तुमच्यापैकी अनेकांना ओठ गुळगुळीत, पिंक व हायड्रेटेड ठेवायला आवडतात. त्यासाठी तुम्ही तुमच्या ओठांना सूट होईल असे लिप बाम खरेदी करता. एकदा लिम बाम लावल्यानंतर काही तासांनी ओठ पुन्हा कोरडे दिसू लागतात. मग अशा वेळी तुम्ही दिवसातून अनेकदा ओठांवर लिप बामचा वापर करता. अशाने लिप बाम वापरण्याची सवय लागते. मग तुम्ही ऑफिसला जाताना एक दिवस जरी चुकून घरी लिप बाम विसरला तरी दिवसभर तुम्हाला ओठ कोरडे आणि फाटल्यासारखे वाटू लागतात. अशा प्रकारे तुम्हाला लिप बामचे एक प्रकारे व्यसन लागते.
अशातच इन्स्टाग्रामवर कंटेन्ट क्रिएटर डॉ. डॅनियल पोम्पा यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून ओठांवर सतत लिप बाम न वापरण्याचा सल्ला दिला आहे. याच संदर्भात बॉडीक्राफ्ट क्लिनिक्सचे संस्थापक व वैद्यकीय संचालक डॉ. मिक्की सिंग यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे. यात त्यांनी लिप बामच्या सततच्या वापरामुळे तुमच्या ओठांचे कशा प्रकारे नुकसान होते आणि लिप बामला पर्यायी उपाय काय आहे याविषयी माहिती दिली आहे.
डॉ. मिक्की सिंग म्हणाले की, लिप बाम रोज वापरल्यामुळे ‘लिप बाम व्यसन’ म्हणून ओळखली जाणारी परिस्थिती उदभवू शकते. या स्थितीत ओठ बाह्य हायड्रेशन स्रोतांवर अवलंबून राहतात.
त्यामुळे ओठांमधील नैसर्गिक ओलावा कमी होऊ शकतो. कोरडेपणा टाळण्यासाठी जर तुम्ही लिप बाम वापरत असाल, तर त्याची सवय सतत सुरू राहते. अशा वेळी ओठ कोरडे पडू नयेत किंवा फाटू नयेत यासाठी आणि ओठांमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी दुसऱ्या नैसर्गिक पर्यायांचा वापर करा, असेही डॉ. सिंग म्हणाले.
लिप बाममधील रासायनिक घटकांचा ओठांवर घातक परिणाम होतो का?
डॉ. सिंग म्हणाले की, लिप बाममध्ये कूलिंग इफेक्टसाठी फिनॉल आणि मेंथॉलचा वापर केला जातो. हे घटक ओठांसाठी त्रासदायक ठरू शकतात. तसेच दीर्घकाळपर्यंत वापरल्यास कोरडेपणा किंवा संवेदनशीलता होऊ शकते.
लिप बाममधील सुगंध आणि फ्लेवर्समुळे काही व्यक्तींना ॲलर्जी होण्याची शक्यता असते, असेही डॉ. सिंग यांनी नमूद केले.
लिप बामसाठी नैसर्गिक पर्याय
डॉ. सिंग यांनी शिफारस केली की, खोबरेल तेल, शिया बटर व मेण यांचा पर्याय म्हणून वापर केला जाऊ शकतो. या उत्पादनांमध्ये कॉमेडोजेनिक आहेत आणि त्यामुळे आसपासच्या भागातील रोमछिद्रे बंद होऊ शकतात.
ज्यांना त्यांच्या ओठांचे हायड्रेशन सुधारायचे आहे अशा लोकांना स्किन बूस्टर, इंजेक्टेबल मॉइश्चरायझर वापरण्याचा सल्ला दिला जातो, असेही डॉ. सिंग यांनी सांगितले.
लिप बाम वापरण्याबद्दल असलेले गैरसमज
डॉ. सिंग म्हणाले की, लिप बाम वापरण्याची सवय ही जितकी गंभीर समजली जाते, तितकी ती गंभीर नाही. ओठ इतर त्वचा आणि शरीराच्या भागांच्या प्रमाणात रसायने शोषून घेत नाहीत. त्यामुळे माझ्या पाहण्यात तरी लिप बाममुळे खूप काही गंभीर आजार झालाय वगैरे असे आढळले नाही, असेही डॉ. सिंग म्हणाले.
लिप बाम न वापरता, कोरड्या किंवा फाटलेल्या ओठांची काळजी कशी घ्यायची?
डॉ. सिंग यांनी अत्यंत कोरड्या किंवा फाटलेल्या ओठांची काळजी घेण्यासाठी काही सोप्या टिप्स सुचवल्या आहेत. त्या टिप्स आपण जाणून घेऊ…
१) हायड्रेट राहा : संपूर्ण त्वचेचे हायड्रेशन राखण्यासाठी पुरेसे पाणी प्या.
२) सौम्य एक्सफोलिएशन : मऊ टूथब्रश किंवा स्वयंपाकघरातील साखरेचा स्क्रब म्हणून वापर करीत ओठांवरील त्वचेतील मृत पेशी हळुवारपणे काढा.
३) संतुलित आहार : त्वचेच्या आरोग्याला आतून-बाहेरून निरोगी आणि चांगले ठेवण्यासाठी ए, सी व ई या जीवनसत्त्वांनी समृद्ध पदार्थांचा आहारात समावेश करा.