World Kidney Day, 5 Superfoods For Kidney Health: दरवर्षी मार्चच्या दुसऱ्या गुरुवारी, ‘जागतिक किडनी दिन’ साजरा केला जातो. मागील काही काळात जीवनशैलीतील बदलांमुळे किडनी फेल होण्याचे प्रमाण वाढत असताना किडनीच्या आरोग्यासाठी जनजागृती करणे महत्त्वाचे ठरत आहे. आपल्या शरीराचा फिल्टर अशी ओळख असलेला मूत्रपिंड हा अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. आपल्या रक्तातील टाकाऊ पदार्थ शांतपणे फिल्टर करणे, इलेक्ट्रोलाइट्स संतुलित करणे आणि संपूर्ण आरोग्यासाठी आवश्यक हार्मोन्स तयार करणे ही जबाबदारी या अवयवावर असते. आज घडीला जगभरात लाखो लोक क्रॉनिक किडनी डिसीजने (CKD) ग्रस्त आहेत. २०२२ मध्ये जर्नल किडनी इंटरनॅशनल सप्लीमेंट्समध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, जगभरातील लोकसंख्येच्या सुमारे १० टक्के लोकांना (८०० दशलक्ष) मूत्रपिंडाचा आजार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किडनी सुदृढ राहावी यासाठी कोणतीही जादूची गोळी नसली तरी, तुमच्या आहारात काही सुपरफूड्सचा समावेश केल्याने तुमच्या किडनीची सक्षमता वाढू शकते. डॉ प्रकाश चंद्र शेट्टी, डॉ एल एच हिरानंदानी हॉस्पिटल, पवई, मुंबई येथील यूरोलॉजिस्ट आणि डॉ मंजू अग्रवाल, मुख्य- वैद्यकीय सेवा आणि नेफ्रोलॉजी, आर्टेमिस हॉस्पिटल गुरुग्राम येथील नेफ्रोलॉजिस्ट, यांनी किडनीचे आरोग्य वाढवण्यासाठी इंडियन एक्सस्प्रेसच्या लेखात ५ सुपरफूड्सची यादी नमूद केली आहे.

ब्लूबेरी

ब्लूबेरीमध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, तसेच या लहानश्या फळातील अँथोसायनिन्ससारखे अँटिऑक्सिडंट जळजळ कमी करतात आणि ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करतात. या बेरींमध्ये सोडियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस देखील कमी असतात, ज्यामुळे ते मूत्रपिंडाच्या समस्या असलेल्या व्यक्तींसाठी पूरक बनतात. तुमच्या आहारात ब्लूबेरीचा समावेश केल्यास रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि किडनी स्टोनची वाढ रोखण्यास मदत होऊ शकते.

रावस मासा

ओमेगा -3 फॅटी ऍसिडचा मुबलक साठा असलेला रावस मासा हा आपल्या दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यासाठी फायद्याचा ठरतो. रावस माशाच्या सेवनाने कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते, त्यामुळे परिणामी किडनीच्या आजाराचा धोका सुद्धा कमी होतो. याव्यतिरिक्त, रावस प्रथिनांचा उत्तम स्त्रोत आहे, जो आरोग्य आणि स्नायूंच्या कार्यासाठी आवश्यक अमीनो ऍसिड प्रदान करण्याचे सुद्धा काम करतो.

केल

पालकासारखेच दिसणारे केल हे साधारणतः सॅलेडमध्ये किंवा सँडविच, सब रोल मध्ये वापरले जाते. यामध्ये जीवनसत्व, खनिजे व अँटिऑक्सिडंट्सचा साठा असतो. रक्त गोठणे, किंवा ठिसूळ हाडे यांवर केल परिणामकारी उपाय ठरू शकतो. यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण कमी असल्याने मूत्रपिंडाचा आजार असलेल्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे. तुमच्या दैनंदिन आहारात केलचा समावेश केल्याने किडनीच्या कार्यात मदत होऊ शकते.

लसूण

लसूणमध्ये ॲलिसिन असते, ज्यामुळे बॅक्टेरियाच्या वाढीस आळा बसून जळजळीचे प्रमाण कमी होऊ शकते. लसणाचे नियमित सेवन केल्याने रक्तदाब कमी होतो. तसेच कोलेस्टेरॉल नियंत्रणात आल्याने हृदयविकारांपासून बचाव होतो आणि मूत्रपिंडांचे संरक्षण होते.

क्विनोआ

ग्लूटेन-मुक्त संपूर्ण धान्य असलेला क्विनोआ इतर आवश्यक पोषक तत्वांसह प्रथिने, फायबर, लोह आणि मॅग्नेशियमचा समृद्ध स्रोत आहे. क्विनोआमध्ये पोटॅशियम आणि फॉस्फरसचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे ते किडनीच्या समस्या असलेल्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरतात. क्विनोआमधील उच्च फायबर रक्तातील साखरेची पातळी स्थिर करण्यास मदत करते आणि पचनास प्रोत्साहन देते. इतर कार्ब्स ऐवजी क्विनोआला तुमचा प्राथमिक उर्जा स्त्रोत बनवल्यास किडनीच्या आरोग्याला मदत होऊ शकते.

हे ही वाचा<< दोन मोठ्या कलाकारांचं कावीळने निधन; डॉ. सुपे यांनी सांगितले, काविळ कशी ओळखावी? पाहा लक्षणे व उपचार

यासह डॉ. शेट्टी असेही सांगतात की, “तुमच्या मूत्रपिंडातून विषारी आणि टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्यासाठी पाणी आवश्यक आहे. तुमची जीवनशैली व हवामानानुसार दररोज किमान आठ ग्लास पाणी पिण्याचे लक्ष्य ठेवा. रिफाईंड साखर व सोडियमचे सेवन सुद्धा मर्यादित असावे. गरज भासल्यास आपण वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्यावा. “

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kidney will throw out toxins speedily with these 5 superfoods veg non veg food items to avoid kidney failure or stones health news svs
Show comments