डॉ. जाह्नवी केदारे
मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर
किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर
बहिणाबाईंची ही कविता वाचली की लक्षात येते की मन ‘लहरी आहे, जहरी आहे, चपळ आहे, पाखरासारखे भरारी घेणारे आहे, आभाळातही मावणार नाही एवढे मोठ्ठे आहे आणि खसखशीएवढे लहानसेसुद्धा आहे!’ आपल्या मनाचे हे वर्णन आपल्याला अचंबित करते आणि लगेच पटतेही.
आपले मन प्रेम करते आणि म्हणते,
माझे मन तुझे झाले
तुझे मन माझे झाले
किंवा
मन तळ्यात, मळ्यात, जाईच्या कळ्यात
तेच मन भक्तिरसात ओथंबून जाते आणि म्हणते,
मना सज्जना भक्तिपंथेचि जावे
तरी श्री हरी पाविजेतो स्वभावे
किंवा
आनंदाचे डोही आनंद तरंग
आनंदचि अंग, आनंदाचे
असे आपले मन!
कुठे आहे हे? कसे चालते ते? आपले शरीर आपल्याला आरशात पाहता येते. पण आपले मन? त्याचा कुठे आरसा आहे का? लहानपणी सगळ्यांनीच त्या राणीची गोष्ट वाचली असेल, जी आरशाला विचारते, ‘जगात सगळ्यात सुंदर कोण?’ आणि आरसा तिला सांगतो, ‘जगात सगळ्यात सुंदर तूच!’ दुसऱ्या एका परीकथेत आरशात एखाद्याला कुरूप, भयंकर असा चेहरा दिसतो आणि एखाद्याला सुस्वरूप, सोज्वळ असा चेहरा दिसतो! आपल्याला आपले मनही असे पाहता येईल का? हे जाणून घ्यायचे तर आपला मनोव्यापार कसा चालतो हे जाणून घेतले पाहिजे. अगदी लहान वयात आपला मनोव्यापार सुरू होतो आणि तो आपले कितीही वय झाले तरी सुरू राहतो. आपले आयुष्य जसजसे विविध टप्पे पार करते, म्हणजे बालपण, तारुण्य, प्रौढत्व आणि वार्धक्य, तसे प्रत्येक टप्प्यावर मनाची आंदोलने वेगवेगळी असतात. बालपणात वाढ आणि विकासाच्या विविध पायऱ्या यशस्वीपणे चढत जाताना लहान मुलाला मानसिक विकासाचीही आवश्यकता असते आणि त्याची पुढच्या आयुष्यातल्या संघर्षाला तोंड द्यायला मदत होते.
हेही वाचा – Summer drink: उन्हाळा सुरु झालाय ट्राय करा मसाला ताक, वजन कमी करण्यासाठीही होईल मदत
तारुण्याच्या उंबरठ्यावर आपल्या लैंगिकतेची ओळख पटू लागते. भावी आयुष्याची स्वप्ने आपले मन पाहू लागते. आपले शिक्षण, नोकरी-व्यवसाय, कौटुंबिक जीवन आणि नवीन जबाबदाऱ्या या सगळ्यांनी मन व्यापून जाते. विशेषकरून, महिलेच्या जीवनात होणाऱ्या अनेक बदलांना तिला सामोरे जावे लागते. मासिक पाळी, गरोदरपण, मातृत्व, रजोनिवृत्ती अशा अनेक अवस्था जगताना शरीराबरोबरच मनातही अनेक बदल होत राहतात. वृद्ध होताना तर मनाची फार तयारी करावी लागते! कामातल्या निवृत्तीपासून, घरातल्या निवृत्तीपर्यंत अनेक बदलांना सामोरे जावे लागते. संधिवात, ब्लड प्रेशर, मधुमेह, दृष्टी आणि श्रवणशक्तीवर होणारा परिणाम अशा शारीरिक बदलांचाही स्वीकार करावा लागतो. आयुष्यातला हा प्रत्येक टप्पा पार करताना अनेकदा मनात संघर्ष उभा राहतो, अनेक पर्यायांमधला कुठला निवडावा असा प्रश्न पडतो, अनेक कठीण निर्णय करावे लागतात. असे करताना आपल्या संपर्कातल्या अनेकांशी बरे-वाईट नातेसंबंध तयार होतात.
आपले काम करताना आपली विचारशक्ती पणाला लावावी लागते. आपल्या अवतीभोवती अनेक घडामोडी होत असतात. अशा सगळ्यामुळे मनात विचारांचे काहूर माजते, भावनांचा कल्लोळ होतो आणि मनातले व्यक्त करताना आपण आपली वर्तणूक ठरवतो. आपले मन सतत कार्यरत असते. आपले शरीर आणि मन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जणू आपले शरीर आणि मन हातात हात गुंफून चालतात. त्यामुळे शारीरिक तक्रारी, आजार यांचा मनावर परिणाम होतो आणि मनःस्थितीचा शरीरावर परिणाम होत राहतो. मनावर आणि शरीरावर अनेक घटकांचा प्रभाव असतो उदा. आनुवंशिकता, आजूबाजूचे वातावरण, कौटुंबिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती.
असे हे आपले मन! बहुपदरी, बहुआयामी! कधी सूक्ष्म, कधी स्थूल! कधी प्रकट, कधी अप्रकट! कधी जाणिवेच्या पातळीवर तर कधी नेणिवेच्या पातळीवर असणारे! मन म्हणजे बुद्धी, म्हणजेच भाषा, वाचा, स्मरणशक्ती, निर्णयक्षमता, समस्यानिराकरण, नियोजन, नियोजनाची कार्यवाही आणि असे बरेच काही. मन म्हणजे विविध भावना – राग, लोभ, प्रेम, आनंद, दुःख, मत्सर, भीती अशा अनेक. मेंदूतील अनेक रसायने, चेतापेशी आणि चेतातंतूंचे जाळे म्हणजे मन.
हेही वाचा – हार्ट अटॅकचा धोका टाळायचाय? मग हे सोपे व्यायाम नियमित करा!
सर्वसाधारणपणे मनात आपले विचार, भावना आणि वागणूक यांच्यात एक संतुलन असते. प्रत्येकाला जीवनसंघर्ष असतो, प्रत्येकाच्या आयुष्यात ताणतणाव असतात, चढ-उतार असतात. या सगळ्यांना तोंड देण्याची प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी असते. जेव्हा मनाचे हे संतुलन बिघडते तेव्हा मनोविकार होतात. चिंता, उदासीनता असे सामान्य मानसिक विकार आणि स्किझोफ्रेनियासारखे गंभीर मानसिक विकार. बालपणापासून ते वर्धक्यापर्यंत या मानसिक विकारांचे स्वरूप वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण. तेही जाणून घेऊ.
आरोग्य हे शारीरिक तसेच मानसिक! मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी काय काय प्रयत्न करता येतील याचाही वेध घेऊ. आपल्या संतांनीसुद्धा मानःस्वास्थ्याचा कानमंत्र दिलाच आहे.
मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धींचें कारण ।
मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते