तुमच्या कोपराचे हाड एखाद्या वस्तूवर आदळल्यानंतर त्या ठिकाणी मुंग्या येणे, वेदना जाणवणे असा विचित्र अनुभव तुम्हाला कधी आला आहे का? तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की असे का होते. हाताच्या कोपराला झालेल्या दुखापतीनं इतकं का दुखतं? तुम्हाला इतकी वेदना किंवा मुंग्या का येतात? यामागे नेमके काय कारण आहे. तुमच्या मनातील याच प्रश्नाचे उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Know Your Body या सीरिजचा भाग म्हणून इंडियन एक्सप्रेसने जेव्हा हाताच्या कोपऱ्यावर दुखापत होते, तेव्हा हाताला, करंगळी किंवा अनामिकेपर्यंत अचानक जाणवणारी तीव्र वेदना, मुंग्या येण्याच्या संवेदनेबद्दल अधिक जाणून घेतले आहे. कोपराचे हाड म्हणजे Funny Bone असे इंग्रजीत म्हटले जाते. पण, तुम्हाला जे कोपराचे हाड आहे असे वाटते ते हाड नसून कोपराच्या पृष्ठभागाजवळून जाणारा अल्नार नर्व्ह नावाचा मज्जातंतू (nerve) आहे.

हाताच्या कोपराला दुखापत झाल्यानंतर इतक्या वेदना का होतात?

”काही लोक त्याचे वर्णन करताना सांगतात, पिन आणि सुया टोचल्यासारखे वाटते किंवा थोडा करंट बसल्यासारखी संवेदना जाणवते. ही अस्वस्थता थोड्या काळासाठी तीव्र असू शकते” असे गाझियाबादचे निसर्गोपचारतज्ज्ञ एस. सी. शर्मा यांनी सांगितले.

“या हाडांच्या भागाला मध्यवर्ती एपिकॉन्डाइल ( हाडाचा एक भाग) आणि ओलेक्रॅनॉन प्रक्रिया, उलना हाडांचा (ulna bone) एक भाग म्हणून ओळखले जाते. अल्नार नर्व्ह विद्युत आवेग वाहून नेत असते आणि म्हणून जर चुकून एखाद्याच्या या मज्जातंतूवर आघात झाला, तर विजेचा झटका बसल्यासारखी संवेदना जाणवते, जी काही सेकंदासाठी टिकते” असे हैदराबादच्या अपोलो हॉस्पिटलच्या न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांनी स्पष्ट केले.

हेही वाच –पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये अधिक मंद गतीने फॅटस् का बर्न होतात? तज्ज्ञांनी सांगितले कारण…

हाताला येणाऱ्या मुंग्या किंवा वेदना या तात्पुरत्या असतात

शर्मा यांच्या मते, ”जेव्हा अल्नार नर्व्हला धक्का बसतो तेव्हा ती संकुचित होते, ज्यामुळे मुंग्या येणे आणि प्रभावित भागात संवेदना तात्पुरती कमी होते.”

“बहुतेक प्रकरणांमध्ये संवेदना त्वरीत नाहीशी होते, सहसा काही सेकंद ते एका मिनिटात. पण, काही व्यक्तींना नंतर थोड्या काळासाठी कोपराच्या भागात सतत अस्वस्थता किंवा सौम्य वेदना जाणवू शकते. हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की, कोपराच्या हाडावर आघात होणे दीर्घकाळासाठी हानिकारक नाही आणि कायमचे नुकसान होत नाही”, असे शर्मा यांनी स्पष्ट केले.

डॉक्टर कुमार म्हणाले की, ”काळजी करण्याची गरज नाही, कारण मज्जातंतूवर थोडासा अपघाती आघात झाल्यास कोणतेही कायमचे नुकसान होत नाही. मज्जातंतूची संवेदना तात्पुरती असते आणि डॉक्टरांच्या मदतीशिवाय ती कमी व्हायला हवी.”

हेही वाचा- गुडघ्यांना दुखापत न होऊ देता एखादी व्यक्ती आठवड्यातून किती अंतर धावू शकते? जाणून घ्या काय सांगतात डॉक्टर….

गरज असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

” संवेदना कायम राहिल्यास किंवा हातामध्ये अशक्तपणा किंवा सतत वेदना यासारखी इतर लक्षणे जाणवल्यास डॉक्टरांना भेटण्याचा सल्ला दिला जातो”, असे डॉ, शर्मा यांनी स्पष्ट केले.

तुमच्या कोपराला दुखापत होणे टाळण्यासाठी, तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव ठेवा आणि तुमचा कोपर कडक पृष्ठभागावर आदळणार नाही यासाठी काळजी घ्या.

“या व्यतिरिक्त योग्य आसन आणि अर्गोनॉमिक पोझिशनिंग(ergonomic positioning ) अल्नर नर्व्हवर अघाताचा परिणाम होण्याचा धोका कमी करू शकते. तुम्हाला कोपराला वारंवार दुखापत होत असेल किंवा या संवेदनेचे गंभीर अनुभव येत असल्यास किंवा तुमच्या हाताच्या मज्जातंतूच्या संवेदनांबद्दल तुम्हाला काही चिंता वाटत असल्यास, डॉक्टरांचा सल्ला घेण्यास अजिबात संकोच करू नका,” असे शर्मा म्हणाले.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know your body why does hitting the funny bone in the elbow hurt so much snk