Kidney Failure Signs & Cure: किडनीचा आजार हा भारतातील वाढत्या चिंतेचा विषय आहे. किडनीच्या आजारासाठी सर्वात मोठे कारण ठरते आपली जीवनशैली. घड्याळाच्या काट्यावर धावत असताना आपल्याला बहुतांश कामे ही बसूनच पूर्ण करायची असतात यामुळेच शरीराची हालचाल थांबली आहे. परिणामी पचनक्रिया, रक्ताभिसरण यासारख्या नियमित हालचाली सुद्धा कमी वेगाने होऊ लागल्या आहेत. याच कारणाने किडनीच्या कामाचा वेगही मंदावला गेल्याचे मागील काही काळात दिसून आले आहे. शरीरातील घातक युरिक ऍसिड जेव्हा मलमूत्रावाटे बाहेर फेकण्यास किडनी असमर्थ होते तेव्हा किडनी स्टोनचा धोका बळावतो. इतकेच नाही तर कालांतराने किडनी निकामी होण्याची सुद्धा शक्यता असते. मात्र ही प्रक्रिया काही एक दिवसात होत नाही. याआधीच शरीर तुम्हाला खूप स्पष्ट संकेत देत असतं. किडनी निकामी होण्याआधीची लक्षणे कशी ओळखायची व त्यावर उपाय काय हे आता आपण पाहूया…
किडनी खराब होण्याआधी शरीर देते हे संकेत (Symptoms of Kidney Disease)
डॉ शरद शेठ यांनी HT ला दिलेल्या माहितीनुसार, “किडनीच्या आजाराची लक्षणे रोगाच्या टप्प्यानुसार बदलू शकतात. सुरुवातीच्या टप्प्यात, कोणतीही लक्षणे दिसू शकत नाहीत. तथापि, रोग जसजसा वाढत जातो तसतसे लक्षणांमध्ये थकवा, अशक्तपणा, भूक न लागणे, झोप लागणे आणि स्नायूंना क्रॅम्प येणे यांचा समावेश असू शकतो. पाय, घोटे किंवा पायांना सूज येणे आणि लघवीच्या पद्धतींमध्ये बदल देखील होऊ शकतो.”
पीडी हिंदुजा हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटरच्या नेफ्रोलॉजीच्या सल्लागार डॉ. नेहा पुनाटर यांच्या मते, संभाव्य लक्षणे तुम्हाला किडनीच्या आजाराची सूचना देऊ शकतात:
- थकवा
- झोप न येणे
- कोरडी त्वचा व खाज
- सतत लघवीला जावेसे वाटणे पण लघवी न होणे
- लघवीमध्ये फेस किंवा रक्त येणे
- डोळ्याभोवती सूज येणे
- सुजलेले पाय
- कमी भूक
- मळमळ आणि उलटी
- स्नायू क्रॅम्प
- धाप लागणे
हे ही वाचा<< काकडी ताजी आहे की कडू कसे ओळखाल? उन्हाळ्यात शॉपिंग करताना ‘या’ ५ टिप्स लक्षात ठेवा
दरम्यान, चांगली बातमी अशी आहे की जेव्हा लवकर निदान होते तेव्हा वेळीच आवश्यक बदल करून आपण किडनी रोग होण्याचा धोका लक्षणीयरीत्या कमी करू शकतो. त्यामुळे शक्य असल्यास ही लक्षणे वेळोवेळी तपासून घ्या. गरज भासल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. उन्हाळ्याचे दिवस सुरु असल्याने शरीर हायड्रेटेड ठेवणे, भरपूर पाणी पिणे व नियमित निदान चालण्याचा व्यायाम करणे हे आवश्यक आहे.