तुम्ही अनेकदा काही लोकांना तक्रार करताना ऐकले असेल की, हाताची त्वचा निघतेय. उन्हाळा, पावसाळा कोणताही ऋतू असो अनेकांना त्वचेची ही समस्या जाणवते. यामुळे तुम्हाला त्वचेवर जळजळ, खाज सुटणे, लालसरपणा आणि वेदना जाणवू शकतात. ही समस्या साधारपणे २ ते ४ दिवसांपर्यंत टिकते. या समस्येला इंग्रजीत स्किन पीलिंग असे म्हणतात. यात हाताची खवलेयुक्त त्वचा निघू लागते. त्वचा निघण्यामागे अनेक कारणे असू शकतात. यामुळे आरोग्यासंबंधित नुकसान होऊ शकते ज्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. यामुळे त्वचा निघण्यामागची कारणे काय आहेत आणि त्यावर काय घरगुती उपाय आहेत जाणून घेऊ….
स्किन पीलिंग म्हणजे काय?
त्वचेच्या वरील थराला एपिडर्मिस असे म्हणतात. सामान्यत: त्वचा निघणे हे त्वचेला नुकसान होण्यापासून संरक्षण करण्याचा एक मार्ग आहे.
त्वचा निघण्यामागची कारणे
काही वेळा त्वचा निघण्याची समस्या वातावरणातील काही घटक, अॅलर्जी, संसर्ग किंवा इतर काही रोगांमुळे होऊ शकते.
१) सूर्याच्या अतिनील किरणांच्या संपर्कात आल्यानंतरही त्वचेला इजा होऊ शकते, यामुळे त्वचा निघते.
२) अनेक वेळा शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळेही त्वचा कोरडी होऊन निघू लागते.
३) काही वेळा ब्युटी प्रॉडक्ट्स किंवा होम क्लीन्सरमध्ये केमिकल्स मिसळलेले असते, ज्यामुळेही त्वचेचे नुकसान होऊ शकते.
४) काही स्किन केअर प्रॉडक्ट्सच्या अतिवापरामुळे त्वचेचे नुकसान होते आणि त्वचा एक्सफोलिएट होऊ लागते.
५) काही वेळा एक्जिमा, सोरायसिस आणि त्वचेच्या विविध आजारांमुळे हातावरील त्वचा निघू लागते.
त्वचा निघत असल्यास करा हे घरगुती उपाय
१) खोबरेल तेल
खोबरेल तेल नॅचरल मॉइश्चरायझर म्हणून काम करते ज्यामुळे त्वचा निघण्याची समस्या कमी होते. यासाठी थोडे खोबरेल तेल घेऊन त्वचा निघत असलेल्या भागावर मालिश करा. तेल काही वेळ त्वचेत मुरू द्या. यानंतर कोमट पाण्याने धुवा.
२) काकडी
काकडीमध्ये भरपूर पाणी आणि व्हिटॅमिन सी असते ज्यामुळे त्वचेच्या समस्या कमी होतात. यासाठी काकडीचे बारीक तुकडे करून ते १० ते १५ मिनिटे त्वचा निघत असलेल्या भागावर ठेवा. दिवसातून ३ ते ४ वेळा हा उपाय करा.
३) केळी
केळ्यामध्ये ए, बी आणि ई ही व्हिटॅमिन्स असतात जे त्वचा निरोगी ठेवण्याचे काम करतात. ह उपाय करण्यासाठी तुम्ही आधी एक पिकलेले केळं मॅश करा आणि त्वचा निघत असलेल्या भागावर लावा. यानंतर त्वचा कोमट पाण्याने धुवा.