Liver Damage Causes: यकृत हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा अवयव आहे. पण, वाईट जीवनशैलीमुळे अनेकदा यकृतावर गंभीर परिणाम होतात. यात मद्यपान ही यकृतासाठी अतिशय घातक गोष्ट मानली जाते. मद्यपानामुळे यकृताचे खूप गंभीर नुकसान होऊ शकते. तुम्हाला वाटत असेल की, जर तुम्ही आठवड्यातून एकदा मद्यपान केलं तर काही होत नाही, तर हा तुमचा मोठा गैरसमज आहे. तुम्ही कमी-अधिक प्रमाणात मद्यपान केलं तरी तुमच्या यकृताच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असतात. अलीकडेच याबाबतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘द लिव्हर डॉक’ म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध यकृततज्ज्ञ डॉ. सिरीयक ॲबी फिलिप्स यांनीच एक पोस्ट केली होती, ज्यात त्यांनी एक फोटो पोस्ट करत दोन यकृतांची तुलना केली आहे. मद्यपान करणाऱ्या आणि न करणाऱ्या व्यक्तींच्या यकृताचा तो फोटो आहे. यात आठवड्यातून एक दिवस मद्यपान करणाऱ्या व्यक्तीचे यकृत काळसर दिसत आहे, तर निरोगी म्हणजे मद्यपान न करणाऱ्या व्यक्तीचे यकृत गुलाबी रंगाचे दिसत आहे. हे यकृत मद्यपान करणाऱ्या व्यक्तीच्या पत्नीने त्याला दान केले होते. या फोटोतून मद्यामुळे यकृतावर होणारे गंभीर परिणाम दिसून येतात.
डॉ. सिरीयक अॅबी फिलिप्स यांनी एक्सवर हा फोटो पोस्ट करत लिहिले की, त्यांची एका जोडप्याशी ओळख झाली, ज्यात नवऱ्याचे वय ३२ वर्ष होते, जो दर वीकेंडला मद्यपान करायचा. यात पत्नीचे वय स्पष्ट झाले नाही, पण तिने आयुष्यात कधीही मद्यपान केले नव्हते. या दोघांच्या यकृताचा फोटो शेअर करून त्यांनी आठवड्यातून फक्त एक दिवस मद्यपान केल्यास काय होते हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
या विषयावर इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना कावेरी हॉस्पिटल्सचे लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. श्रीनिवास बोजनापू सांगतात की, मद्यपान अगदी मध्यम प्रमाणात केले तरी ते यकृतावर विष म्हणून कार्य करते, यामुळे यकृताची चयापचय क्रिया बिघडते, ज्यातून कार्सिनोजेनिक हा विषारी घटक तयार होतो. अशाने शरीराचे संपूर्ण कार्य बिघडते. अल्कोहोलचे परिणाम अनेक घटकांवर अवलंबून असतात.
१) मद्य पिण्याची मर्यादा
तुम्ही ज्या प्रमाणात मद्य पिता, त्याचा तुमच्या रक्तप्रवाहाच्या स्थितीवर परिणाम होतो.
२) अनुवांशिक पूर्वस्थिती
अल्कोहोल डिहायड्रोजनेज (ADH) आणि अल्डीहाइड डिहायड्रोजनेज (ALDH2) सारख्या एन्झाईमसह मद्याचा यकृतावर परिणाम होतो.
३) जीवनशैली
मद्यासह खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, वय, धूम्रपान यामुळे यकृताचे नुकसान होते.
आठवड्याच्या शेवटी मद्यपान केल्यानंतर तितकेसे परिणाम जाणवत नाही, परंतु कालांतराने शरीरावर त्याचा एकत्रित परिणाम होतो आणि यकृताचे नुकसान होऊ शकते.
शनिवार व रविवारच्या मद्यपानामुळे यकृताचे गंभीर नुकसान होण्याची शक्यता असली तरी मद्यसेवनाने व्यक्तीच्या शरीरावर नेमका कोणते आणि कसे परिणाम होतात याचे मूल्यांकन करणे आव्हानात्मक आहे.
कारण मद्यपानानंतर एखाद्या व्यक्तीच्या यकृतावर नेमका काय परिणाम होतो हे त्या व्यक्तीची शारीरिक स्थिती, सेवंदनशीलता, अनुवांशिक भिन्नता आणि आरोग्यस्थिती यावर निर्धारित असते.
तुम्ही मद्यपान पूर्णपणे टाळावे का?
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, यकृताचे संरक्षण करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे मद्यपान पूर्णपणे टाळणे. अधूनमधून मद्यपान केल्याने सर्वांच्या शारीरिक स्थितीवर समान रीतीने हानिकारक परिणाम होतोच असे नाही. मद्याचा वेगवेगळ्या व्यक्तींवर कसा परिणाम होतो याचा अंदाज लावणे शक्य नसल्याने ते टाळणेच योग्य आहे. कारण मद्यापासून दूर राहिल्यामुळे कर्करोग, हृदयरोग आणि न्यूरोलॉजिकल विकारांसह इतर गंभीर आरोग्य स्थितींचा धोकादेखील कमी होतो.