Alcohol Effect On Heart and Cardiovascular Health : अभिनेता राज कपूर यांचा सर्वात लहान मुलगा आणि अभिनेता राजीव कपूर यांचे २०२१ साली निधन झाले. राजीव कपूर यांना ‘राम तेरी गंगा मैली हो गई’ चित्रपटातून प्रसिद्धी मिळाली. पण, एक अभिनेता म्हणून त्यांना ही प्रसिद्धी फार काळ टिकवता आली नाही. राजीव कपूर हे ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांचे भाऊ आहेत, पण वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राजीव कपूर हे अभिनेत्री खुशबू सुंदर यांचे चांगले मित्र होते. राजीव कपूर यांच्या निधनानंतर अलीकडेच खुशबू यांनी त्यावर भाष्य केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खुशबू यांनी सांगितले की, राजीव यांना सर्वात जास्त मद्याचे व्यसन होते. मद्याच्या व्यसनाचा त्यांच्या आरोग्यावर खूप जास्त परिणाम झाला होता. तसेच राजीव यांना हृदयविकाराचा त्रास होता, पण त्यांच्या मद्याच्या व्यसनामुळे हा त्रास खूपच वाढला आहे हे समजले. त्यांचे मद्याचे व्यसन सोडवण्यात आम्हाला यश आले नाही.

त्या पुढे म्हणाल्या की, ‘राजीव खूप अशक्त झाले होते. त्यांना गुडघ्यामध्ये खूप त्रास जाणवत होता, त्यामुळे त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. मात्र, याचा फायदा काही झाला नाही. राजीव यांची तब्येत बरी होणे कठीण आहे हे आम्हाला माहीत होतं. राजीव यांचे निधन झाले तेव्हा मी मुंबईत होते. त्यांच्या निधनाची बातमी मला बोनी कपूर यांनी दिली. माझ्यासाठी हा धक्काच होता.

खुशबू यांनी सांगितले की, मृत्यूच्या एक दिवस आधी माझे राजीवशी बोलणे झाले होते. यावेळी त्याला खूप ताप होता आणि तो कोविडचा काळ होता. तो तब्येतीची तितकीशी काळजी घ्यायचा नाही, यावेळीही त्याने मला लवकरच भेटण्याचे आश्वासन दिले होते.

दरम्यान, यानंतर पुन्हा एकदा मद्यप्राषनाने हृदय व रक्तवाहिन्यांच्या आरोग्यावर कसा गंभीर परिणाम होतो हे स्पष्ट होत आहे. कमी प्रमाणात प्रद्यप्राषन करणे हे कधी कधी तितकेसे घातक नसते असे लोक मानतात. परंतु, त्यानंतरही हृदय आणि रक्तवाहिन्यांवर कसा परिणाम होतो, याविषयी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना काही डॉक्टरांनी माहिती दिली आहे.

मद्याचे व्यसन आणि हृदय, रक्तवाहिन्यांवर होणार परिणाम

इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना फरीदाबादमधील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे सिनियर कन्सल्टंट इंटरव्हेशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. प्रतीक चौधरी म्हणाले की, मद्य हे थेट कार्डिओटॉक्सिन आहे, याचा अर्थ मद्याचे सेवन केल्यास त्याचा थेट परिणाम हृदयाच्या स्नायूंवर होऊ शकतो, ज्यामुळे हृदयाची पंप करण्याची क्षमता कमकुवत होऊ शकते.

जास्त काळ मद्याचे सेवन केल्याने हृदयाच्या स्नायूंवर गंभीर परिणाम होतात. हृदयाची कार्यक्षमता कमी होते, हृदय गती असामान्य होऊ शकते. उदाहरणार्थ, जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने ॲट्रियल फायब्रिलेशन नावाची स्थिती उद्भवू शकते, ज्याला ‘हॉलिडे हार्ट सिंड्रोम’ असेही म्हणतात. जेव्हा एखादी व्यक्ती सुट्टी किंवा सणासमारंभाच्या दिवशी खूप मद्यप्राषन करते, तेव्हा त्याच्या हृदयाची गती ही असामान्य होते. मद्यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो, ज्यामुळे हृदयाच्या एकूण आरोग्यावर त्याचा परिणाम होतो.

दीर्घकाळापासून मद्याचे सेवन करत असल्यास व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते, ज्यामुळे ती व्यक्ती क्षयरोगासारख्या संसर्गजन्य आजारास बळी पडू शकते. दीर्घकाळ मद्याचे सेवन केल्यास शरीरात पौष्टिक घटकांची कमतरता जाणवू लागते, ज्याचा हृदयावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

डॉ. चौधरी यांनी सांगितले की, “कमी प्रमाणात मद्याचे सेवन करणे, यातही विशेषतः रेड वाईनचे सेवन करणे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते, असा एक सामान्य गैरसमज आहे.

मद्याच्या सेवनाने शरीरात गुड कोलेस्ट्रॉलच्या पातळीत थोडीशी वाढ होऊ शकते, परंतु कोणत्याही वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वांमध्ये मद्य हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते असे नमूद करण्यात आलेले नाही.

मद्याच्या सेवनाचे फायदे कमी आणि तोटेच अधिक आहेत. यामुळे हृदयाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे कोणत्याही आरोग्य फायद्यासाठी मद्याच्या सेवनास प्रोत्साहन देणे मूर्खपणाचे ठरते.

थंडीत दारू पिणे शरीरासाठी फायदेशीर की घातक?

K

L

तज्ज्ञ ठळकपणे नमूद करतात की, आणखी एक गैरसमज असाही आहे की, थंड हवामानात मद्यामुळे तुम्हाला शरीर उबदार ठेवण्यास मदत होते. परंतु, प्रत्यक्षात मद्यामुळे शरीरात व्हॅसोडिलेशन होते, ज्यामुळे तुम्हाला तात्पुरते उबदार वाटते; परंतु यामुळे आरोग्यावर परिणाम होतो, तुमच्या शरीराअंतर्गत तापमान कमी होते.

थंडीत लोक मद्यप्राषन करणे फायदेशीर असते असा चुकीचा समज बाळगतात, पण याने तुमच्या मज्जासंस्थेवर विपरित परिणाम होत असतो.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khushbu sundar opens up about rajiv kapoors struggles with excessive alcohol addiction and its impact on his heart cardiovascular health what doctors said read sjr