Kidney Health: किडनी ही आपल्या शरीराच्या सर्वात महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. शरीरातून मलमूत्र बाहेर काढणे हे किडनीचे काम असते जर हे काम वेळीच झाले नाही तर कॅन्सर पासून हृदयविकार, मेंदूचे विकार असे अनेक धोके बळावू शकतात. किडनी शरीरातील मीठ (सोडियमचे प्रमाण), मिनरल्स व पाणी यांचे संतुलन राखण्यास मदत करते. तसेच शरीरातील ph लेव्हल नियंत्रणात ठेवण्याचे कामही इथूनच होते. किडनीमुळे हाडांना व मांसपेशींना मजबूत ठेवणारे घटक शरीरात योग्य प्रमाणात सक्रिय राहतात. किडनीची ही सगळी कामं वाचून तुम्हालाही महत्त्व लक्षात आलं असेलच. किडनी निकामी झाल्यास क्रोनिक आजारांची सुरुवात होऊ शकते.

किडनीच्या आजारांची चाहूल ही बारीक बदलांनी सुरु होते. लघवीचा रंग बदलणे, सतत हात पाय दुखणे, ऊर्जा न राहणे, त्वचा सुकणे ही सर्व किडनी खराब होण्याची लक्षणे आहेत. तुम्हालाही हे बदल जाणवत असतील तर घाबरून जाण्याचे कारण नाही पण निदान आहारात थोडा बदल करुन तुम्ही किडनीचे आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करू शकता आहारतज्ज्ञ लवनीत बत्रा यांच्या माहितीनुसार आपल्या आहारात खालील ४ गोष्टींचा समावेश करून आपण किडनीला निरोगी ठेवू शकता.

लाल शिमला मिरची: (Red Bell Pepper)

लाल शिमला मिरचीत पोटॅशियम कमी असल्याने याचे सेवन किडनीच्या आरोग्यासाठी लाभदायी ठरू शकते. याशिवाय लाल भोपळी मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी ६, फॉलिक ऍसिड, फायबर यांचे प्रमाण मुबलक असते म्हणूनच किडनीसाठी ही मिरची सुपरफूड सिद्ध होऊ शकते.

लसूण: (Garlic)

लसूण सुद्धा औषधीय गुणांनी युक्त असते. जेवणाचा स्वाद वाढवताना लसणाचा तडका झटपट मोठे काम करू शकतो. लसणात व्हिटॅमिन सी, मँगनीज, व्हिटॅमिन बी यांचे प्रमाण मुबलक असते. याशिवाय लसूण ही अँटी इन्फ्लेमेंटरी मानली जाते यामुळे शरीराला सतत सूज येत असल्यास अशा लोकांना लसणाचा नक्कीच फायदा होऊ शकतो.

कांदा : (Onion)

किडनीचे आजार असल्यास कांद्याचे सेवन अत्यंत फायद्याचे ठरू शकते. तज्ज्ञांच्या माहितीनुसार तुम्ही कांदा व लसूण एकत्र ऑलिव्ह ऑइलमध्ये भाजून त्याचे वाटपच तयार करून ठेवू शकता, जेणेकरून प्रत्येक वेळेस कांदा कापणे, लसूण सोलणे ही मेहनत करावी लागणार नाही. ऑलिव्ह ऑइल सुद्धा किडनीचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रभावी असते.

हे ही वाचा<< किडनी स्टोन झाल्यास शरीरात सर्वात आधी दिसतात ‘ही’ लक्षणे; नेमका धोका कशाने वाढतो?

सफरचंद: (Apple)

सफरचंदामध्ये पोटॅशियम, सोडियम व फॉस्फरसचे प्रमाण कमी असते त्यामुळे हे एक किडनीसाठी फायदेशीर फळ मानले जाते. किडनी खराब झाल्यास त्वचेवर सर्वात आधी प्रभाव दिसतो. सफरचंदाच्या सेवनाने त्वचा मृदू राहण्यास मदत होऊ शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, गरज असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा)