Teeth Whitening Hacks: सुंदर, पांढऱ्या शुभ्र दातांसाठी सध्या सोशल मीडियावर लिंबाचा एक उपाय तुफान व्हायरल होत आहे. सुंदर हास्यासाठी लिंबाच्या रसात बेकिंग सोडा मिसळून दातांना लावावा असा घरगुती उपाय सांगणाऱ्या या पोस्ट अनेकांच्या भुवया उंचावत आहेत. पण खरोखरच यामध्ये काही तथ्य आहे का? असे केल्याने तुमच्या दातांवर नेमका कसा परिणाम होऊ शकतो हे आज आपण जाणून घेणार आहोत. डॉ अदोष लाल, दंत शल्यचिकित्सक, पीरियडॉन्टिस्ट आणि इम्प्लांटोलॉजिस्ट, इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्स, दिल्ली यांनी इंडियन एक्सस्प्रेससाठी लिहिलेल्या एका लेखात या घरगुती जुगाडाची तपशीलवार माहिती दिली आहे. हा ऑनलाईन ट्रेंड आपणही पाहिला असेल आणि असे काही प्रत्यक्षात करून पाहण्याचा तुमचा प्रयत्न असेल तर तत्पूर्वी ही माहिती एकदा आवर्जून वाचा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लिंबाच्या रसाचा दातावर परिणाम

लिंबाचा रस हा अत्यंत आम्लयुक्त असतो, त्याची pH पातळी जवळपास २ च्या जवळ असते. ही आम्लता तुमच्या दातांचा संरक्षणात्मक मुलामा नष्ट करू शकते, दातांची अंतर्गत रचना ही नाजूक असते पण हा बाह्य मुलामा दातांचे संरक्षण करत असतो जर आम्ल युक्त लिंबाच्या रसामुळे हा मुलामा निघून गेला तर दातांची संवेदनशीलता वाढून पुढे अनेक त्रास संभवतात. जसे की दातांना कीड लागणे. त्यामुळे सोप्या भाषेत सांगायचे तर दातांच्या आरोग्याचे रक्षण करणारा हा मुलामा अत्यंत आवश्यक अशी ढाल आहे आणि ती एकदा गेली की कायमचीच नाहीशी होते. यामुळे तुमच्या दातांची डेन्टिन (दातांखालील टिश्यूचा थर) दिसू लागते जी मुळातच पिवळ्या रंगाचा असल्याने दात पूर्णच पिवळट दिसू लागतात.

बेकिंग सोडा दातासाठी योग्य आहे का?

तर दुसरीकडे बेकिंग सोडा (सोडियम बायकार्बोनेट) हा दातांच्या पृष्ठभागावरील डाग काढून टाकण्यास मदत करतो हे खरं आहे, परंतु जास्त प्रमाणात किंवा लिंबाच्या रसासारख्या आम्लयुक्त पदार्थांमध्ये मिसळून वापरल्याने हे द्रावण अधिकच उग्र होते. ज्यामुळे दात कायमचे खराब होतात. तसेच कीड लागणे, पोकळी तयार होणे व इतर दातांच्या समस्या वाढतात.

हिरड्यांचे त्रास

लिंबाच्या रसाचे अम्लीय स्वरूप तुमच्या हिरड्यांना त्रास देऊ शकते आणि खराब करू शकते. वारंवार वापर केल्याने जळजळ वाढून अगदी हिरड्यांची झीज होऊ शकते, ज्यावर उपचार न केल्यास शेवटी दात पडू शकतात. संवेदनशीलता वाढल्याने गरम, थंड, गोड आणि आम्लयुक्त पदार्थ आणि पेये यांचे सेवन करताना सुद्धा दात व हिरड्यांना वेदना होतात.

हे ही वाचा<< योगर्ट खाल्ल्याने डायबिटीसचा धोका होतो कमी? दह्यामध्ये काय असतो फरक? अमेरिकन FDA चा महत्त्वाचा निर्णय

दातांच्या शुभ्रतेसाठी योग्य उपाय काय?

कदाचित, लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा मिश्रण सुरुवातीला तुमचे दात पांढरे करू शकतात, पण वारंवार वापर केल्याने दात असमान पांढरे होणे, ठिसूळ होणे किंवा दातांवर पांढरे डाग दिसणे याचे प्रमाण वाढू लागते. त्यामुळे अशा जुगाडू हॅकने दातांची शुभ्रता वाढवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून ऐकावा. आपल्याला अगदीच हवे असल्यास अलीकडे अनेक मान्यताप्राप्त उत्पादने व तंत्रे वापरून दातांची स्वच्छता करण्याची सोय निर्माण झाली आहे, त्यामार्फत आपण हवे तसे पांढरे शुभ्र दात मिळवू शकतात. या सर्व प्रक्रिया या दुसऱ्या टप्प्यातील उत्तरे आहेत. प्राथमिक टप्प्यात आपल्याला दात सॉफ्ट ब्रशने नियमित घासणे, फ्लॉस करणे आणि आहारात सुद्धा आम्लयुक्त पदार्थांचे प्रमाण कमी करणे याची सर्वाधिक आवश्यकता आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lemon baking soda hack to change yellow stain teeth white hacks explained by doctor how lemon affect teeth gums health marathi svs