श्वेताचा काळजीच्या स्वरात फोन आला, “संपूर्ण डिसेंबर महिना खूप गडबड आहे. मला वाटत नाही मला डाएट जमेल”.
“घरी नाहीयेस का ?” – इति मी.
“हो बाहेर चाललोय. मला प्रवासात खाण्यासाठी काही करता येऊ शकेल का ?” म्हणजे मी शक्य तसा चांगलाच खाण्याचा प्रयत्न करणार आहे”.
गेले वर्षभर खाण्याची उत्तम शिस्त पाळत श्वेताने स्वतःच्या आहारावर आणि तब्येतीवर काम केलं होतं आणि डिसेंबर महिन्यातील प्रवासाचा तिला या सगळ्यावर ताण होऊ द्यायचा नव्हता .
“डिसेंबरमध्ये जरा डायटला सुट्टी बरं का ते बरं पडेल किंवा सध्या वेळच नाही मिळत काय करणार आणि डिसेंबर आणि जानेवारीमध्ये विचारायला नको” मानसी माझ्याकडे आली आणि काहीशा करुण चेहऱ्याने म्हणाली, “मला काही नीट खायला जमेल असं वाटत नाहीये. हे बघ पल्लवी डिसेंबरचा महिना मी नेहमीच सोडूनच देते. जानेवारी महिन्यात सगळ्या गोष्टी एकत्र आल्या आहेत. मला खरंच सुचत नाहीये त्यामुळे डायट कदाचित तसेच राहील.”
“म्हणजे तू दरवर्षी असं करतेस ?” मी आश्चर्याने विचारलं त्यावर मानसीने होकारार्थी मान डोलावली.
वर्ष सरताना ओसरलेला उत्साह आणि त्यात नेटाने आरोग्य राखण्याचा प्रयत्न करणारे अशी दोन वेगवेगळ्या प्रकारची मानसिकता असणारी माणसं तुमच्या आजूबाजूलादेखील दिसत असतीलच. वर्ष सरता सरता जर प्रवास होणार असेल किंवा आहारनियमांचं गणित अवघड होत असेल तर आजचा लेख खास तुमच्यासाठी!
आहार नियमन असे असायला हवं की तुमचं खाणंपिणं तुम्ही कुठेही असलात तरी त्यात सामावायला हवं. जर ट्रेन, गाडी, बस प्रवास असेल तरीही कोरड्या खाऊचा डबा तुम्ही बरोबर नेऊ शकता. चणे, दाणे, तेलबिया यासारखे पदार्थ अगदी ५ तास ते १५ तासांच्या प्रवासातदेखील व्यवस्थित सोबत करतात.
हेही वाचा – आरोग्य वार्ता : निवांत बसण्यापेक्षा शारीरिक हालचाल हृदयासाठी चांगली
कोरडा खाऊ नेताना त्यात जास्तीचे मीठ किंवा कोणतेही फ्लेवरिंग नाहीये याचे भान जरूर राखावे. शक्यतो घरूनच पाणी सोबत घ्यावे. उघड्यावरील पाणी पिणे टाळावे. आणि कितीही आग्रही वाटलं तरी रस्त्यावर पाणीपुरी किंवा तत्सम पदार्थ खाणे टाळावे. ५०% हून जास्त प्रवाशांमध्ये पोट बिघडण्याचे मुख्य कारण प्रवासात उघड्यावरचे तळलेले पदार्थ आणि उघड्यावरचे पाणी हेच असते. ज्यांना गाडीचा त्रास होतो त्यांनी लिंबू किंवा संत्र्याची गोळी सोबत ठेवावी. किंबहुन ट्रेन किंवा बसच्या प्रवासात सुंठ गोळी सर्वोत्तम उपाय आहे. भूकेवर ताबा ठेवणे आणि पोटाचे आरोग्य राखणे या दोन्ही बाबी सुंठ गोळीमुळे सुलभ होऊन जातात.
विमान प्रवास करणाऱ्यांनी शक्यतो विमानात घाईघाईत खाणे टाळावे. विमान प्रवास करताना शक्यतो चहा किंवा कॉफी पिणे कटाक्षाने टाळावे. खूप जास्त अंतर असल्यास तळलेले दाणे किंवा अति मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. विमानात विविध प्रकारचे अन्न पदार्थ उपलब्ध असतात. शक्यतो पचायला सहज असे पदार्थ विमान प्रवासात खाऊ शकता. एखादे फळ किंवा साठवणीची फळे खाणे उत्तम.
प्रवासाच्या आहाराबाबत खाकरा, कुरमुरे, मखाने, भाजणीचे अप्पे हे पदार्थ अतिशय उपयुक्त असतात. तुम्ही ज्या ठिकाणी प्रवास करत आहात शक्यतो तिथंच खाणं खाल्लं जाईल हे जरूर पाहा. जितकं तुम्ही एखाद्या ठिकाणी उलब्ध असणारा आहार कराल तितकं तुम्हाला त्या आहारातून उत्तम पोषणमूल्ये मिळू शकतात. आपल्या राज्यात काही ठिकाणी अत्यंत तिखट किंवा मसालेदार खाद्यपदार्थ नेहमीच्या आहारात समाविष्ट केले जातात अशा ठिकाणी प्रवास करताना सोबत ताक किंवा लिंबू किंवा लिंबूपाणी, सोलकढी यासारखे अन्न पदार्थ जरूर खावेत. शक्यतो अति उष्णता असणाऱ्या ठिकाणी खाद्यपदार्थ कमी प्रमाणात खाल्लेलं उत्तम.
जर तुम्हाला इतर ठिकाणचे पाणी प्यायचं असेल तर ते स्वच्छ आहे का किंवा किमान उकळलेलं आहे का याची तरी काळजी घ्या. शक्यतो कच्चे पदार्थ खाणं टाळा. ज्यावेळी तुम्ही एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात प्रवास करत असतात त्या वेळेला तिकडचा तापमानाचा, हवामानाचा सगळ्यांचा परिणाम तिकडच्या अन्नपदार्थांवरदेखील होत असतो. तुमच्या खाण्यात येणारे पदार्थ अचानक जर नवीन आणि अतिरेकी चव असणारे असतील तर तुमच्या पचनसंस्थेवर ताण पडू शकतो आणि त्यासाठी पाणी हे सदासर्वकाळ मदत करणारे द्रव्य आहे हे लक्षात असू द्या.
रेस्टॉरंटमध्ये खात असाल तर शक्यतो सॅलड खाणं टाळा. अनेकदा आपण प्रवासाला गेल्यानंतर इथे वेगवेगळा चहा टेस्ट करतो किंवा तिकडच्या वेगवेगळ्या कॉफीची चव घेण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्या गोष्टी करताना जेवणावर चहा किंवा कॉफी प्यायली जाणार नाही याची काळजी आवर्जून घ्या. जर तुम्हाला आधीच पचनाचा त्रास असेल तर थोडीशी बडीशेप किंवा जिरेपूड तुमच्या सोबत ठेवून द्या. रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यावर त्याचे पाणी आवर्जून प्या.
वर्ष सरताना प्रवास करताना जुन्याचे नवे होताना नव्या पदार्थांचा आस्वाद जरूर घ्या आणि आहारनियमन यशस्वीरित्या पार पाडा.