Early Signs of Kidney Disease: मूत्रपिंड म्हणजेच किडनी हा आपल्या शरीराचा सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. किडनी निकामी होण्याची समस्या गेल्या काही वर्षांत अधिक प्रमाणात दिसून येत आहे. किडनीचा आजार जितका धोकादायक आहे, तितकाच हा आजार उशिरा ओळखला जातो. त्यामुळे किडनीची थोडीशी समस्यादेखील किडनी पूर्णपणे खराब होण्याचे कारण बनते. किडनी फेल्युअरची लक्षणे इतकी सौम्य असतात की, हा आजार वाढत नाही तोपर्यंत बहुतेक लोकांना काही फरक जाणवत नाही. किडनी बिघडण्याची काही चिन्हे आहेत, जी तुम्हाला वेळेवर सांगतील की तुमची किडनी खराब होऊ लागली आहे आणि तुम्ही त्याकडे लवकर लक्ष दिले पाहिजे. या विषयावर दी इंडियन एक्स्प्रेसने माहिती दिली आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊ.
किडनी हा आपल्या शरीरातील महत्त्वपूर्ण अवयवांपैकी एक आहे. त्यामुळे त्याकडे लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे. कारण- किडनी आपल्या शरीरात गाळणीप्रमाणे काम करते. किडनी आपल्या शरीरातील टाकाऊ घटक वेगळे करून, ते शरीराबाहेर टाकण्याचे काम करीत असते. त्यामुळे शरीरातील हानिकारक विषाक्त घटक बाहेर निघण्यास मदत होते. किडनीचे कार्य सुरळीत चालू राहण्यासाठी शरीर डिटॉक्स होणे फार महत्त्वाचे आहे. जेव्हा किडनीत कोणत्याही प्रकारचे संक्रमण किंवा बिघडण्याची प्रक्रिया सुरू होते, तेव्हा ते शरीराला विविध प्रकारचे ‘संकेत’ (सिग्नल्स) देते. मूत्रपिंडाच्या आजाराची सर्वांत मोठी समस्या ही आहे की, जोपर्यंत हा आजार जास्त प्रमाणात पसरत नाही तोपर्यंत व्यक्तीला वेदना जाणवत नाहीत.
निरोगी शरीरासाठी किडनी निरोगी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा जेव्हा मूत्रपिंडात कोणत्याही प्रकारचा संसर्ग होतो तेव्हा तेव्हा मूत्रपिंड तुम्हाला काही खास संकेत देऊन सावध करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे मूत्रपिंडाच्या आजाराशी संबंधित चिन्हे ओळखा. कारण- एकदा किडनीचा आजार बळावला की, जीवालाही धोका निर्माण होतो. जर तुम्हाला तुमची किडनी खराब होऊ द्यायची नसेल, तर वेळीच ओळखा खाली दिलेले संकेत :
(हे ही वाचा : झोपेतून उठताच एक ग्लास पाण्यात ‘हा’ रस मिसळताच आतड्यांमध्ये जमलेली घाण झपाट्याने पडेल बाहेर, सेवनाची पद्धत समजून घ्या )
१. खाज सुटणे
किडनीच्या समस्या आपल्या शरीराच्या अनेक अवयवांवर थेट परिणाम करतात. त्यामध्ये त्वचेचाही समावेश होतो. त्वचेमध्ये कोरडेपणा आणि खाज येणे हेदेखील किडनी विकाराचे मुख्य लक्षण आहे.
२. स्नायूंमध्ये तीव्र वेदना
स्नायूंमध्ये तीव्र वेदना होणे हे किडनीच्या आजाराचे पहिले लक्षण असू शकते.
३. मळमळ आणि उलटी
किडनीच्या नुकसानीमुळे मळमळ, उलट्या व भूक न लागणे यांसारखी गॅस्ट्रोइंटेस्टायनल लक्षणेदेखील दिसू शकतात.
४. भूक न लागणे
शरीरात विषारी पदार्थ आणि कचरा जमा झाल्यामुळे तुमची भूक कमी होऊ शकते. हे मूत्रपिंड निकामी होण्याचे धोकादायक लक्षण आहे; ज्याकडे कोणाचेही लक्ष नसते.
५. पायांमध्ये सूज
पायांना सूज येणे हे किडनी खराब असण्याचे लक्षण असते. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करणे टाळले पाहिजे.
६. वारंवार लघवी होणे
वारंवार लघवी होणे हे मूत्रपिंड निकामी होण्याचे लक्षण आहे. मूत्रपिंडाच्या समस्येच्या बाबतीत, व्यक्तीला खूप वेळा लघवी करण्याची तीव्र इच्छा जाणवते. ही स्थिती किडनीला नुकसान पोहोचवते.
७. श्वास घेण्यास त्रास
आपण श्वास घेऊ शकत नाही असे वाटणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे हे मूत्रपिंडाच्या आजाराचे संभाव्य लक्षण आहे. श्वास घेण्याची क्षमता कमी होणे हेदेखील किडनी खराब असल्याचे एक लक्षण आहे.
८ झोप न येणे
झोप न येणे आणि अपरात्री जाग येणे हे एक किडनी खराब असण्याचे लक्षण आहे.
तुमची किडनीने अचानक काम करणे थांबवल्यास (तीव्र मूत्रपिंड निकामी), तुम्हाला खालीलपैकी एक किंवा अधिक लक्षणे दिसू शकतात
- पोट दुखणे
- पाठदुखी
- अतिसार
- ताप
- नाकातून रक्त येणे
- पुरळ
- उलट्या होणे
अशा प्रकारे किडनी खराब होण्याचे संकेत वेळीच ओळखून तुम्हाला धोका टाळता येऊ शकतो.