डॉ. शशांक सामक आणि डॉ. जेसिका सामक
स्त्रीच्या मेंदूत कामभावनेचं चक्र केवळ ‘बेड लाईफ’च्या आसाभोवती फिरत नसतं, हे नवऱ्याच्या, पुरुषाच्या लक्षात आले पाहिजे. तिची अन्य आकर्षणं त्याला जाणवली पाहिजेत. तिच्या मेंदूत आकर्षणांची गर्दी झालेली असते. पतीने काही प्रमाणात तरी तिच्या या गोष्टी लक्षात ठेवून तिला यथाशक्ती साथ दिली तर तिचं मन जिंकायला त्याला सोपं जातं. यामुळे सुखकर कामजीवनाचा मार्ग हा सुकर होत असतो. जोडीदाराचा तिरस्कार करण्यात वेळ घालवू नका. कारण प्रेम करायलाच आयुष्यात वेळ कमी पडत असतो.
‘मला आता खूपच टेन्शन येतंय सर. रितूला तर आता फारशी इच्छाच होत नाही आणि आमच्या नात्यात बराच ताण वाढतोय.’ अमोल सांगत होता. अमोल-रितू जोडपं माझ्यासमोर बसलं होतं. अमोल पस्तिशीचा आणि रितू तिशीतली. लव मॅरेज. लग्नाला सात वर्षे झाली होती. सारखे वाद, भांडणं यामुळे दोघेही वैतागले होते. सगळ्यांचा संबंध थेट नाही तरी अप्रत्यक्षपणे त्यांच्यातील कामजीवनाशी येत होता. दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर त्यांच्यात प्रचंड दुरावा आला होता. त्यालाही आता तीन वर्षे होत होती. गरोदरपणाच्या काळात बरेच महिने त्यांच्यातला सेक्स थांबला होता. मुलाच्या जन्मानंतर काहीशी सुरुवात झालेली असली तरी विस्कळीतच होतं सारं. महिन्यातून एखादं दोन वेळा त्यांचे संबंध यायचे आणि ते सुद्धा रितूच्या निरुत्साहीपणाने यांत्रिकपणे, मेकॅनिकली.
आता मात्र दोघांनीही ठरवलं काही तरी सल्ला घेणं जरुरीचं आहे. ‘सर, मला जशी इच्छा होतीय तशीच रितूलाही व्हायला पाहिजे ना? आमच्या कामजीवनाविषयी माझ्या मनात नेहमीच वसंत ऋतू असतो, पण हिच्या मनात मात्र सतत ग्रीष्म! त्याचा ताप आणि चटके आता मला असह्य होत आहेत. सततच्या वादांमुळे आम्ही दोघंही पार त्रासलो आहोत. रितूच्या मनात कधी कामऋतू सुरू होणार आणि कसा मी तो आणू, याबद्दलही जरा माहिती घेण्यासाठी आम्ही आलो आहोत.’ अमोल अगदी रितूच्या नावावर कोटी करत रोमँटिकली सांगत होता.
मी त्याला म्हटलेसुद्धा, ‘अरे अमोल, तू तर चांगलाच रोमँटिक दिसतोस. कवी वगरे आहेस की काय?’
‘डोंबल, रोमँटिक! कविता, शायरी वगरे करतो तो, पण माझ्याशी मात्र रौद्र रस. मला तो कधी समजूनच घेत नाही. तो शायरीतला श्रृंगाररस जरा माझ्या वाट्याला कसा आणायचा ते त्याला जरा सांगा सर.’ रितूला कंठ फुटला. ‘लग्नापूर्वी ना अमोल एवढा रोमँटिक होऊन बोलायचा, वागायचा. आता काय बिनसलंय कोण जाणे!’
‘हो, हो, आता तूच अनरोमँटिक झाल्यावर मी काय करू एकटाच रोमँटिक होऊन?’ अमोलचा रितूला सडेतोड प्रश्न होता. असो. आता मला या वादात पडणं क्रमप्राप्त होतं.
‘अमोल तू रोमँटिक आणि रितूलाही रोमँटिकपणा हवाय तर मग प्रॉब्लेम काय?’ मी असं विचारताच अमोल उत्तरला, ‘मी तर तिच्याशी सततच रोमँटिक वागत होतो. पण काही वर्षे मात्र रितूच्या स्वभावात बदल होत गेला. माझा स्पर्शसुद्धा ती झिडकारत होती. जवळीक करायला लागलो की, मला दूर लोटायची. आमच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर तिच्यात हा बदल जाणवायला लागला. त्या अगोदर तशी अगदी पूर्वीसारखी रोमँटिक नसली तरी बऱ्यापकी मला रिस्पॉन्स द्यायची. आता तर हद्दच झालीय.’
