Lemonade For Kidney Stones: युरिक ऍसिडची वाढती पातळी, जीवनशैलीतील घातक सवयी यामुळे किडनी स्टोन म्हणजेच मुतखड्याचा त्रास आता अगदी कॉमन झाला आहे. कोणत्याही वयोगातील व्यक्तीला हा त्रास जाणवू शकतो. जितका आजार सामान्य होतो तसेच त्याचे उपचारही वेगवेगळ्या पद्धतीने समोर येत असतात. अलीकडे आजरांचे निदान ते उपचार सगळ्यांसाठीच ऑनलाईन स्रोत उपलब्ध आहेत. किडनी स्टोन सुद्धा याला अपवाद नाही, अनेक सोशल मीडिया साईट्स व सर्च इंजिन प्रश्नांमध्ये किडनी स्टोनचे उपचार शोधले जातात. अशावेळी एक सल्ला हल्ली बराच व्हायरल होत आहे तो म्हणजे किडनी स्टोनवर लिंबू पाणी प्रभावशाली ठरते. लिंबाच्या सरबतामुळे मुतखडा विरघळून लघवीवाटे शरीरातून बाहेर पडतो असे अनेकजण सांगतात पण यात किती तथ्य आहे हे आपण आज डॉक्टरांकडून जाणून घेणार आहोत.
लिंबू सरबत तुमच्या किडनी स्टोनचा त्रास कमी करू शकते का?
डॉ दिनेश कुमार टीपी, सल्लागार, युरोलॉजी, एंड्रोलॉजी आणि किडनी ट्रान्सप्लांट सर्जन, मणिपाल हॉस्पिटल बंगळुरू यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, लिंबूवर्गीय फळांच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी जास्त असते, जे एक अँटिऑक्सिडेंट आहे, तर पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मुळे मुतखडे तयार होण्यास प्रतिबंध घालता येतो. शिवाय लिंबूवर्गीय पेय (लिंबाचे सरबत, संत्री- मोसंबी ज्यूस, इत्यादी) लघवीमध्ये सायट्रेटचे प्रमाण वाढवते. हे सायट्रेट शरीरातील ऑक्सलेटशी जोडले जाऊन मुतखडे तयार होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.
थोडक्यात काय तर यामुळे स्फटिकाची निर्मिती थांबते. परंतु सायट्रिक ऍसिडमुळे अगोदरच तयार झालेले मुतखडे विरघळून जातात हे सिद्ध करणारे कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. यासाठी वैद्यकीय उपचारच आवश्यक आहेत.
तसेच, प्रत्येक किडनी स्टोन वेगळा असतो. काही कॅल्शियम, स्ट्रुवाइट, युरिक ऍसिड आणि सिस्टिन यांनी तयार होतात. तर अप्पर युरिनरी ट्रॅक्ट बॅक्टेरिया इन्फेक्शन (यूटीआय) मुळे स्ट्रुव्हाइट स्टोन होतात, ज्यामुळे अमोनिया तयार होतो आणि लघवी कमी आम्लयुक्त बनते. हे सहज मोठे होतात. सिस्टिन एक अमीनो आम्ल आहे, ज्याचे प्रमाण वाढल्यास मूत्रात दगड होऊ शकतात.
दरम्यान, संशोधनात असे दिसून आले आहे की तुम्ही कोणत्या द्रवपदार्थाचे सेवन करता यापेक्षा तुम्ही किती प्रमाणात सेवन करता हे पाहणे अधिक महत्त्वाचे आहे. किडनीमध्ये क्षार जमा होऊन तयार होणारे मुतखडे शरीरातून फ्लश करण्यासाठी तुम्हाला दिवसाला ठराविक प्रमाणात पाण्याचे सेवन आवश्यक आहे. त्यात लिंबूवर्गीय किंवा अन्य पेय समाविष्ट करणे हा एक पर्याय असू शकतो पण द्रव सेवन करणे अत्यंत आवश्यक आहे. वय व वजनानुरूप पाणी प्यावे पण साधारण तीन लिटर पाणी हे शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी आवश्यक आहे. जर तुम्ही सतत वातानुकूलित वातावरणात असाल तर दोन ते अडीच लिटर पाणी पुरेसे ठरते.
तुमची किडनी सुदृढ आहे की नाही हे कसे ओळखाल? (How To Know Kidney Is Healthy)
फक्त लघवीचा रंग पहा. गडद रंगाची लघवी असल्यास तुम्ही पाणी कमी पित आहात किंवा वॉशरूमला कमी वेळा जात आहात असा त्याचा अर्थ होतो. या दोन्ही सवयी किडनीसाठी घातक ठरू शकतात त्यामुळे तुम्ही या दोन्ही गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे, तुमच्या मूत्रातील पीएच घटक तपासा. अल्कधर्मी pH कॅल्शियम- आणि फॉस्फेट-युक्त दगडांच्या क्रिस्टलायझेशनचे प्रमाण वाढवते. व अम्लीय मूत्र pH मुळे यूरिक ऍसिड किंवा सिस्टिन दगड होतात.
हे ही वाचा<< ३० दिवस बटाटे खाणं बंद केलं तर वजन खरंच कमी होईल का? शरीरासाठीचे तोटे वाचा, ‘हे’ पर्यायही पाहा
मुतखडा होण्याची अन्य कारणे (Kidney Stones Reasons)
डिहायड्रेशन व्यतिरिक्त, इतर घटकांमुळे तुम्हाला किडनी स्टोन होण्याची शक्यता असते. यामध्ये मधुमेह, लठ्ठपणा, कौटुंबिक इतिहास, प्रथिने, सोडियम (मीठ) आणि साखरेचे प्रमाण जास्त असलेला आहार यांचा समावेश आहे. अतिरीक्त मीठ आपल्या मूत्रपिंडांना फिल्टर करण्यासाठी आवश्यक असलेल्या कॅल्शियमचे प्रमाण वाढवते आणि मुतखडे होण्याचा धोका वाढतो. चॉकलेट, सोडा-आधारित पेय, फ्लॉवर आणि पालक यांसारखे ऑक्सलेट समृद्ध पदार्थ कमी प्रमाणात आहारात समाविष्ट करा. 3 मिमी आणि 4 मिमीचे छोटे दगड औषधोपचाराने मूत्रमार्गातून बाहेर जाऊ शकतात. केवळ मोठ्या दगडांसाठी सर्जरी आवश्यक असतात.