मसाल्याचे पदार्थ आपल्या आहारात महत्त्वाची भूमिका बजावतात. पदार्थाला चव आणण्याबरोबरीने आपल्या तब्येतीसाठीही ते महत्त्वाचे असतात. नानाविध औषधी गुणधर्म असणाऱ्या मसाल्याच्या पदार्थांविषयी सविस्तर जाणून घेऊया.
दालचिनी
दालचिनी मसाल्याच्या पदार्थात अत्यावश्यक आहे. यात सिनॅमम नावाचे तेल असते. पाण्यापेक्षा वजनाने हे तेल जड असते. दालचिनी गुणाने तीक्ष्ण, उष्ण, रूक्ष, पित्तकर, वजन घटविणारी, चवीने मधुर व कडवट आहे. भारतात वापरल्या जाणाऱ्या दालचिनीत तेलाचे प्रमाण फार कमी असते. परदेशांत यापेक्षा चांगल्या दर्जाची गुणवान दालचिनी वापरतात. कोकाकोला या प्रसिद्ध पेयात दालचिनी तेल असते. दालचिनी ही अपचन, अजीर्ण, मुरडा, आतड्याची सूज, पोटदुखी, ग्रहणी, आचके, आर्तवशूल, पित्ताच्या उलट्या, मलावरोध, शोष पडणे, वजन घटणे इत्यादी विकारात उपयुक्त आहे. त्वचेला वर्ण सुधारण्याकरिता दालचिनीचा विशेष उपयोग होतो. सर्दी दूर करण्याकरिता दालचिनीचा अर्क कानशिलाला चोळून लावतात.

अनेक प्रकारच्या वातविकारांत दालचिनीचे तेल बाह्योपचारार्थ उपयुक्त आहे. दालचिनीच्या तेलात बुडवलेला कापूस योनीमध्ये ठवून योनिभ्रंश कमी करता येतो. अंग गार पडत असल्यास दालचिनीचे तेल चोळावे, ऊब येते, दालचिनीचे चूर्ण व कात एकत्र करून घेतल्यास आमांशाची खोड मोडते. वरचेवर संडास होणे थांबते. दालचिनी व किंचित सुंठ चूर्ण जेवणानंतर घेतल्यास पोटात वायू धरणे थांबते. पडसे, फ्ल्यू, थंडीताप, खोकला या नेहमीच्या तक्रारींकरिता दालचिनी, व किंचित सुंठचूर्ण जेवणानंतर घेतल्यास पोटात वायू धरणे थांबते. पडसे, फ्ल्यू, थंडीताप, खोकला या नेहमीच्या तक्रारींकरिता दालचिनी, लवंग, सुंठ असा काढा सांज-सकाळ घ्यावा.

सुका खोकला, आवज बसणे, तोंडाला रुची नसणे, कफ सहजपणे न सुटणे, गायक व वृद्ध यांच्याकरिता दालचिनी चूर्ण व खडीसाखर हा उत्तम योग आहे. कडकी, जुनाट ताप, अग्निमांद्य, हाडी मुरलेला ताप याकरिता दालचिनी व वेलची व खडीसाखर चूर्ण असे मिश्रण लहानथोरांनी वापरून पाहावे. कोणत्याही साखरेपासून बनणाऱ्या मिठाईत स्वाद व पाचनाकरिता दालचिनी चूर्ण अवश्य वापरावे. सीतोपलादि या प्रसिद्ध चूर्णातील एक घटकद्रव्य दालचिनी आहे. आयुर्वेदातील अनेकानेक प्राश, अवलेह, विविध टॉनिक औषधांमध्ये दालचिनीचा मुक्त वापर, वेलदोडा, लवंग, तमालपत्र, नागकेशर अशांबरोबर केला जातो. दालचिनीच्या काढ्यांचा उपयोग विविध औषधांचा खल करताना ‘भावनाद्रव्य’ म्हणून केला जातो. दालचिनीमातेला अनेकानेक प्रणाम!

कारळे

खुरासानी, कारळे, काळे तीळ, रामतीळ या विविध नावांनी जिऱ्यासारखे पण आकाराने मोठे तीळ बहुधा सर्वांना अतिशय रुचकर चटणीकरिता माहीत आहेत. कारळ्याची चटणी आणि ज्वारीची भाकरी ज्यांच्या आहारात आहे, त्यांना मलावरोध, मूळव्याध, मूतखडा, मूत्रकृच्छ किंवा लघवीची आग या विकारांत पथ्यपाण्याची फिकीर करावयास नको. कारळे नुसते स्निग्ध नसून पौष्टिक व त्याचबरोबर वातशमन करणारे आहेत. पक्वाशयात अपानवायूचे कार्यक्षेत्र. त्या क्षेत्रात लघवी, मलप्रवृत्ती, आर्तवप्रवृत्ती यांचे योग्य वेळी, योग्य प्रमाणात अनुमोलन कारळ्याची चटणी करील. कारळ्याची चटणी खूप तिखट करू नये. सोबत कुटलेले तीळ दिल्यास पौष्टिक अंश वाढतो. कारळे व तीळ यांची एकत्र चटणी बाळंतिणीचे दूध वाढवायला मदत करते. कारळ्याचे तेल तीळ तेलाच्या अपेक्षेत अधिक कृमीनाशक व उष्ण आहे.

जवस

आजकालच्या पुणे-मुंबईसारख्या शहरी जीवनात नवीन पिढीला ‘जवस’ या मसाल्याच्या पदार्थाची क्वचितच ओळख आहे. एक काळ खेडोपाडी ज्वारीच्या भाकरीबरोबर जवसाची चटणी व कच्चा कांदा यामुळे कष्टकऱ्यांच्या, भरपूर श्रम करणाऱ्या कामकऱ्यांच्या जेवणाला वेगळीच रंगत येत असे. जवसाबरोबर कमी-अधिक प्रमाणात तीळ, शेंगदाणे कूट, किसलेले कोरडे खोबरे, अल्प प्रमाणात लसूण, चवीपुरते तिखट, मीठ अशी भन्नाट चटणी एकदा करून बघाच. एक भाकरी जास्त जाणार.

जिरे

जिथे स्त्री-पुरुषांच्या आर्तव, शुक्र व मूत्रसंबंधी विकारात तसेच जीभ, आमाशय, लहान आतड्याच्या विकारात उत्तम काम देते. रुची उत्पन्न करणाऱ्या पदार्थात जिरेचूर्ण श्रेष्ठ आहे. असे असूनही ते उष्णता वाढवत नाही. उलट पित्त कमी करते. सर्व प्रकारच्या गॅसवरच्या औषधात जिरे प्रमुख घटक आहे. जिरेचूर्ण ताजेच असावे. ताकाबरोबर घ्यावे. स्त्रियांच्या पांढरे जाणे, धुपणी या तक्रारीत रात्री एक चमचा जिरे एक कप पाण्यात भिजत टाकावे. सकाळी ते चावून खावे, वर तेच पाणी प्यावे. पांढरे जाणे आठ-पंधरा दिवसांत कमी होते. जीरकाद्याारिष्ट हे तयार औषधही श्वेतप्रदरावर मात करते. पुरुषांच्या लैंगिक दुर्बलता, वारंवार स्वप्नदोष होणे, स्त्री-पुरुषांच्या मूत्रेंद्रियाची आग होणे, कंड सुटणे या विकारात याच प्रकारे जिरे-पाणी घ्यावे. जिरेपाक पौष्टिक आहे.

Story img Loader