‘सर, अमोल निशाचरासारखा वागतो. त्याला माझ्यातलं चांगलं फक्त रात्री बेडवरच दिसतं. एरवी नाही. हे सारखं सारखं अंगचटीला येणं म्हणजे काही रोमान्स का हो? मला आता त्या गोष्टीचा उबग आलाय.’ रितू आता चिडीच्या राज्यातून रडीच्या राज्यात शिरत होती. तिचा चेहरा अगदी फिका पडला होता. अमोलही जरा नरमला.
‘अगं, पण लग्नापूर्वी तर तुला हे सर्व आवडायचं की. सुरुवातीला तर सेक्समध्ये पूर्ण जीव ओतायचीस. आता काय झालं मग? हां, मला ऑफिसच्या कामामुळे यायला जरा उशीर होत होता, पण तरी मी उत्साहाने जवळ येत होतो ना?’
‘हो, कधीही आलास तरी तुला फक्त तेवढंच सुचायचं. मला आवडत नव्हतं तरी मी तुला नाराज करायचं नाही म्हणून साथ द्यायचे, पण नाइलाज म्हणून. मनापासून नाही.’ रितू.
‘सर, आता तुम्हीच सांगा, सेक्ससारखी आनंदाची गोष्ट आम्हा दोघांनाही आवडायची. ती आता फक्त मला एकट्यालाच आवडली पाहिजे का? रितूची आवड कशी काय गायब झाली? हिला नेमके हवंय काय?’ अमोलला या गोष्टीचं फारच आश्चर्य वाटत होतं.
अशी कित्येक जोडपी असतात ज्यांच्या आयुष्यात अमोल-रितूसारखा काळ येत असतो. नवऱ्याला बायकोचा सेक्समधील इंटरेस्ट कमी का झाला, याचा पत्ता लागत नाही. मग वाद, भांडणे यांच्या चक्रात ते जोडपे अडकून पडते आणि एकमेकांपासून दूर जाते. आणि ही खरी आयुष्याची शोकांतिका असते. दोन व्यक्ती जिवंत असतात, पण त्यांच्यातलं नातं मात्र जेव्हा मरून जातं तेव्हा ती सगळ्यात दु:खद गोष्ट असते! नात्याचा शेवट आला की कळतं नात्याची सुरुवात किती सुंदर होती. हा शोकांतिक शेवट निश्चित टाळता येऊ शकतो.
पती-पत्नीचं नातं हे नैसर्गिक नातं नाही. ते बनवलेलं नातं असतं, निवडलेलं नातं असतं. निवडलेलं नातं निभावणं ही एक कला असते आणि प्रत्येक दाम्पत्याने ती आत्मसात करणं नितांत गरजेचं असतं. जगात कोणीही कोणासाठी जन्माला आलेलं नसतं, पण तुम्ही त्या ‘कुणा’ला तरी तुमच्यासाठी जगायला निश्चित लावू शकता. प्रत्येक दाम्पत्याने ही बाब ध्यानात ठेवली की ‘एकमेकांना’ काय हवंय, नकोय ते समजून घ्यावंसं वाटायला लागेल. पती-पत्नी नातं हेच मुळात समाजबांधणीसाठी निर्मिलेलं असल्याने कामजीवन हाच त्याचा पाया ठरतो व त्यासाठी कामजीवनात जोडीदाराला समजून घेणं, त्याला काय हवंय, नकोय लक्षात घेऊन वागणं गरजेचं असतं.
कामजीवन नाकारून जगणं हा जोडीदारावर अत्याचारच असतो. काही अंशी हे खरं आहे की कामजीवन दुर्लक्षून आपण आपलंच नातं कमजोर करीत असतो. ती जोडीदाराची फसवणूक असते. हे भान सर्व, विशेषत: युवा व मध्यमवयीन, जोडप्यांनी ठेवलं पाहिजे. तसंच जुलमी कामसंबंध हासुद्धा जोडीदारावर अत्याचारच असतो. म्हणूनच दोघांनीही सेक्सला महत्त्व देणं आवश्यक असतं, सल्ला घेणं आवश्यक असतं व तज्ज्ञांनी दिलेला सल्ला अमलात आणणं आवश्यक असतं. नाही तर ‘बरंच काही’ घडू शकतं आणि मग जोडीदाराला दोष देणं चुकीचं ठरतं.
(लोकसत्ता चतुरंग पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख पुनर्प्रकाशित करत आहोत.)