपूर यांनी स्पष्ट केले.
“वय वाढत असताना एक मोठा बदल म्हणजे आपल्याला अधिक आकर्षक वाटू लागणं. ही बाब नेहमीच तरुण दिसण्याबद्दल नाही, तर अनुभवामुळे आपलं शरीर आणि स्वतःला स्वीकारण्यात आहे. आपल्यामध्ये जो शारीरिक, मानसिक व भावनिक आत्मविश्वास आहे, तो आकर्षणाचा शक्तिशाली स्रोत बनतो,” असं डॉ. कपूर यांनी सांगितलं.
तज्ज्ञांनी सांगितलं की, जे दबाव कधी काळी तुम्हाला पूर्णपणे व्यापत होते, ते हळूहळू कमी होतात आणि त्यामुळे तुमच्या आत एक मजबूत आणि अधिक समतोल व्यक्तिमत्त्वासाठी जागा निर्माण होते.
“परिणामी या नवीन आत्मविश्वासामुळे मिळणारा आनंद अतुलनीय आहे, ज्यामुळे अनेकदा पूर्वीपेक्षा अधिक समाधान आणि आत्ममूल्याची भावना निर्माण होते,” असे डॉ. कपूर म्हणाल्या.