Krystle DSouza : क्रिस्टल डिसूझा ही टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. टेलिव्हिजन विश्वात काम करताना येणाऱ्या आव्हानांविषयी क्रिस्टलने एका मुलाखतीत सांगितले. त्यावेळी तिने ६० तास नॉन-स्टॉप शूट केल्याचा एक अनुभव सांगितला.
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या एका मुलाखतीत डिसूझा सांगते की, थकव्यामुळे ती अनेकदा सेटवर बेशुद्ध पडली आहे. टेलिव्हिजनमधील सुरुवातीच्या दिवसांविषयी ती म्हणाली, “मी २५०० रुपयांपासून कामाला सुरुवात केली आहे. तेव्हा फक्त १२ तास शूट करू शकता, असा कोणताही नियम नव्हता. मी ६० तास नॉन-स्टॉप शूट केले आहे. मी अनेकवेळा सेटवर बेशुद्ध पडली आहे. टीमला रुग्णवाहिका बोलवावी लागली आहे. मी IV ड्रॉप्स आणि औषधे घ्यायची आणि शूटिंगला परत जायची. हॉस्पिटलला जायलाही वेळ नव्हता. याचा माझ्या आरोग्यावर वाईट परिणाम होत होता. मी सहन करू शकत नव्हते, पण मला काम प्रामाणिकपणे करणे गरजेचे होते.”
जेव्हा शरीर विश्रांतीशिवाय दीर्घकाळ तणाव सहन करते, तेव्हा नेमकं काय घडते याविषयी द इंडियन एक्स्प्रेसनी बंगळुरू येथील कोशीस हॉस्पिटलचे जनरल फिजिशियन एमबीबीएस, एमडी डॉ. पलेती शिव कार्तिक रेड्डी यांच्या हवाल्याने सविस्तर माहिती सांगितली आहे.
जेव्हा एखादी व्यक्ती पुरेशी विश्रांती न घेता ६० तास काम करते, तेव्हा लगेच शरीरावर गंभीर परिणाम दिसून येतात.
डॉ. रेड्डी सांगतात, “६० तास विश्रांती न घेता नॉन स्टॉप काम केल्याने शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो. यामुळे थकवा, स्नायूंचे दुखणे आणि डिहायड्रेशनसारखी लक्षणे दिसून येतात. विश्रांतीशिवाय तुम्ही तंदुरुस्त होऊ शकत नाही, म्हणूनच क्रिस्टल डिसूझा यांनी सांगितल्याप्रमाणे बेशुद्ध पडणे हे एक सामान्य लक्षण दिसून येते.”
ते पुढे सांगतात, “दीर्घकाळ जागे राहिल्याने शरीरातील कोर्टिसोलची पातळी (स्ट्रेस हार्मोन) वाढते, ज्यामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयाची गतीसुद्धा वाढते, यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित आजारांचा धोका वाढतो.”
डॉ. रेड्डी यामुळे रोगप्रतिकारक शक्तीवर होणारा परिणामदेखील सांगतात, “नॉन स्टॉप ६० तास काम केल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते, ज्यामुळे व्यक्तीला कोणताही संसर्ग आणि आजार होण्याची शक्यता वाढते. एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, थोडी विश्रांती घेऊन काम जास्त केल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते, ज्यामुळे आपल्याला सर्दी, फ्लूसारख्या आजाराचा धोका वाढतो.”
झोपेच्या अभावामुळे मानसिक क्रियेवर आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेवर कसा परिणाम होतो?
डॉ. रेड्डी यांच्या मते, “झोपेची कमतरता मानसिक क्रिया कमी करते. झोपेशिवाय २४ तासांनंतर तुमच्या मेंदूची कार्य करण्याची, समस्या सोडवण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता कमी होते. एका अभ्यासानुसार, ४८ ते ६० तास नॉन स्टॉप काम केल्याने मानसिक क्रिया ही रक्तात ०.१ टक्के अल्कोहोल पातळी असलेल्या व्यक्तीच्या समतूल्य असू शकते.”
पुढे ते सांगतात, “खूप जास्त तणावामुळे निर्णय क्षमता कमी होणे, स्मरणशक्ती कमी होणे आणि लक्ष केंद्रित करण्यास अडथळा येऊ शकतो. झोपेशिवाय दीर्घकाळ काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये चुका होण्याची शक्यतासुद्धा जास्त असते, जे काही लोकांसाठी धोकादायक ठरू शकते.”
सतत ६० तास नॉन स्टॉप काम केल्याने कोणत्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतात?
डॉ. रेड्डी सांगतात, “सतत ६० तास नॉन स्टॉप काम केल्याने चयापचय क्रिया बिघडते. झोपेची कमतरता आणि सतत तणावामुळे इन्सुलिनची पातळी वाढते, ज्यामुळे कालांतराने तुम्हाला टाइप २ मधुमेह होण्याचा धोका वाढू शकतो. चयापचय क्रिया बिघडल्याने आणि आहाराच्या खराब सवयींमुळे जास्त काळ काम करणे वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकते.
डॉ. रेड्डी सांगतात, “सतत ६० तास काम केल्याने मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. झोपेची कमतरता, तणाव आणि नैराश्य हे एकमेकांशी जुळलेले आहे. शारीरिक थकवा, तणावामुळे तुम्ही भावनिकदृष्ट्या खचू शकता. अनेकदा एकटेपणा जाणवतो, ज्यामुळे तुमच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावर याचा दीर्घकालीन परिणाम दिसू शकतो.”
डॉ. रेड्डी यांनी खालील टिप्स सांगितल्या आहेत.
झोपेला प्राधान्य द्या : भरपूर काम असतानासुद्धा थोड्या कालावधीसाठी झोप घ्या किंवा झोपेचे चक्र हे सामान्यत: ९० मिनिटांचे असते, एवढ्या कालावधीत तुम्ही पुरेसा आराम करू शकता.
हायड्रेशन आणि पोषक आहार : हायड्रेटेड राहणे हे थकवा आणि डोकेदुखी टाळण्यास मदत करते. स्नॅक्स किंवा जंक फूडवर अवलंबून न राहता पौष्टिक-जेवणावर लक्ष केंद्रित करा. कर्बोदके, प्रथिने आणि चांगल्या फॅटयुक्त पदार्थांमधून मिळणारी साखर दीर्घकाळासाठी ऊर्जा देते.
वेळेचे नियोजन आणि विश्रांती : पोमोडोरो पद्धतीचा वापर करणे – थोडे काम करा, २५ मिनिटे लक्ष केंद्रित करून काम करा, त्यानंतर पाच मिनिटांचा ब्रेक घ्या. यामुळे मानसिक आणि शारीरिक थकवा टाळता येतो. नियमित विश्रांती मेंदूला ताजेतवाने आणि पुन्हा लक्ष केंद्रित करण्यास मदत करते.
विश्रांती आणि दीर्घ श्वास घ्या : विश्रांतीदरम्यान दीर्घ श्वास घ्या. यामुळे तणाव कमी होण्यास आणि भावनिकदृष्ट्या निरोगी राहण्यास मदत होते. पुन्हा लक्ष केंद्रित करण्यासाठी हे फायदेशीर ठरू शकते.
मर्यादा राखा : सतत जास्त वेळ काम करणे टाळण्यासाठी कामाची मर्यादा राखा. कामाचा दबाव येऊ नये, यासाठी वेळेचे योग्य नियोजन करा.