आपल्या भारतीय संस्कृतीत साजरे केले जाणारे विविध सण हे निसर्गाचे रक्षण करणारे, कृषी संस्कृतीशी नाते सांगणारे असतात. शिवाय या सणांच्या दिवशी घेतल्या जाणाऱ्या विविध आहारालादेखील विशेष महत्व असतं. एखाद्या सणाला उपवास, तर एखाद्या सणाला गोड पदार्थांची मेजवानी असते. हे सण त्या वेळच्या वातावरणातील बदलांशी संबंधित असतात. नुकताच संपूर्ण देशभरात दसरा मोठ्या उत्साहात साजरा झाला. या शारदीय नवरात्रोत्सवात अनेकांनी नऊ दिवसांचे उपवासही केले होते. दसरा संपताच आता २८ ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरवर्षी तिथीनुसार आश्विन महिन्यात शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या रात्री अवकाशातून अमृताचा वर्षाव होतो अशी श्रद्धा आहे. या दिवशी अनेक घरांमध्ये काही विधीही केले जातात. परंतु, कोजागिरी पौर्णिमा म्हटलं की, सर्वांच्या डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे मसाले दुधाने भरलेला ग्लास. हो, कारण या दिवशी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण मसाले दुधाचा आस्वाद घेण्यासाठी उत्सुक असतात. अनेक जण या दिवशी भरपूर दूध पितात. पण, या दिवशी प्यायल्या जाणाऱ्या दुधाचा शरीरावर नेमका काय परिणाम होतो? या दुधात वापरल्या जाणाऱ्या मसाल्याचा शरीराला फायदा होतो की नुकसान, याबाबतची सविस्तर माहिती क्रीडा पोषण आणि आहारतज्ज्ञ पल्लवी सावंत-पटवर्धन यांनी सांगितली आहे, ती जाणून घेऊ.

हेही वाचा- सणासुदीच्या काळात वाढलेले वजन काही दिवसांत होईल कमी; फक्त डॉक्टरांनी सांगितलेल्या ‘या’ तीन गोष्टी करा फॉलो 

आहारतज्ज्ञ पल्लवी पटवर्धन यांनी सांगितलं, कोजागिरी पौर्णिमेला दूध पिणं योग्य आहे, कारण दुधाचे शरीराला अनेक फायदे होतात. खरं तर आपल्या ज्या काही भारतीय परंपरा आहेत, त्यामागे काहीतरी अर्थ दडलेला असतो. आता थंडी सुरू होत आहे, त्यामुळे आता शरीराची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी ऊर्जा निर्माण करणं गरजेचं आहे. त्यामुळे थंडीच्या दिवसात दूध पिणं योग्य आहे. तर आपल्याकडे चंद्र पद्धती म्हणून एक पद्धत आहे, ज्यामध्ये चंद्राच्या प्रकाशात पाणी किंवा दूध अशा गोष्टी बराच वेळ ठेवून त्यांचे सेवन केले जाते. शरद पौर्णिमेचा दिवस हा ‘फूल मून डे’ ‘म्हणजेच पौर्णिमेचा दिवस असतो. त्यामुळे या दिवशी चंद्राच्या प्रकाशात ठेवलेलं दूध हे चंद्राच्या तत्वाने बनलेलं असतं. दूध हे पूर्णान्न आहे. त्यामुळे दुधाचे सेवन करणं योग्यचं आहे. परंतु, सध्याच्या काळात भेसळयुक्त दूध मोठ्या प्रमाणात बाजारात विकलं जातं. त्यामुळे आपण जे दूध पिणार आहोत ते शुद्ध आहे का नाही? याची खात्री करणं गरजेचं आहे, असंही त्या म्हणाल्या.

हेही वाचा- तुम्हाला वडापाव खायला आवडतो? वडापाव खाल्यामुळे आरोग्यावर कोणते दुष्परिणाम होतात? जाणून घ्या, आहारतज्ज्ञ काय सांगतात… 

त्या पुढे म्हणाल्या, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकानेच दूध प्यावंच असं काही नाही, ज्यांना दूध पचतं त्यांनीच प्यायला पाहिजे. कारण दुधाची एलर्जी असलेल्यांना दूध पिणं धोकादायक ठरू शकतं. दुधातून आपल्याला योग्य ती प्रथिनं मिळतात. दुधातील प्रोटीनमुळे तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारते. शिवाय दुधात सुकामेवा वापरल्यामुळे ते जास्त परिणामकारक ठरतं. त्यामुळे तुम्ही कोजागिरीच्या रात्री केसर, काजू आणि बदाम असा सुका मेवा वापरून मसाला तयार करू शकता. यामुळे हेल्थ ड्रिंक तयार होतं, तर सुकामेवामध्ये चांगल्या फॅट्स असतात. मात्र, यावेळी भरपूर दूध नाही प्यायचं तर एक ग्लास दूध २०० मिली शरीरासाठी पुरेसं ठरू शकतं. कारण आहारशास्त्रानुसार कोणत्याही पदार्थाचा अतिरेक शरीरासाठी घातक असतो, त्यामुळे जास्त प्रमाणात दूध पिण्याचा मोह टाळणं फायद्याचं ठरू शकतं, असंही त्यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kojagiri purnima 2023 is drinking masala milk beneficial for the body find out what the experts say jap