Kissing Disease Symptoms: मागील दोन वर्षांपासून आपण आजारांची अनेक विचित्र नावे ऐकली आहेत. अगदी साधी सर्दी, ताप अशी लक्षणे सुद्धा व्हायरसच्या रूपात आपल्यासमोर आली आहेत. सध्या असाच एक विचित्र नावाचा आजार वेगाने पसरत असल्याचे समजतेय, हा आजार म्हणजे किसिंग डिसीज. हा संसर्गजन्य मोनोन्यूक्लिओसिस (सामान्यतः मोनो नावाने ओळखला जातो) आहे. या आजारामागे लाळेद्वारे पसरणारा एपस्टाईन-बॅर विषाणू हा मुख्य कारण आहे. मुख्यतः चुंबनामुळे हा संसर्ग होण्याची शक्यता असल्याने याचे नाव किसिंग डिसीज असे ठेवण्यात आले आहे. मोनो असलेल्या एखाद्या व्यक्तीसह ग्लास किंवा अन्नाची भांडी शेअर करूनही तुम्हाला विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. तथापि, मोनोन्यूक्लिओसिस सामान्य सर्दीसारखे संसर्गजन्य नाही.
किसिंग डिसीज हा काही गंभीर आजार नाही. पण लक्षणे दिसू लागताच योग्य वैद्यकीय उपचार न घेतल्यास संसर्गामुळे गुंतागुंत होऊ शकते. संक्रमित व्यक्ती अनेक आठवडे सामान्य क्रिया करण्यास सुद्धा त्रास अनुभवू शकते. संसर्गाची लक्षणे सौम्य ते गंभीर असू शकतात. सुरुवातीच्या दिवसांमध्ये गळ्याला प्रचंड सूज येऊन वेदना सुद्धा होऊ शकतात. यासह मोनोची म्हणजेच किसिंग डिसीजची लक्षणे काय आहेत पाहूया…
मायो क्लिनिकच्या मते, मोनोन्यूक्लिओसिसची लक्षणे खालीलप्रमाणे:
- थकवा
- घसा खवखवणे
- ताप
- मान आणि काखेत सुज
- सुजलेले टॉन्सिल्स
- डोकेदुखी
- त्वचेवर पुरळ
- मऊ, सुजलेली प्लीहा
हे ही वाचा<< दह्यात काकडी किंवा बुंदी मिसळल्याने शरीरात बनते विष? तज्ज्ञांनी सांगितली सेवनाची योग्य पद्धत
मायो क्लिनिकच्या मते, १३ ते २० वर्षांच्या लोकांना त्रासदायक लक्षणांसह मोनो होण्याची शक्यता असते. तथापि, कोणालाही मोनोची लागण होऊ शकते. तुम्हाला या आजाराची लक्षणे दिसल्यास किंवा आजार असल्यास शारीरिक संबंध ठेवणे टाळा. याशिवाय, कमीत कमी काही दिवस तुमचा ताप उतरेपर्यंत तुमचे अन्न, भांडी, ग्लास इतर कोणाशीही शेअर करू नका. व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी आपले हात नियमितपणे धुवा